सावंतवाडी – ‘व्हेल’ माशाच्या उलटीचा व्यापार करण्यास भारतात बंदी आहे. तरीही गोवा राज्यातून तस्करीसाठी आणलेली ‘व्हेल’ माशाची अनुमाने ५ किलो २३२ ग्रॅम वजनाची आणि अनुमाने ५ कोटी ३२ लाख २० सहस्र रुपये इतक्या किमतीची उलटी (अॅम्बरग्रीस) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तालुक्यातील बांदा येथील गांधीचौक येथे कह्यात घेतली. या प्रकरणी बांदा पोलिसांनी अटक केलेल्या गोवा राज्यातील तिघांना न्यायालयाने १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे.
(सौजन्य : Prudent Media Goa)
सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला ‘व्हेल’ माशाच्या उलटीची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ११ डिसेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता बांदा येथे सापळा रचला होता. त्या वेळी शहरात आलेल्या चारचाकी गाडीविषयी संशय आल्याने त्या चारचाकी गाडीची तपासणी केली; मात्र त्यात ‘व्हेल’ माशाची उलटी मिळाली नाही, तरीही पोलिसांनी गाडीतील कॉन्स्टंटिनो फर्नांडिस आणि जुजू जोस फेरीस (रहाणार सालसेत, मडगाव) या दोघांना कह्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्या दोघांनी तनिष उदय राऊत (वय १७ वर्षे, तोरसे-पेडणे, गोवा) याच्याकडे उलटी असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी कह्यात घेतलेल्या दोघांना त्या तनिषला संपर्क करून बांदा येथे बोलावून घेतले.
तनिष याने येतांना आणलेल्या पिशवीत सुंगदी पदार्थ पोलिसांना सापडला. त्यांनी त्या पदार्थाची वनखात्याच्या अधिकार्यांकडून निश्चिती करून घेतली असता प्राथमिक तपासात ती ‘व्हेल’ माशाची उलटी असल्याची पुष्टी दिली. त्यामुळे त्या तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला.