विश्‍व हिंदु परिषद २१ डिसेंबरपासून धर्मांतर, लव्ह जिहाद, भूमी जिहाद आदींविरुद्ध देशव्यापी ‘जनजागरण आंदोलन’ करणार !

केंद्रात आणि देशातील अनेक राज्यांत भाजपचे सरकार असतांना हिंदूंना अशा प्रकारचे आंदोलन करावे लागू नये, तर सरकारने याविरोधात कठोर कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

नवी देहली – धर्मांतर, लव्ह जिहाद, भूमी जिहाद आदींविरुद्ध विश्‍व हिंदु परिषद येत्या २१ डिसेंबरपासून देशभरात ‘जनजागरण आंदोलन’ चालू करणार आहे. यात विहिंपचे कार्यकर्ते घरोघर जाऊन हिंदूंना जागरूक करणार आहेत.

याविषयी विहिंपचे प्रवक्ते विनोद कुमार बंसल यांनी सांगितले की,

विहिंपचे प्रवक्ते विनोद कुमार बंसल

१. भारताची लोकसंख्येच्या आधारे रचना पालटण्याचा प्रयत्न होत आहे. देशात ‘छोटे पाकिस्तान’ आणि ‘छोटे व्हॅटिकन’ बनवले जात आहेत. याची माहिती प्रशासनाला नाही, ही चिंतेची गोष्ट आहे.

२. आम्ही हिंदूंच्या धर्मांतराची माहिती गोळा करत आहोत. मध्यप्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यामध्ये गेल्या ३ दशकांत ५३ चर्च बनवले गेले आणि आश्‍चर्य म्हणजे याविषयी प्रशासनाला काहीही माहिती नाही. विशेष म्हणजे हे सर्व चर्च सरकारी भूमीवर बांधण्यात आले आहेत. (मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अद्यापही त्यांच्या कारवाई न होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक) येथे आतापर्यंत किती हिंदूंचे धर्मांतर झाले, हेही ठाऊक नाही.

३. मिशनर्‍यांसह धर्मांधांच्या विरोधातही जनजागृती करणार आहोत. उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’चे मोठे प्रकरण समोर आले आहे. इस्लामी संस्था कशा प्रकारचे कार्य करत आहेत, हे लक्षात आले आहे.

४. २१ डिसेंबरपासून विहिंपचे कार्यकर्ते घरोघर जाऊन हिंदूंना या सर्व संकटांची माहिती देणार आहेत. हे अभियान १ मास चालवण्यात येणार आहे.

५. धर्मांतरामुळे केवळ हिंदूच नव्हे, तर शीख, बौद्ध आणि जैन हेही पीडित आहेत. काँग्रेसशासित पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या सभेमध्ये जाणार होते. त्या सभेत लोकांचे धर्मांतर करण्यात येणार होते. विरोध केल्यानंतर मुख्यमंत्री चन्नी यांनी जाण्याचे टाळले. पंजाबमधील काही जिल्हे धर्मांतराचे अड्डे बनले आहेत.