केंद्रशासनाने स्वीकारलेली ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’ची पद्धती !

केंद्रशासनाच्या सर्व तज्ञांच्या अभ्यासाअंती त्यांनी विदर्भातील पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी सांगितलेल्या नैसर्गिक शेतीच्या पद्धतीचा पुरस्कार केला आहे. मोदी शासनाच्या पहिल्या अर्थसंकल्पात श्री. पाळेकर यांनी सांगितलेल्या नैसर्गिक म्हणजेच ‘झिरो बजेट’ शेतीसाठी तरतूद करण्याचे घोषित केले होते. आच्छादन, वाफसा, जीवामृत आणि बीजामृत ही ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’ तंत्राची मूलतत्त्वे आहेत. त्याची माहिती लेखातून पाहू.

श्री. सुभाष पाळेकर

१. आच्छादन म्हणजे काय ?

केळीच्या झाडाभोवती गवताचे केलेले आच्छादन

‘भूमीच्या पृष्ठभागाला झाकणे’; म्हणजे ‘आच्छादन’ होय. भूमीची सजीवता आणि सुपीकता टिकवून ठेवण्याचे कार्य आच्छादन करते. आच्छादनामुळे भूमीतील सूक्ष्म जिवाणू आणि गांडूळ यांच्या कार्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण होते. यामुळे माती सुपीक आणि भुसभुशीत होते, तसेच मातीत सर्व प्रकारच्या जिवाणूंची संख्या वाढण्यास साहाय्य होते.

२. आच्छादनाचे प्रकार

२ अ. काष्ठ आच्छादन : झाडाच्या अथवा रोपाच्या आजूबाजूचा भूमीचा पृष्ठभाग सुकलेला पालापाचोळा, वाळलेल्या काड्या, नारळाच्या शेंड्या, धान्याची टरफले, उसाची चिपाडे, स्वयंपाकघरातील ओला कचरा आदींच्या साहाय्याने झाकणे याला ‘काष्ठ आच्छादन’ म्हणतात. हे साडेचार इंच जाडीचे करू शकतो; मात्र स्वयंपाकघरातील ओला कचरा पसरतांना एका वेळी एका ठिकाणी एक इंचापेक्षा अधिक जाड पसरू नये. आच्छादनावर आठवड्यातून किंवा १५ दिवसांतून एकदा १० पट पाण्यात पातळ केलेले जीवामृत शिंपडले की, त्याची विघटनाची प्रक्रिया जलद होते आणि त्याचे ‘ह्यूमस’मध्ये (म्हणजे काळ्या भुसभुशीत आणि सुपीक मातीत) रूपांतर होते. त्यामुळे काही दिवसांनी पुन्हा काष्ठ आच्छादन करावे लागते.

२ आ. सजीव आच्छादन : मुख्य पिकाच्या आजूबाजूला त्या पिकापेक्षा अल्प उंचीच्या दुसऱ्या पिकाची लागवड करणे’ म्हणजे ‘सजीव आच्छादन’, उदा. एका कुंडीमध्ये मध्यभागी टॉमेटोचे एक रोप लावले असतांना बाजूला शिल्लक जागेमध्ये मेथी, कोथिंबीर अशा पालेभाज्या अथवा मुळा, गाजर, बीट, कांदा, लसूण अशा कंदवर्गीय भाज्या घेणे. अशा प्रकारे आंतरपिकांनी अल्प जागेत अधिक उत्पन्न घेता येते आणि भूमीही आच्छादित रहाते. खरबूज, कलिंगड, भोपळा, कोहळा, रताळे असे काही वेल भूमीवर पसरवल्यामुळेही भूमीचे आच्छादन आपोआप होते.

३. आच्छादनाचे लाभ

अ. आच्छादनामुळे भूमीचे कडक ऊन, अतीथंडी, सोसाट्याचा वारा आणि पावसाचे थेंब यांपासून रक्षण होते.

आ. आच्छादन केल्याने ऊन आणि वारा यांचा मातीशी थेट संपर्क येत नाही. त्यामुळे मातीतील ओलावा दीर्घ काळ टिकतो आणि पाणी अल्प प्रमाणात लागते.

इ. आच्छादनामुळे गांडुळांच्या संख्येत वाढ होते. गांडूळ पक्ष्यांनी खाल्ले जाण्याच्या भीतीने दिवसा काम न करता केवळ रात्रीच काम करतात. आच्छादन केल्याने गांडूळ दिवसरात्र काम करतात. त्यांच्या हालचालींमुळे भूमी सच्छिद्र आणि भुसभुशीत रहाते अन् निराळी मशागत करण्याची आवश्यकता रहात नाही.

ई. आच्छादनातील नैसर्गिक घटकांचे विघटन होऊन ‘ह्यूमस’ निर्माण होण्याची प्रक्रिया सतत होत रहाते. यामुळे झाडांना भरपूर जीवनद्रव्ये उपलब्ध होऊन ती सशक्त आणि बलवान होतात.

उ. सजीव आच्छादन करतांना मुख्य पीक एकदल असेल, तर आंतरपीक द्विदल आणि मुख्य पीक द्विदल असेल, तर आंतरपीक एकदल असे नियोजन केल्यास द्विदल पिकांच्या मुळांतून भूमीत नत्राचा (नायट्रोजनचा) पुरवठा होत रहातो. (ज्यांची डाळ बनते ते धान्य द्विदल, तर इतर एकदल प्रकारात येतात.)

ऊ. आच्छादनामुळे ‘ह्यूमस’चे कण हवेसह उडून जात नाहीत, तसेच तीव्र उन्हाने करपतही नाहीत. मातीची सजीवता टिकते.

ए. दुष्काळी परिस्थितीमध्ये आच्छादन हवेतून ओलावा शोषून घेते. त्यामुळे झाडे अल्प पाणी मिळूनही हिरवीगार रहातात.

ऐ. आच्छादनामुळे भूमीत आपोआप आवश्यक तेवढाच ओलावा रहातो आणि ‘वाफसा’ स्थिती सिद्ध होते.

सध्या सर्वच ठिकाणी ‘घन कचरा व्यवस्थापन’ ही सरकारी यंत्रणेसमोरील मोठी समस्या आहे. आच्छादनासाठी विनामूल्य मिळणारे हे सर्व नैसर्गिक घटक उपयोगांत आणून आपण एकप्रकारे पर्यावरण रक्षणासाठी आपल्या परीने हातभारच लावतो आणि त्याच्या मोबदल्यात निसर्ग आपल्याला विषमुक्त अन् सकस भाजीपाला, तसेच फळे भरभरून देतो.

१. वाफसा म्हणजे काय ?

झाडाची मुळे

भूमीत दोन मातीकणांच्या मधल्या पोकळीत पाण्याचे अस्तित्व न रहाता ५० टक्के वाफ आणि ५० टक्के हवा यांचे संमिश्रण असणे याला ‘वाफसा’ म्हणतात. ‘वाफसा’ असेल, तरच झाडांची मुळे प्राणवायू आणि पाणी यांची आवश्यकता पूर्ण करू शकतात. झाडाच्या मुळांना आणि मातीतील विविध जिवाणूंना जगण्यासाठी हवेची आवश्यकता असते. त्यामुळे मातीत हवा खेळती रहाणेही आवश्यक असते. वाफसा स्थितीमध्ये या दोन्ही गोष्टींची पूर्तता होते. सोप्या शब्दांत सांगायचे म्हणजे ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’तंत्रात आपल्याला भूमीत केवळ ओलावा टिकवून ठेवायचा असतो. अतिरिक्त पाण्याचा मारा करायचा नसतो.

वाफसा घेणारी मुळे कुठे असतात ?

कोणत्याही झाडाची दुपारी १२ वाजता जी सावली पडते; त्या सावलीच्या सीमेवर अन्नद्रव्ये आणि वाफसा घेणारी मुळे असतात. त्यामुळे झाडाच्या बुंध्याजवळ पाणी न देता ते सावलीच्या सीमेच्या ५-६ इंच बाहेर द्यावे. असे केल्याने मुळे त्यांना आवश्यक तेवढा वाफसा घेतात आणि अतिरिक्त ओलाव्याने मुळे कुजण्याची अथवा बुरशी लागण्याची शक्यता अल्प होते.


उत्पन्नात वाढ होण्यासाठी पाणी व्यवस्थापन कसे करावे ?

बुंध्यापासून ६ इंच दूर पाणी कसे घालावे ? याचे प्रात्यक्षिक

झाडाच्या बुंध्यापासून ६ इंच दूर पाणी दिल्याने झाडाची मुळे वाफसाचा शोध घेण्यासाठी लांबपर्यंत वाढतात. मुळांची वाढ चांगली झाली की, त्याचा थेट परिणाम खोडावर होतो आणि खोडाचा घेर वाढतो. खोडाचा घेर जितका अधिक, तेवढे पानांनी बनवलेले अन्न अधिकाधिक प्रमाणात खोडात साठवले जाते. त्यामुळे झाडाचा आकार, फाद्यांची संख्या यांत वाढ होते. या सर्वांचा परिणाम म्हणून झाडापासून मिळणारे उत्पन्न आपोआप वाढते. कुंडीतील थोडी माती घेऊन त्याचा लाडूसारखा गोळा होत असेल, तर पाण्याची आवश्यकता नाही. रोपांचे शेंडे मलूल झालेले दिसतात. अशा वेळी पाणी द्यावे. झाडांची पाण्याची आवश्यकता ऋतुमानानुसार पालटते. पावसाळ्यात अल्प, हिवाळ्यात १-२ दिवसाआड, तर उन्हाळ्यात मात्र नियमित पाणी द्यावे.

पाणी व्यवस्थापनासाठी लक्षात घ्यावयाची इतर सूत्रे

१. कुंडीतील अथवा वाफ्यातील माती भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा होणारी असावी. कुंडी भरतांना तळाला छिद्र आहे ना ? हे पहावे आणि त्या छिद्रावर खापराचा तुकडा अथवा दगड ठेवावा. यामुळे छिद्रातून माती वाहून न जाता केवळ पाणी बाहेर जाण्यास साहाय्य होते. यानंतर नारळाच्या शेंड्या, पालापाचोळा इत्यादी अधिक प्रमाणात घालून अल्प प्रमाणात माती घालावी आणि त्यात रोप लावावे. (रोपाच्या मुळांभोवती माती नसेल, तर रोप मातीतच लावावे; पालापाचोळ्यात लावू नये. मुळांभोवती मातीचा गड्डा असेल, तर त्याच्या भोवती पालापाचोळा पसरता येतो.) असे केल्याने पाण्याचा उत्तम निचरा होऊन अतिरिक्त ओलावा रहात नाही. माती पुष्कळ चिकट असेल, तर त्यात काही प्रमाणात वाळूही मिसळता येते.

२. पावसाळ्याच्या दिवसांत कुंड्यांमध्ये पाणी साचून रहात नाही ना ? याकडे नियमित लक्ष द्यावे. साठलेले पाणी कुंडी तिरकी करून लगेचच काढून टाकावे.

३. पाणी थेट नळीने न देता शक्यतो झारीने घालावे अथवा नळीला शॉवर लावून घालावे. झारी घरच्या घरीही सोप्या पद्धतीने बनवता येते. तेलाचा ५ लिटर क्षमतेचा रिकामा प्लास्टिकचा कॅन घ्यावा. त्याच्या झाकणाला १० – १५ लहान छिद्रे करावीत. हा कॅन पाणी घालण्यासाठी झारीप्रमाणे वापरता येतो.

४. वाफसाची स्थिती योग्य प्रकारे टिकून रहाण्यासाठी आच्छादन पुष्कळ साहाय्यक ठरते. त्यामुळे आच्छादन (भूमीच्या पृष्ठभागाला झाकणे) योग्य प्रकारे केले आहे ना ? याकडे लक्ष द्यावे.

पाण्याची निर्मिती करणे आपल्याला शक्य नाही; परंतु उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणे आपल्या हातात आहे. अशा प्रकारे पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास अल्प प्रमाणात पाण्याचा वापर करूनही उत्तम लागवड करता येते. ‘आच्छादन’ आणि त्यामुळे सिद्ध झालेले ‘ह्यूमस’ यांच्याद्वारे हवेतील आर्द्रता (बाष्प) खेचून ती मुळांना उपलब्ध होण्याची क्रिया सतत होत रहाते. त्यामुळे झाडाच्या एकूण पाण्याच्या आवश्यकतेतील केवळ १० टक्केच पाणी आपल्याला पुरवावे लागते. त्यामुळेच ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीतंत्रा’चा अवलंब करणे आपत्काळातही ‘संजीवनी’ असल्याचे सिद्ध होते !

घनजीवामृत म्हणजे काय ?

जीवामृताचे घन स्वरूप सुकवले जाते. उन्हात वाळवलेल्या २०० किलो शेणात ताजे बनवलेले २० लिटर जीवामृत २ दिवस सावलीत ठेवतात. नंतर उन्हात सुकवून त्याची वस्त्रगाळ माती बनवतात. ते शेतात नैसर्गिक खत म्हणून घालावे.

बीजामृत म्हणजे काय ?

बीजामृत बियाणाला लागणाऱ्या रोगांपासून वाचवते. त्याची अंकुरण्याची क्षमता वाढवते. देशी गायीचे ५ किलोग्रॅम शेण, ५ लिटर गोमूत्र, ५० ग्रॅम थंड चुना आणि थोडीशी माती २० लिटर पाण्यात मिसळून बीजामृत बनते, ते १ रात्र ठेवावे लागते. त्यानंतर १०० किलो बियाणांवर त्याचा संस्कार केला जातो (लावले जाते.)

अग्नीअस्त्र म्हणजे काय ?

अग्नीअस्त्र हे सिद्ध केलेले नैसर्गिक रसायन म्हणजे कीड आणि रोग नियंत्रणाचा प्रभावी पर्याय आहे. यात ५ किलोग्रॅम कडुनिंबाची पाने किंवा स्थानिक रोपट्याची पाने, २० लिटर देशी गायीचे गोमूत्र, ५०० ग्रॅम तंबाखूची पावडर, ५०० ग्रॅम हिरवी मिरची, ५० ग्रॅम लसूण पेस्ट (वाटण) मंद आचेवर उकळून ४८ घंटे ठेवले जाते. सकाळ-संध्याकाळ २ वेळा ढवळावे. २०० लिटर पाण्यात प्रति ६ लिटर मिसळून १ एकरात ते शिंपडायचे. त्यामुळे कीड आणि रोग यांपासून रक्षण होते.