पधारो नाथ पूजा को । हृदयमंदिर सजाया है ।।
तुम्हारे वास्ते आसन । विमल मन का बिछाया है ।
आपने ही हमें साधना सिखाई गुरुदेव ।
बस रहे मन में कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता ।।
सनातन संस्थेमध्ये ५ ऑक्टोबर २०१६ मध्ये राष्ट्रीय भाववृद्धी सत्संग चालू झाले. २२४ सत्संगांनतर त्याचे रूपांतर भक्तीसत्संगात झाले. आतापर्यंत एकूण २६३ सत्संग झाले आहेत. सनातनच्या भाव असणाऱ्या साधिका, तसेच श्रीसत्शक्ति सौ. बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या साक्षात् दैवी वाणीतून प्रसारित होणाऱ्या या भाववृद्धी सत्संगांमुळे सनातनच्या साधकांची भावओंजळ भरभरून वाहिली आणि साधक भावभक्तीच्या एका टप्प्यावर येऊन पोचले !
या भाववृद्धी सत्संगांनी साधकांना अगणित भावक्षणांचे मोती देऊन, त्यांची भावझोळी भरून त्यांना श्रीमंत केले ! अनेक भावार्चनांच्या माध्यमातून देवतांचे आणि विविध दैवी लोकांचे अस्तित्व अनुभवायला देऊन अलौकिक अशा भावविश्वात नेले ! आदिशक्तीसह सर्व देवतांच्या सगुण-निर्गुण रूपाच्या भाववर्णनाने साक्षात् त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती दिली ! गुरुमाऊलीच्या भावप्रीतीच्या फुलांनी बहरलेली झालर साधकांच्या मनःपटलावर पांघरली ! साधकांचे भावविश्व समृद्ध करून त्यांच्या हृदयमंदिरात गुरुदेवांचे अस्तित्व कायमचे कोरले !
भाववृद्धी सत्संगांनी काय दिले नाही ?… साधकांना त्यांचे सर्व सगेसोयरे, सहसाधक यांना समजून घेऊन त्यांच्याविषयी भावसंवेदना निर्माण करण्यास उद्युक्त केले ! इतकेच काय महाशक्ती पंचमहाभूतांविषयी अपार शरणागतभाव वृद्धींगत केला ! गुरूंनी दिलेल्या प्रत्येक वस्तूविषयी, ते करून घेत असलेल्या साधनेविषयी, ते देत असलेल्या अनुभूतींविषयी त्यांच्याप्रती अपार आणि अमर्याद कृतज्ञताभाव निर्माण करण्यास शिकवले ! कृतज्ञतेच्या भावाश्रूंनी साधकांना ओलेचिंब केले !
भावसत्संगांनी काय दिले नाही ? साधकांना देवाचे अस्तित्व अनुभवण्यापासून दूर नेणाऱ्या अहंचा लय करण्यासाठी प्रेरित केले ! साधकांच्या भाववृद्धीतील अडथळे असणाऱ्या दोषांवर मात कशी करायची ? ते वारंवार सांगितले ! साक्षात् वैकुंठातील भावचैतन्याचा तेजोमय प्रकाश साधकांना अनुभवायला देऊन त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने ‘भावपूर्ण’ (भावाने परिपूर्ण) केले !
असे भाव आणि भक्ती सत्संग अनुभवण्यास देऊन साधकांचा साधनाप्रवास भावचैतन्याच्या दीपज्योतीने उजळून टाकणाऱ्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता ! आणि त्यांच्या माध्यमातून साधकांना दैदिप्यमान भावविश्वाची ओळख करून देऊन त्यात डुंबत ठेवणाऱ्या साक्षात् श्रीमन्नारायण परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !