‘भार्या म्हणे सुदाम्यासी’ हे भजन ऐकतांना साधकाने अनुभवलेली सुदाम्याची अवस्था!       

श्री. किरण कुलकर्णी

१. भावजागृतीसाठी प्रयत्न करतांना ‘भार्या म्हणे सुदाम्यासी’ हे भजन भ्रमणभाषवर ऐकणे आणि त्यातील शब्द, अर्थ अन् नाद यांच्याशी एकरूप होऊन भावजागृती होणे

‘२९.५.२०१२ या दिवशी सकाळी ५ वाजता मी भावजागृतीसाठी प्रयत्न करत होतो. अचानक मला प.पू. डॉक्टरांच्या कृपेने ‘भार्या म्हणे सुदाम्यासी’ या भजनाची आठवण आली. लगेच मी भ्रमणभाषवर ते भजन ऐकू लागलो. भजन ऐकता ऐकता भजनातील शब्द, शब्दांचा अर्थ आणि भजनाचा नाद यांच्याशी मी पूर्णपणे एकरूप होऊन गेलो. भजन ऐकतांना माझी भावजागृती होऊन मला वेगळीच अनुभूती येऊ लागली.

२. ‘भजनातील सुदामा स्वतः असून प.पू. डॉक्टर साक्षात् श्रीकृष्ण आहेत आणि मायेच्या आवरणामुळे ते लक्षात न आल्याने आपण ‘सुदामा’च म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या दरिद्रीच राहिलो’, असा भाव मनात दाटून येणे

त्या वेळी मला हे भजन ‘माझ्याशीच संबंधित आहे’, असे जाणवले. ‘भजनातील सुदामा मीच आहे आणि प.पू. डॉक्टर साक्षात् श्रीकृष्णच आहेत’, असा भाव माझ्यात निर्माण होऊ लागला आणि मनात विचार आले, ‘गेल्या अनेक जन्मांपासून माझा आणि गुरुदेवांचा संबंध आहे; पण मायेच्या आवरणामुळे ते माझ्या लक्षात येत नाही. त्यामुळे सुदाम्याप्रमाणे मी दरिद्रीच राहिलो. हे दारिद्र्य संपत्तीचे नसून माझ्या आध्यात्मिक प्रगतीविषयीचे आहे’, हेसुद्धा आता माझ्या लक्षात आले. ‘प्रत्येक जन्मात आपल्याला पुढे नेण्यासाठी प.पू. डॉक्टर प्रयत्न करत असतांना आपण मात्र माया आणि विषय यांतच गुरफटत राहिलो अन् आहोत तिथेच राहिलो. प.पू. डॉक्टर मात्र साक्षात् ईश्वरच असल्याने ते ईश्वर स्वरूपात राहिले आणि आपण मात्र सुदामाच राहिलो.’ हा भाव मनात दाटून राहिला.

३. सुदाम्याच्या भार्येने त्याला श्रीकृष्णाकडे पाठवण्याचा भावार्थ

भजनातील सुदाम्याची भार्या म्हणजे आपली सुप्तावस्थेत असलेली तळमळ. ती आपल्याला सारखी सांगत आहे, ‘प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण तुमचा सखा असतांना तुम्ही असे दरिद्री कसे ? तुम्ही त्यांना भेटायला जा. त्यांच्या एका कृपाकटाक्षाने तुमचे दारिद्र्य संपेल. तुम्हीही (आध्यात्मिक दृष्ट्या) ऐश्वर्यसंपन्न व्हाल. ‘परमेश्वराला देण्यासाठी तुमच्याकडे काही नाही’, असा विचारसुद्धा मनात आणू नका. तुम्ही जी काही तोडकी मोडकी सेवा केली आहे, त्या मूठभर पोह्यांची शिदोरीही ईश्वराला पुरेशी आहे. तुम्ही केवळ तळमळीने तुमच्या सख्याला प्रार्थना करा. त्यामध्ये भाव घाला आणि ती परमेश्वराला अर्पण करा. ईश्वराला सर्व काही कळते. तो तर तुमचा जन्मोजन्मीचा सखा आहे. तो तुमचा नक्कीच उद्धार करील. तुम्ही भावभक्तीने नेलेले हे पोहे तो आनंदाने ग्रहण करील.’

४. भजन ऐकत असतांना आणि ऐकून झाल्यावरही पुष्कळ वेळ माझी भावजागृती होत होती. मी सुदाम्याच्या अवस्थेत असल्यासारखे वाटत होते.

‘हे गुरुदेवा, आपण दिलेल्या या अनुभूतीचे सुदाम्याचे पोहे आपल्या चरणी अर्पण ! कृपा करून आपण ते ग्रहण करावेत, ही अनन्य शरणागतभावाने प्रार्थना !’

– श्री. किरण कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), मिरज