आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी निर्णय घेतला ! – दीपक केसरकर, प्रवक्ते, शिंदे गट

  • गोवा येथे पत्रकार परिषद

  • मंत्रीपदाची आशा नसल्याचे प्रतिपादन

दीपक केसरकर, प्रवक्ते, शिंदे गट

गोवा – उद्धव ठाकरे यांनी २९ जून या दिवशी केलेले भाषण भावनिक होते; पण भावनेच्या पलीकडे विकास असतो. आम्ही अजूनही शिवसेनेत असून विधीमंडळ पक्ष आमचा आहे. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी हा निर्णय घेतला आहे. कुणीही येथे मंत्रीपदाच्या आशेने आलेले नाही. आम्ही महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत, असे विधान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले. या गटात न आलेल्या १६ आमदारांना अपात्रतेचा सामना करावा लागू शकतो, अशी चेतावणीही त्यांनी दिली. गोव्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 (सौजन्य : TIMES NOW)

ते पुढे म्हणाले की,

१. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र दिल्यानंतर आम्ही ‘सेलिब्रेशन’ (साजरे) केले नाही. त्यांनी त्यागपत्र द्यावे लागल्याचे आम्हालाही वाईट वाटत आहे. त्यांनी शेवटपर्यंत आमची भूमिका समजून न घेतल्याने त्यांच्यावर ही वेळ आली.

२. मागील काही दिवसांपासून आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न झाला आहे. विविध प्रतिक्रिया देत संभ्रमाची स्थिती निर्माण करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना संपवण्याचे प्रयत्न चालू होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघांत येऊन त्यांच्या पक्षाच्या संभाव्य उमेदवाराच्या नावाची घोषणा करायचे. खासदारांच्या संदर्भातही असाच अनुभव आला.

३. आमचा उद्धव ठाकरे अथवा ठाकरे कुटुंबाला विरोध नाही.


एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यपाल आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट !

मुंबई – महाराष्ट्रात ३० जूनला होणारी बहुमत चाचणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या त्यागपत्रानंतर टळली आहे. यानंतर नव्याने सत्तास्थापनेच्या हालचाली चालू झाल्या. बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गटाचा मुक्काम गोवा येथे असून गटनेते एकनाथ शिंदे मुंबई येथे विशेष विमानाने आले. राज्यात सत्तास्थापनेच्या वाटाघाटींसाठी ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.

मुंबई येथे आल्यानंतर शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी भेट दिली. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

उद्धव ठाकरे यांच्याविषयी आजही आदरच !

‘शिवसेनेचा गटनेता म्हणून ५० आमदारांनी माझी निवड केली आहे. मतदारसंघातील काही प्रश्‍न होते. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाऊया, अशी आमची मागणी होती. यावर त्वरित निर्णय घेतला असता, तर ही वेळ आली नसती. आमच्या मनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी कालही आदर होता आणि आजही आहे. मी मुंबई येथे राज्यपालांना भेटण्यासाठी जात आहे. त्यानंतर आमची पुढील रणनीती ठरवण्यात येईल’, असे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी गोवा येथे माध्यमांशी बोलतांना केले. भाजपसमवेत कोणती आणि किती मंत्रीपदे मिळणार, याविषयी अद्याप कोणतीही चर्चा झाली नसून अफवांवर विश्‍वास ठेवू नये, तसेच मतदारसंघातील विकासकामे हाच आमचा उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी सलग २ ट्वीट्स केले आहेत.