‘विरामचिन्हे’ आणि त्यांचे भाषेतील कार्य !

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

‘प्राचीन काळी संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र त्याचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

मागील लेखात आपण ‘विरामचिन्हे म्हणजे काय ?’ आणि ‘पूर्णविराम’ यांविषयी जाणून घेतले. आजच्या लेखात ‘अर्धविराम’ या विरामचिन्हाची माहिती घेऊ.

(लेखांक ८ – भाग २)

‘अर्धविराम’ आणि तो वापरण्याची पद्धत !

२ आ. अर्धविराम : ‘हा ‘;’ या चिन्हाने दर्शवतात. ‘लिखित भाषेत अर्धविराम कुठे द्यावा ?’, हे जाणून घेण्यासाठी प्रथम ‘अव्यय’ आणि ‘उभयान्वयी अव्यय’ म्हणजे काय ?’, हे थोडक्यात समजून घेणे आवश्यक आहे.

२ आ १. ‘अव्यय’ म्हणजे वाक्यातील ‘विभक्तीचे प्रत्यय न लागणारा आणि वाक्यरचना कितीही पालटली, तरी कधीही न पालटणारा विशिष्ट शब्द असणे’ : वाक्यातील एखाद्या विशिष्ट शब्दाला ‘स’, ‘ला’, ‘ने’, ‘चा’, ‘ची’, ‘चे’ इत्यादी विभक्तीचे प्रत्यय लागत नाहीत. त्याचसह संबंधित वाक्य कसेही पालटले, म्हणजे वाक्यातील व्यक्ती, वस्तू यांची नावे, तसेच त्यांचे लिंग यांत कसाही पालट केला, तरी तो विशिष्ट शब्द मात्र जसाच्या तसा रहातो. त्याच्यात कोणताही पालट होत नाही. अशा शब्दाला ‘अव्यय’ असे म्हणतात. याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

‘तो हळू बोलतो’, या वाक्यातील ‘हळू’ या शब्दाला विभक्तीचा कोणताही प्रत्यय लागू शकत नाही. त्याचसह हे वाक्य पालटून ‘ती हळू बोलते’, ‘ते हळू बोलतात’ किंवा ‘त्या हळू बोलतात’, असे कसेही लिहिले, तरी त्यातील ‘हळू’ या शब्दात कोणताही पालट होत नाही. त्यामुळे ‘हळू’ या शब्दाला ‘अव्यय’ असे म्हणतात. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत. या सर्व वाक्यांच्या पुढे कंसात त्या वाक्यांतील अव्यये दिली आहेत.

अ. त्यांची वारंवार भेट होई. (वारंवार)
आ. ती झटकन उभी राहिली. (झटकन)
इ. अशोक भरभर चालतो. (भरभर)
ई. पैसे वाया गेले. (वाया)
उ. आईने आतून लाडू आणला. (आतून)

२ आ २. दोन वाक्यांना जोडणार्‍या अव्ययांस ‘उभयान्वयी अव्यये’ असे म्हणत असणे : अव्यये विविध प्रकारची असतात; मात्र आपण या लेखात केवळ ‘उभयान्वयी अव्ययां’चाच विचार करणार आहोत. ‘सागर देवळात गेला आणि त्याने देवाला प्रार्थना केली’, हे एक वाक्य आहे; परंतु खरेतर ही ‘आणि’ या शब्दाने जोडली गेलेली दोन स्वतंत्र वाक्ये आहेत. ‘आणि’ हा शब्द वरील सूत्र क्र. ‘२ आ १’मध्ये दिल्याप्रमाणे ‘अव्यय’ आहे. अशा दोन वाक्यांना जोडणार्‍या अव्ययास ‘उभयान्वयी अव्यय’ असे म्हणतात. उभयान्वयी अव्यये ज्याप्रमाणे दोन वाक्यांना जोडतात, त्याचप्रमाणे दोन शब्दांनाही जोडतात. ‘अन्’, ‘अथवा’, ‘वा’, ‘परी’, ‘की’ अशी विविध प्रकारची उभयान्वयी अव्यये मराठी भाषेत आहेत. त्यांपैकी ‘दोन वाक्ये जोडतांना पहिल्या वाक्यानंतर ‘अर्धविराम’ द्यावा’, असा नियम असणार्‍या पुढील अव्ययांविषयीच आपण जाणून घेणार आहोत.

२ आ ३. दोन वाक्ये जोडतांना पहिल्या वाक्यानंतर अर्धविराम दिला जातो, अशी उभयान्वयी अव्यये : जेव्हा दोन वाक्ये ‘पण’, ‘परंतु’, ‘म्हणून’, ‘कारण’ आणि ‘मात्र’ या उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात, तेव्हा त्या वाक्यांतील पहिल्या वाक्यानंतर अर्धविराम लिहिला जातो. याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

अ. अमित पुस्तक पालटायला गेला होता; पण ग्रंथालय बंद होते.
आ. त्यांनी मुकुलला पुष्कळ चिडवले; परंतु तो शांत राहिला.
इ. पुंडलिकाने आई-वडिलांची अथक सेवा केली; म्हणून साक्षात् विठ्ठलाने त्याला दर्शन दिले.
ई. पांडव विजयी झाले; कारण श्रीकृष्ण त्यांच्या बरोबर होता.
उ. जाई सर्व स्पर्धांमध्ये भाग घेते; मात्र अभ्यासाकडे दुर्लक्ष करते.

२ आ ४. अपूर्ण वाक्ये परस्परांना जोडून त्यांचे एक वाक्य बनवतांना प्रत्येक वाक्यानंतर अर्धविराम दिला जात असणे : ‘घोर अरण्यांमध्ये तपश्चर्या करणारे ऋषिमुनी; वाघ, सिंह, विषारी सर्प ज्यांना सहज वश होतात, असे सिद्धपुरुष; बाह्य साधने नसतांना तारे, नक्षत्र आणि ग्रह यांविषयी अचूक विवेचन करणारे आचार्य अन् संत, हे भारताचे वैभव आहे’, या वाक्यामधील पहिली दोन वाक्ये अपूर्ण आहेत. त्यांच्या शेवटी त्यांचे अर्थ पूर्ण करणारे शब्द नाहीत. अशी वाक्ये परस्परांना आणि उरलेल्या पुढील वाक्याला जोडतांना त्यांच्या शेवटी अर्धविराम द्यावा. याचे आणखी एक उदाहरण पुढे दिले आहे.

उद्या नाना-नानी चिपळूणला; मामा, मामी आणि प्रवीण कुडाळला; राजा आणि संजय खेडला अन् आमचा संजयदादा मुंबईला जायला निघणार आहेत.’

(क्रमशः पुढील शनिवारी)

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.३.२०२२)