प्रवेशबंदीचा आदेश डावलून पुणे जिल्ह्यातील लोहगडावर अवैध दर्गा उभारल्याचा धक्कादायक प्रकार उघड !

  • ऐतिहासिक वास्तूंचे ‘हिरवेकरण’ होऊ देणारा पुरातत्व विभाग विसर्जित करणे अपरिहार्य !

  • पुरातत्व विभागाने अवैध बांधकामासाठी गडाचे दरवाजे उघडले !

• गड-दुर्ग यांचे कि त्यांवरील अवैध दर्ग्यांचे संवर्धन करणारा पुरातत्व विभाग ? यास उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे ! – संपादक

• ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गांवर अतिक्रमण होऊ देणारा पुरातत्व विभाग आणि पोलीस हे हिंदवी स्वराज्याच्या शत्रूंचेच वंशज आहेत’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक

• छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गांचे एका पाठोपाठ एक इस्लामीकरण होत असतांनाही ते रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा ठोस पावले उचलत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक

(दर्गा म्हणजे मुसलमान सिद्धपुरुषाचे समाधीस्थळ)

लोहगडावर धर्मांधांनी केलेले अवैध बांधकाम

पुणे, १५ जानेवारी (वार्ता.) – दळणवळण बंदीच्या अंतर्गत राज्यात गड-दुर्ग येथे प्रवेशबंदीचा शासनआदेश असतांनाही तो डावलून लोहगडावर दर्ग्याचे अवैध बांधकाम करण्यात आले. विशेष म्हणजे प्रवेशबंदीचा आदेश असतांना पुरातत्व विभागाने या अवैध बांधकामासाठी गडाचे दरवाजे उघडले. त्यामुळे पुरातत्व विभाग गड-दुर्ग यांचे संवर्धन करण्यासाठी आहे कि ‘गडांवरील अवैध दर्ग्यांच्या संवर्धनासाठी ?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोनाच्या काळात लोहगडावरील अवैध थडग्याच्या भोवती ५-६ फूट उंचीच्या पक्क्या भिंती उभारण्यात आल्या आहेत. भिंतींचे काम पूर्ण झाले असून आता त्यावर केवळ छत टाकण्याचे काम शेष आहे. विशेष म्हणजे या भिंतींसाठी गडावरीलच दगड वापरण्यात आल्याची चर्चा आहे. पुरातत्व विभागाच्या पुणे येथील उपविभागीय कार्यालयातील अधिकारी आणि लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्या डोळ्यांदेखत गडावर हे अवैध बांधकाम चालू आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी यांनी गडाची पहाणी केली; मात्र या अवैध बांधकामावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. हा सर्व प्रकार पोलीस आणि पुरातत्व विभाग यांच्या मूकसंमतीने चालू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पुरातत्व विभाग आणि पोलीस यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे अवैध थडग्याचे दर्ग्यामध्ये रूपांतर आणि उरूसाचे आयोजन !

साधारण वर्ष २००० मध्ये हुसैन बाबा शेख यांनी लोहगडावर अवैध थडगे बांधले. त्यानंतर प्रतिवर्षी तेथे उरूस चालू केला. आता त्या ठिकाणी भव्य दर्गा उभारण्यात आला आहे. या वर्षी १७ आणि १८ जानेवारी या दिवशी येथील दर्ग्याच्या उरूसाच्या कार्यक्रमाचे निमंत्रणही देण्यात आले आहे.

गडावर उरूस करणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याची गडाच्या सुरक्षारक्षकाची मागणी; मात्र पोलिसांकडून नेहमीप्रमाणे दुर्लक्ष !

गडावर धार्मिक कार्यक्रम करण्यास बंदी असतांना हुसैन बाबा शेख यांनी गडावर धार्मिक कार्यक्रम केले. या प्रकरणी कायदेशीर कारवाई करावी, यासाठी लोहगडाचे  ‘स्मारक परिचर’ (पुरातत्व खात्याच्या कर्मचार्‍यांचे पद) किशोर जाधव यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस अधीक्षकांना १ फेब्रुवारी २०१९ या दिवशी पत्र पाठवले होते; मात्र पोलिसांनी नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष केले, तसेच गडावर अवैध बांधकाम चालू झाल्यानंतरही कारवाई केली नाही. पोलिसांना पत्र पाठणारे किशोर जाधव यांच्याऐवजी आता निकांत कुमार नावाच्या व्यक्तीची ‘स्मारक परिचर’ म्हणून पुरातत्व विभागाने नियुक्ती केली आहे; मात्र या सर्वांदेखत गडावर हे अवैध बांधकाम चालू आहे. (यावरून ‘पुरातत्व विभाग आणि स्थानिक पोलीस यांची हातमिळवणी झाली आहे’, असे समजायचे का ? – संपादक)

किशोर जाधव यांनी पोलिसांना दिलेले पत्र – 

(पत्र वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

अवैध बांधकामावर कारवाई नाही, उलट अवैध बांधकामाला विरोध करणार्‍या शिवप्रेमींना पोलिसांची दमदाटी !

या सर्व अवैध कामांच्या विरोधात स्थानिक शिवप्रेमींनी वेळोवेळी पोलीस आणि पुरातत्व विभाग यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत; मात्र त्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. गडावरील अवैध बांधकामांवर कारवाई करण्याची धमक नसलेले पोलीस तक्रार करणार्‍या स्थानिक शिवप्रेमींनाच दमदाटी करत आहेत. (अशा पोलिसांना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे, असेच जनतेला वाटते ! – संपादक) उरूसाच्या कालावधीत गडाच्या जवळपासही फिरकण्यास पोलिसांकडून शिवप्रेमींना आडकाठी केली जाते. जातीय तेढ निर्माण होण्याचे कारण देत ‘शिवप्रेमींची गळचेपी आणि अवैध धंद्यांकडे कानाडोळा’, असा प्रकार चालू आहे.

स्वत:ची ‘शिवसैनिक’ म्हणून ओळख निर्माण करून हुसैन बाबा शेख यांनी गडावर केले अवैध बांधकाम !

काही दिवसांपूर्वी हुसैन बाबा शेख यांचा मृत्यू झाला. काही वर्षांपूर्वी त्यांनी स्वत:ची ‘शिवसैनिक’ अशी ओळख निर्माण करून गडावर छोटे-मोठे उपक्रम राबवून गडाच्या एका बाजूला एक थडगे बांधले. तेव्हा त्यांनी त्या थडग्याजवळ एका वृद्ध फकिरांना आणून ठेवले होते. त्या वेळचे स्मारक परिचर जाधव यांनी त्या फकिरांना पिटाळून लावले होते; मात्र जाधव यांचे स्थानांतर झाल्यावर हे फकिर पुन्हा त्या थडग्याजवळ राहू लागले. काही वर्षांपूर्वी त्या फकिरांचा मृत्यू झाल्यावर बाबा हुसैन यांनी त्यांच्या नावाचेही थडगे गडावर बांधले. (धर्मांधांचा धूर्तपणा जाणा ! – संपादक)

गड-दुर्ग यांच्यावरील अवैध बांधकामाच्या विरोधात कारवाई न करणारे पोलीस आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी यांची वरिष्ठांकडे तक्रार करा अन् तक्रारीची प्रत दैनिक ‘सनातन प्रभात’लाही पाठवा !

शिवजयंतीच्या दिवशी गड-दुर्ग यांवर शिवजयंती साजरी करण्याला अनेक ठिकाणचे स्थानिक पोलीस विरोध करतात. पुरातत्व विभागाचे अधिकारी कार्यक्रमाला अनुमती देत नाहीत; मात्र हेच पोलीस आणि अधिकारी गड-दुर्गांवरील दर्ग्यांचे अवैध बांधकाम, अवैधपणे साजरा केला जाणारा उरूस यांकडे दुर्लक्ष करतात. असे पोलीस आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी यांची वरिष्ठांकडे तक्रार करा अन् त्याची प्रत दैनिक ‘सनातन प्रभात’ला पुढील ई-मेल पत्त्यावर पाठवा : [email protected]