भावाचे प्रकार आणि व्यक्तीच्या प्रकृतीनुरूप भाव !

व्यक्तीच्या प्रकृतीप्रमाणे शिष्यभाव, कृतज्ञताभाव, शरणागतभाव, वात्सल्यभाव, बालकभाव, गोपीभाव, सख्यभाव, दास्यभाव, द्रौपदीभाव अशा भगवंत किंवा गुरु यांच्याशी नाते सांगणाऱ्या भावावस्था असतात.

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली जी गुरुकृपायोगानुसार साधना सांगितली जाते, तिच्यातही अध्यात्मातील ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’ या नियमानुसार साधना करतात. त्यामुळे ज्या साधकाचा जसा भाव असतो, त्याप्रमाणे तो भावजागृतीचे प्रयत्न करत पुढे जातो.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या सहज बोलण्यातून शिकायला मिळालेले सूत्र

‘शरणागतभावाने हळू आवाजात हाक मारली, तरी ती देवापर्यंत पोचते’, हे चिमणीच्या उदाहरणातून लक्षात येणे

‘एकदा परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीच्या खिडकीत एक चिमणी बसली होती आणि ती अगदी हळू आवाजात ओरडत होती. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर तिच्याकडे बघत मला म्हणाले, ‘‘एवढासा हा जीव ! तिचा एवढा बारीक आवाज तिच्या नातेवाइकांपर्यंत कसा काय पोचणार आहे ?’’ त्यांचे हे वाक्य ऐकल्यावर ‘त्या चिमणीचा आवाज तिच्या नातेवाइकांपर्यंत पोचला नसेल; पण तिच्यासारखा शरणागतभाव ठेवून देवाच्या द्वारी आलो, तर देवापर्यंत आपला आवाज निश्चितच पोचतो’, हे मला शिकायला मिळाले. याचे कारण परात्पर गुरु डॉक्टरांना तिचा हळू आवाजही ऐकू आला होता !’ – कु. तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, गोवा. (१७.६.२०२०)


रुग्णाईत असतांना ‘स्थुलातील औषधांपेक्षा गुरुदेवांची कृपा असणे आणि त्यांना शरण जाणे’ अधिक महत्त्वाचे आहे’, असा विचार येणे अन् गुरूंना प्रार्थना केल्यावर प्राणशक्ती आणि उत्साह वाढणे

‘रुग्णाईत असतांना बुद्धीने विचार करता स्थुलातून औषधे, प्राणवायू इत्यादी शरिरासाठी आवश्यक आहेत; पण यांपेक्षाही ‘गुरुदेवांची कृपा असणे, तसेच त्यांना शरण जाणे’ महत्त्वाचे आहे’, असे विचार माझ्या मनात येऊन माझ्याकडून तशी प्रार्थना व्हायची. श्री गुरूंचे चरण धरून त्यांना माझ्याकडून आत्मनिवेदन व्हायचे. असे केल्याने माझी प्राणशक्ती पुन्हा वाढायची आणि मनावर आलेली मरगळ न्यून होऊन उत्साह वाढायचा अन् मला पुन्हा बरे वाटायचे. – श्री. प्रणव मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), देहली (११.५.२०२१)


‘आपण काही करत नसून सर्वकाही देवच करवून घेतो’, असा भाव असल्यास क्रियमाणकर्म नष्ट होते !  

एक साधक : प्रारब्धकर्म कुलदेवीच्या उपासनेने नष्ट होते, तर क्रियमाणकर्म कसे घालवायचे ?

प.पू. डॉक्टर : ‘आपण काही करतच नाही, सर्वकाही देवच करवून घेतो’, या विचाराने क्रियमाण कर्म नष्ट होते. (९.९.२०२०)