अनधिकृत ध्वनीक्षेपकांवर कारवाई करण्याची चेतावणी !
संभाजीनगर – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या येत्या १ मे या दिवशी घेण्यात येणार्या सभेपूर्वीच मनसेच्या चेतावणीचे पडसाद दिसू लागले आहेत. ‘राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे ३ मेपर्यंत हटवा’, अशी चेतावणी राज ठाकरे यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर २० एप्रिल या दिवशी येथील पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी नवे आदेश लागू केले आहेत. शहरात कुठेही भोंगे लावायचे असतील, तर कायदेशीर अनुमती घ्यावी. अनधिकृत ध्वनीक्षेपक लावल्यास कारवाई केली जाईल, अशी चेतावणी दिली आहे.
पोलीस आयुक्तांचे आदेश काय आहेत ?
पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता म्हणाले की, ध्वनीक्षेपकाच्या संदर्भात वर्ष २००५ मध्ये सर्वाेच्च न्यायालय आणि राज्य सरकारने जो काही अध्यादेश काढला आहे, त्यानुसार अनुमतीविना ध्वनीक्षेपक लावता येत नाही. ध्वनीक्षेपक लावण्याच्या काही अटी आहेत. त्यामुळे आम्ही आवाहन करत आहोत की, ज्यांनी ध्वनीक्षेपक लावले आहेत, त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यांत अर्ज देऊन ध्वनीक्षेपक नियमितीकरण करून घ्यावेत. आम्ही त्यात योग्य ती अनुमती देण्यास सिद्ध आहोत; मात्र अनधिकृत ध्वनीक्षेपक लावल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यामुळे सर्वांनी पोलीस ठाण्यांशी संपर्क साधावा. अर्ज देऊन ध्वनीक्षेपक लावण्याची अनुमती घ्यावी, तसेच सामाजिक माध्यमांतून कुणीही तेढ निर्माण होईल, असे संदेश इतरांना पाठवू नयेत. याची सायबर पोलीस ठाण्याला माहिती द्या, कारण अशा प्रकारचे संदेश सिद्ध करणे आणि इतरांना पाठवणे हा गुन्हा आहे. यात ३ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. आपल्याला समाजात शांतता ठेवायची आहे.