वाचकांच्या दृष्टीकोनातून असे आहे ‘सनातन प्रभात’ !

राष्ट्र धर्माचा दृष्टीकोन विकसित झालेला ‘सनातन प्रभात’ चा वाचकवर्ग ही सनातन धर्माची शक्ती ! – संपादक 

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये गोहत्या, धर्मांतर, विचार, आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार, औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन, अग्निहोत्र, भाषाशुद्धी, शिक्षण, महान हिंदु संस्कृती यांवर आणि सर्वांगाने विचार करणारे लिखाण प्रसिद्ध होत असते. यामुळे वाचकांना दैनिकाविषयी आपलेपणा वाटतो. वाचक दैनिक ‘सनातन प्रभात’ केवळ वाचत नाहीत, तर त्यावर मनन आणि चिंतनही करत आहेत.

‘सनातनचे कार्य हे ईश्वरी कार्य आहे’, असेही पुष्कळ वाचक मानतात. त्यामुळे त्यांच्याकडून आपसूकच सनातनला पाठिंबा मिळतो. वाचक सनातनच्या पाठीशी ठामपणे उभे असल्यानेच ‘सनातन प्रभात’ची वाटचाल अविरत चालू ठेवणे शक्य होत आहे. अशा काही वाचकांचे निवडक अभिप्राय येथे देत आहोत.

हिंदुत्वावरील कोणताही आघात केवळ ‘सनातन प्रभात’ निर्भीडपणे प्रसारित करते ! – वामनराव जोशी, सेवानिवृत्त प्राचार्य, मोखारे महाविद्यालय, नागपूर.

मी दैनिक ‘सनातन प्रभात’चा अनेक वर्षांपासूनचा नियमित वाचक आहे. कोणत्याही विचारसरणीचे विज्ञापन मिळवून हे नियतकालिक चालवले जात नाही. त्यामुळे खर्‍या अर्थाने निर्भीड पत्रकारिता म्हणून ‘सनातन प्रभात’ला सर्वत्र मान्यता आहे. आपल्या देशात अनेक लोकांना हिंदुत्वाविषयी अकारण अपसमज निर्माण करण्याची सवय लागली आहे. हिंदुत्वावर होणारा कोणताही आघात फक्त ‘सनातन प्रभात’ निर्भिडपणे प्रसारित करते. ‘सनातन प्रभात’चा कोणताही अंक तुम्ही वाचा, त्यात केवळ आणि केवळ राष्ट्रभक्ती अन् हिंदुत्व यांविषयीचे विचार मांडलेले दिसतील. फक्त ‘सनातन प्रभात’मध्येच निर्भिडपणे लिखाण केले जाते. देशातील हिंदुत्वनिष्ठ साधूसंतांचा योग्य सन्मान ‘सनातन प्रभात’मधील लिखाणातून व्यक्त होतो.

सूक्ष्म जगताविषयाची माहिती आणि सूक्ष्म परीक्षण हे ‘सनातन प्रभात’चे मोठे वैशिष्ट्य ! – चिंतामणी जोशी, हितचिंतक, नागपूर. (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)

दैनिक ‘सनातन प्रभात’ची पत्रकारिता ही निर्भय पत्रकारिता आहे. इतर नियतकालिकांतून असा निर्भीडपणा दिसत नाही. सूक्ष्म जगताविषयी जी माहिती ‘सनातन प्रभात’मधून मिळते, ती इतर नियतकालिकांतून मिळत नाही आणि त्यांना सूक्ष्मातील काही कळतही नाही. स्वतः परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले सूक्ष्म जगताविषयी सर्व जाणतात. सूक्ष्मातून जाणणारे सद्गुरु, संत आणि साधक त्यांनीच निर्माण केले आहेत. सूक्ष्म जगताविषयाची माहिती आणि सूक्ष्म परीक्षण, हे ‘सनातन प्रभात’चे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे. जे पैसे देतात, त्यांच्याविषयी इतर नियतकालिकांतून लिहिले जाते. ‘सनातन प्रभात’मधूनच निर्भीडपणे सूक्ष्मजगत, तसेच धर्म आणि राष्ट्र यांविषयीचे लिखाण आढळून येते.

युवा पिढीसाठी ‘सनातन प्रभात’ अतिशय योग्य आणि प्रभावी मार्गदर्शक आहे ! – सौ. संपदा जोशी, अमरावती

‘सनातन प्रभात’मधील बालसंस्काराचे महत्त्व आणि संस्कार यांमुळे बालकांवर चांगला प्रभाव होतो, हे लक्षात आले. मुलांमध्ये चांगला पालट झाला आहे. सण, रूढी आणि परंपरा यांविषयीचे शास्त्र मला समजले. ‘सनातन प्रभात’च्या वाचनाने आजच्या युवा पिढीला चांगले संस्कार, विचार आणि दिशा मिळाली. हिंदु धर्माची महानता लक्षात आली. युवा पिढीसाठी ‘सनातन प्रभात’ अतिशय योग्य आणि प्रभावी मार्गदर्शक आहे. भक्तीभाव, राष्ट्र आणि धर्मप्रेम वाढवणारे विचार युवा पिढीवर चांगला परिणाम करत आहेत.

राष्ट्र आणि धर्म यांवरील लेख वाचून हिंदूंमध्ये जागृती होत असल्याचे जाणवते ! – सौ. रूपाली सिधनकर, अकोला.

मी गेल्या १० वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’ आवडीने आणि परिपूर्ण वाचते. पूर्वी अन्य वर्तमानपत्रे वाचत असे. आता इतर कोणतीही नियतकालिके वाचाविशी वाटत नाहीत. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये समाजाला उपयुक्त असेच लिखाण असते आणि ते परखडपणे लिहिले जाते. राष्ट्र आणि धर्म यांवरील लेख वाचून हिंदूंमध्ये जागृती होत आहे’, असे जाणवते. पूर्वी ‘हिंदु’ शब्द उच्चारताच हिंदूंवरच विंचू पडल्यासारखे वाटत असे. आज ‘सनातन प्रभात’मुळे हिंदु राष्ट्राविषयी निर्भीडपणे चर्चा होतांना दिसते.

आध्यात्मिक प्रगती करून हिंदु राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात वाचकांनी योगदान दिल्यास दैनिक ‘सनातन प्रभात’चा उद्देश साध्य होईल ! – अजित जोशी, चुनाभट्टी, मुंबई

दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे राष्ट्र आणि धर्म यांविषयी सखोल माहिती सोप्या शब्दांत मिळते. यामुळे धर्माचा अभिमान अंगी रूजतो, राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया मनात खोलवर रुजते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आम्हा वाचकांची नाळ सनातन वैदिक धर्माशी आपोआप जोडली जाते. दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतांना सत्संग मिळतो. परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु, संत-महंत आणि साधक आदी सर्वांचे मार्गदर्शन एकाच ठिकाणी लाभते. यापेक्षा मोठी गोष्ट कोणती ? सद्गुरूंची ही कृपाच आहे. सनातनचे साधक अथक परिश्रम घेऊन प्रतिदिन दैनिक घरपोच देतात, हे विशेष आहे. व्यवहार आणि अध्यात्म यांची सांगड कशी घालावी ? याची शिकवण ‘सनातन प्रभात’मधून मिळते. यातून बोध घेऊन आपणही हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घेत समष्टी साधनेचा अंगीकार करायला हवा, तरच दैनिक ‘सनातन प्रभात’चा उद्देश साध्य होईल.

दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे मुलांवर चांगले संस्कार होत आहेत ! – सौ. अपर्णा भंडारे, खारघर, नवी मुंबई

इयत्ता १० वीत असल्यापासून मी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन चालू केले. पुढे लग्न झाल्यावर मी सासरीही दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू केले. त्यामुळे साधना, राष्ट्र-धर्म यांवरील आघात, अध्यात्म, हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व यांविषयीचे मार्गदर्शन मिळते. दैनिकामुळे मुलांवरही चांगले संस्कार होत आहेत. दैनिकाच्या वाचनामुळेच माझा साधनेतील प्रवास चालू झाला आणि जीवनाला कलाटणी मिळाली.

स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया, आध्यात्मिक पातळी आणि आध्यात्मिक उपाय यांविषयी अन्य कुठेही न मिळणारे ज्ञान मिळाले ! – गिरीश जोशी, रामनाथ (अलिबाग), रायगड

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनामुळे माझ्या मुलांवर चांगले संस्कार झाले. मला अध्यात्म, राष्ट्र-धर्म यांविषयी माहिती मिळालीच; परंतु आध्यात्मिक उपाय, आध्यात्मिक पातळी, स्वभावदोष निर्मूलन यांविषयी अन्य कुठेही न मिळणारे ज्ञान मिळाले. दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे खर्‍या अर्थाने हिंदु धर्म आणि मनुष्यजन्म यांचे महत्त्व समजले.

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आपत्काळाविषयीच्या प्रसिद्ध झालेल्या माहितीचा लाभ झाला ! – सौ. हेमलता भोसले, कोलशेत, ठाणे

औषधी वनस्पती आणि भाज्या यांची लागवड कशी करावी ? आपत्काळात लागणार्‍या वस्तूंची साठवणूक कशी करावी ? आदी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आपत्काळाविषयी प्रसिद्ध झालेल्या माहितीचा पुष्कळ लाभ झाला. दैनिक सनातन प्रभातच्या साहाय्याने स्वतःवरील वाईट शक्तीचे आवरण काढल्यामुळे होणारा लाभ मी अनुभवला.