अलिबाग येथे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पतंजलि योग समितीकडून योग शिबिराचे आयोजन !

सरखेल कान्होजीराजे आंग्रे समाधीस्थळाच्या ठिकाणी घेण्यात आलेले योग शिबिर

अलिबाग (रायगड) – आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या पूर्वसिद्धतेनिमित्त पतंजलि योग समिती, रायगडने १९ जून या दिवशी येथील सरखेल कान्होजीराजे आंग्रे समाधीस्थळाच्या ठिकाणी योग शिबिर आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन सरखेल कान्होजीराजे यांचे वंशज माननीय रघुजीराजे आंग्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

योगऋषी स्वामी रामदेवबाबा आणि पतंजलि योग समिती यांनी देशाला सामर्थ्यवान केले ! – रघुजीराजे आंग्रे

तुम्ही कितीही वैभवसंपन्न असलात; पण तुमचे आरोग्य चांगले नसेल, तर त्या वैभवाला काहीच किंमत नसते. योगऋषी स्वामी रामदेवबाबा आणि पतंजलि योग समिती यांनी आपल्या सनातन संस्कृतीतील योग अन् आयुर्वेद घरोघरी नेऊन प्रत्येक व्यक्तीला आरोग्यवान करून देशाला सामर्थ्यवान केले आहे, असे उद्गार रघुजीराजे आंग्रे यांनी काढले.

ज्येष्ठ योग शिक्षक डॉ. सुरेश म्हात्रे आणि विजयकुमार शिंदे यांनी रघुजीराजे आंग्रे यांचे स्वागत केले. भारत स्वाभिमानचे जिल्हा प्रभारी दिलीप गाटे यांनी योग शिबिर घेतले. या प्रसंगी जिल्हा पतंजलि योग समितीचे नवनिर्वाचित प्रभारी सुहास गानू, महामंत्री विजयकुमार शिंदे, तसेच युवा भारत जिल्हा प्रभारी दीपक गाटे, किसान समिती प्रभारी रवी पाटील, संरक्षक गौतम लेऊवा आणि इतर योगशिक्षक उपस्थित होते.