सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !
‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.’ प्राचीन काळी संस्कृत ही आर्यावर्तातील ज्ञानभाषा आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. पुढे संस्कृतपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या भाषांचे व्याकरणही स्वतंत्रपणे लिहिले गेले; मात्र त्याचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच होता. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे. मागील लेखात आपण ‘व्यंजनसंधी’चे उर्वरित प्रकार पाहिले. आजच्या लेखात ‘विसर्गसंधी’विषयी जाणून घेऊ.
(लेखांक ७ – भाग ६)
शब्दांना सांधून (जोडून) त्यांचा जोडशब्द बनवणारा ‘संधी’ !
४. संधीचे प्रकार
४ इ. विसर्गसंधी
४ इ १. ‘विसर्ग’ म्हणजे काय ? : ‘विसर्ग’ हा मराठी भाषेतील एकूण ४८ वर्णांपैकी एक वर्ण आहे. मुळाक्षरांमध्ये लिहितांना तो ‘अः’ असा लिहिला जातो. या ‘अः’मधील एकाखाली एक असलेली दोन टिंबे (:) म्हणजे विसर्ग होय. भाषेमध्ये विसर्गाच्या आधी नेहमीच कोणता ना कोणता स्वर येतो, उदा. ‘काः’ या अक्षरात विसर्गाच्या आधी ‘क् + आ’ याप्रमाणे ‘आ’ हा स्वर आला आहे; म्हणून विसर्गाला ‘स्वरादी (स्वर आहे ज्याच्या आदी, म्हणजे आधी असा तो)’, असे म्हणतात. विसर्गाचा उच्चार करतांना ‘ह्’ या वर्णाला थोडा हिसडा दिल्याप्रमाणे उच्चार केला जातो.
४ इ २. विसर्गसंधीचे प्रकार
४ इ २ अ. विसर्गाच्या आधी ‘अ’ हा स्वर असणे आणि विसर्गानंतर ‘मृदू वर्ण’ असणे : आपण जाणतोच की, मराठी भाषेतील ३४ व्यंजनांपैकी पहिल्या २५ व्यंजनांचे पुढील पाच गट पडतात. पुढे दिलेल्या या गटांची अवतरणचिन्हांत दिलेली पहिली अक्षरे हे एक प्रकारे त्या गटांचे नायक असून त्या अक्षरांवरून ते गट ओळखले जातात.
‘क्’, ख्, ग्, घ्, ङ्
‘च्’, छ्, ज्, झ्, ञ्
‘ट्’, ठ्, ड्, ढ्, ण्
‘त्’, थ्, द्, ध्, न्
‘प्’, फ्, ब्, भ्, म्
‘अ’पासून ‘औ’पर्यंतचे बारा स्वर आणि व्यंजनांच्या ‘क्’, ‘च्’, ‘ट्’, ‘त्’ अन् ‘प्’ या पाच गटांपैकी प्रत्येक गटातील शेवटची तीन व्यंजने हे ‘मृदू वर्ण’ मानले जातात. त्यांच्यासह अन्य व्यंजनांपैकी ‘य्, र्, ल्, व्, ह् आणि ळ्’ हीदेखील ‘मृदू व्यंजने’ आहेत. आता ‘विसर्गसंधी’च्या पहिल्या प्रकाराविषयी एका उदाहरणाद्वारे जाणून घेऊ.
‘शिरोभाग’ या शब्दाची प्राथमिक फोड ‘शिरः + भाग = शिरोभाग’ अशी होते. आता प्रश्न असा पडतो की, ‘शिरः’चा ‘शिरो’ कसा झाला ?’ याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.
‘शिरः’ या शब्दामधील विसर्गाच्या आधी ‘र’ हे ‘अ’युक्त अक्षर आले आहे आणि विसर्गाच्या पुढे ‘भ’ हे मृदू व्यंजन आहे. यांचा संधी होतांना विसर्गाचा लोप होतो आणि त्याचे रूपांतर ‘उ’ या स्वरामध्ये होते. म्हणजे ‘शिरः + भाग = शिर + उ + भाग’ याप्रमाणे त्या शब्दाची फोड होते. ही फोड झाल्यानंतर ‘शिर’ यातील शेवटचा ‘अ’ आणि त्याच्या पुढील ‘उ’ हे परस्परांमध्ये मिसळून ‘ओ’ हा स्वर सिद्ध होतो. त्यामुळे ‘शिर’मधील ‘र’चा ‘रो’ होतो. अशा प्रकारे ‘शिरोभाग’ हा शब्द सिद्ध होतो. थोडक्यात समजून घ्यावयाचे, तर ही प्रक्रिया पुढीलप्रमाणे घडते.
शिरः + भाग = शिर + उ + भाग = शिरोभाग
याची आणखी काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
४ इ २ आ. विसर्गाच्या आधी ‘अ’ किंवा ‘आ’ हे दोन स्वर वगळून अन्य कोणताही स्वर असणे आणि विसर्गापुढे मृदू वर्ण असणे : ‘निरपराध’ या शब्दाची प्राथमिक फोड ‘निः + अपराध = निरपराध’ अशी होते. आता पुन्हा असे प्रश्न पडतात की, ‘निः’ आणि ‘अपराध’ या दोन्ही शब्दांमध्ये ‘र’ हे अक्षर नसतांना ‘निरपराध’मध्ये ‘र’ कुठून आला आणि ‘अपराध’मधील ‘अ’ कुठे गेला ?’ याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.
‘निः’ या अक्षरामध्ये विसर्गाच्या आधी ‘इ’कार आलेला आहे, तसेच विसर्गाच्या पुढे ‘अपराध’ या शब्दातील ‘अ’ हा मृदू वर्ण आला आहे. अशा स्थितीत संधी होतांना विसर्गाचा लोप होतो आणि त्याच्या जागी ‘र्’ हे मुळाक्षर येते. यानंतर ‘र्’ या मुळाक्षरात ‘अपराध’मधील ‘अ’ मिसळतो आणि ‘निरपराध’मधील ‘र’ हे अक्षर सिद्ध होते. म्हणजे ‘निरपराध’ या शब्दाची व्याकरणदृष्ट्या फोड पुढीलप्रमाणे होते.
निः + अपराध = नि + र् + अपराध = निरपराध
हा संधी होतांना अट एवढीच आहे की, ‘विसर्गाच्या आधी ‘अ’ किंवा ‘आ’ यांपैकी कोणताही स्वर असता कामा नये.’ या संधीची आणखी काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
४ इ २ आ १. विसर्गाच्या आधी ‘अ’ किंवा ‘आ’ हे दोन स्वर वगळून अन्य कोणताही स्वर असणे आणि विसर्गापुढे ‘र’ हे अक्षर असणे : ‘नीरव’ या शब्दाची फोड वर ‘सूत्र क्र. ४ इ २ आ’मध्ये दिलेल्या नियमानुसार ‘निः + रव = नि + र् + रव = नीरव’, अशी होते. यामध्ये ‘र् + रव’ असे दोन ‘र’ परस्परांजवळ येतात आणि त्यांचा संधी होतो. हा संधी होतांना पहिल्या (विसर्गामध्ये पालट होऊन आलेल्या) ‘र्’चा लोप होतो आणि त्याच्या आधी असलेले ‘नि’ हे र्हस्व अक्षर ‘नी’ असे दीर्घ होते. या प्रकारच्या संधीचे आणखी एक उदाहरण पुढे दिले आहे.
निः + रस = नि + र् + रस = नीरस’
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/554693.html
– सुश्री (कु.) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.२.२०२२)