ओल्या कचऱ्याचा पुनर्वापर !

१. ओल्या कचऱ्याचा संपूर्ण पुनर्वापर कसा कराल ?

अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळे घरच्याघरी घेण्यासाठी ओल्या कचऱ्याचा वापर करू शकतो. सज्जात किंवा आगाशीत भाज्या आणि फळे लावण्यासाठी फुटक्या बादल्या, फुटके माठ, खत किंवा सिमेंट पिशव्या यांचा वापर करू शकतो.

अ. घरातील स्वयंपाकाचा कचरा (भाजीचे देठ, फळांच्या साली वगैरे) पाटावर किंवा मिश्रकामध्ये (मिक्सरमध्ये) वाटून त्याची चटणी करावी. या चटणीचा वापर घराच्या सज्जात ठेवलेल्या कुंडीत केल्यास, रोपे भराभर वाढतात आणि त्यांना दुसऱ्या विशिष्ट खतांची आवश्यकता भासत नाही.

आ. अशा प्रकारे कुंडीत लावलेल्या रोपांना अर्धी तपेली एवढेच पाणी पुरेसे असते. हे पाणीसुद्धा तांदूळ किंवा भाज्या धुतलेले, असे कोणतेही असले, तरी वापरता येईल. केवळ धुण्या-भांड्याचे पाणी वापरू नये; कारण त्यात साबणाचे पाणी असते.

२. सोसायट्यांनी सामूहिकरित्या करावयाचे प्रयत्न

प्रत्येक सोसायटीने आगाशीत अशा प्रकारे भाजीपाल्यांचे उत्पादन घ्यावे. यातून प्रत्येक सदनिकाधारकाला प्रतिदिन ३००-३५० ग्रॅम भाजी मिळू शकेल. त्यासाठी प्रत्येक सदनिकाधारकाने स्वतःच्या घरातील ओल्या कचऱ्याची चटणी करून ती रोपाभोवती पसरण्यास द्यावी. प्रत्येक सदनिकेतील ओल्या कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण होईल. अशा प्रकारे ओल्या कचऱ्याचा वापर करून घरच्या घरी भाजीपाला सिद्ध करा.

– श्रीकृष्ण भागवत, मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२. (‘दैनिक लोकसत्ता’, १९.२.२०११)