निसर्गानुकूल शेती उद्ध्वस्त करणारी कीटकनाशके आणि रासायनिक खते !

सध्या पीक अधिक येण्यासाठी रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा भरमसाठ वापर केला जातो. यांमुळेच कालांतराने सुपीक भूमीचा कस पूर्णतः जाऊन ती नापीक होते, तसेच मानवी शरिराची अपरिमित हानी होते. यामुळेच भारतात प्राचीन काळापासून परंपरागत शेण आणि गोमूत्र यांच्या साहाय्याने केली जाणारी निसर्गानुकूल शेती उद्ध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांना ही खते आणि कीटकनाशके वापरायला लावणे  अन् बहुराष्ट्रीय आस्थापनांना लाभ करून देणे हेही ब्रिटीशकाळापासून चालत आलेले एक मोठे आंतरराष्ट्रीय षड्यंत्रच आहे !


१. विकसित देशांचा रसायनांचा व्यापार म्हणजे मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार !

रसायन अर्थात् पिकांवरील रोगप्रतिबंधक जंतूनाशकांच्या वापरास विकसित देशांमध्ये बंदी आहे. जड धातूंच्या मानवी आरोग्यावरील गंभीर परिणामांची कल्पना असूनही आज जगात ७० सहस्र विविध प्रकारच्या रसायनांची निर्मिती विकसित देशांत केली जाते. या घातक रसायनांतून उगम पावणारे असंख्य घटक मानवाच्या अन्नसाखळीत विविध स्तरांवर प्रवेश करतात. हे घातक रसायनांचे विष विकसनशील राष्ट्रांना पाजून प्रतिवर्षी विकसित राष्ट्रे १२ अब्ज डॉलर्स मिळवतात.

२. जंतूनाशकातील रसायनाला तोंड देणाऱ्या कीटकांच्या नवीन पिढ्या निर्माण होत असल्याने जंतूनाशकांचा वापर निरर्थक !

पिकांवरील रोगांना प्रतिबंध करण्यासाठी घातक रसायनांपासूनच जंतूनाशकांची सरसकट निर्मिती केली जाते. त्यामुळे त्या जंतूंमध्ये संबंधित रसायनाला तोंड देण्याची प्रतिकारशक्ती निर्माण होऊन पुनरुत्पादित कीटकांच्या नवनवीन पिढ्या निर्माण होतात. त्यामुळे कीटकनाशकांचे उत्पादन हा निरर्थक उपाय केवळ विकसित राष्ट्रांच्या अर्थकारणासाठी अवलंबला जात आहे.

३. भूमी, पीक आणि अन्नाचे पोषणमूल्य यांवर विपरीत परिणाम करणारी रासायनिक खते !

केवळ उत्पादनाच्या हव्यासापोटी नत्र (नायट्रोजन), पालाश आणि स्फुरद युक्त यांसारख्या रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यामुळे भूमीतील रासायनिक संतुलन बिघडून भूमीची उत्पादकता, त्या भूमीवर येणारे पीक आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अन्नाचे पोषणमूल्य यांवर विपरीत परिणाम होतो. रासायनिक खतांचा अतिरेकी वापर झालेल्या भूमी आता कोणत्याही प्रकारच्या पिकासाठी अयोग्य ठरल्या आहेत.

४. उपयुक्त कीटक आणि सूक्ष्म जंतू नष्ट करणारी कीटकनाशके !

कीटकनाशकांच्या फवारणीमुळे हानीकारक कीटकांसह उपयुक्त कीटक तर मारले जातात; परंतु त्यासह भूमीतील उपयुक्त असे गांडूळ आणि क्रियाशील सूक्ष्म जंतूही नाहीसे होतात; जे पिकांसाठी अत्यावश्यक असतात.

५. जंतूनाशके, विविध धातू आणि रसायने यांमुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम !

अ. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी वापरण्यात येणारी ‘डीडीटी’, ‘डाएल्ड्रीन’ यांसारखी अनेक प्रकारची जंतूनाशके विशेषतः नवजात बालकांत व्यंग निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतात. अशा जंतूनाशकातील पारा, शिसे, कॅडमियम, क्रोमियम आणि निकेल यांसारख्या धातूंमुळे कर्करोगसदृश रोगांचा प्रसार होण्याची शक्यता बळावते. एका अमेरिकन शास्त्रज्ञाच्या मते, जगातील ८० टक्के कर्करोगास प्रदूषित वातावरण, भूमी आणि पाणी यांद्वारे सिद्ध झालेले अन्न कारणीभूत ठरते.

आ. ‘ऑक्सफॅम’ या संस्थेद्वारे केल्या गेलेल्या एका अभ्यासानुसार वर्ष १९८१ मध्ये कीटकनाशकांच्या प्रभावामुळे मरण पावलेल्या लोकांची संख्या ७५ सहस्र होती.

इ. नद्यांमधील छोट्या माशांच्या चरबीत हळूहळू वसणारे ‘डीडीटी’चे सूक्ष्म घटक त्यांना खाणाऱ्या मोठ्या माशांद्वारे पक्षी आणि मानव यांच्या शरिरात प्रवेश करतात.

ई. पारा आणि शिसे यांच्या प्रभावामुळे मानवाच्या केंद्रीय मज्जासंस्थेवर विपरीत परिणाम होतो.

उ. निकेल आणि ‘बेरेलियम’मुळे फुफ्फुसांचे कार्य बंद पडू शकते.

ऊ. ‘अँटीमनी’मुळे हृदयविकार बळावतो.

ए. ‘कॅडमियम’मुळे मूत्रपिंड निकामी होऊ शकतात.