‘मार्गात असतांना मांजर आडवे गेल्यावर काम होत नाही किंवा अडचणी येतात’, असा समज आहे. एकदा मी गावी गेल्यावर मला या संदर्भात आलेले अनुभव आणि त्या वेळी माझी झालेली विचारप्रक्रिया पुढे देत आहे.
१. गावातून तालुक्याच्या ठिकाणी जातांना आणि तालुक्याच्या ठिकाणाहून गावी येतांना मांजर आडवे गेल्यावर चारचाकी अकस्मात बंद पडणे अन् चारचाकीला धक्का मारल्यावर चारचाकी चालू होणे
अ. एकदा मी गावातून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी काही साहित्य खरेदी करायला चारचाकीने जायला निघालो. घरापासून काही अंतर गेल्यावर एक मांजर आम्हाला आडवे गेले. तेव्हा मी त्याकडे दुर्लक्ष केले. तालुक्याचे ठिकाण जवळ आल्यावर गाडी अकस्मात बंद पडली. ती काही केल्या चालू होईना. तेव्हा आम्ही तेथील रिक्शा स्टॅण्डवरील रिक्शाचालकांना विनंती केली. त्यांनी चारचाकीला धक्का मारल्यावर चारचाकी चालू झाली.
आ. चारचाकीने तालुक्याच्या ठिकाणाहून गावी परत येतांना काही अंतरानंतर पुन्हा एक मांजर आडवी गेली. ‘आता काय होणार ?’, असे वाटून मी पुढे गेलो. आम्ही गावापासून १ किलोमीटर अंतरावर असतांना चारचाकी पुन्हा बंद पडली. ‘आता इथे धक्का मारायला कोण येणार ?’, असे मला वाटले. सुदैवाने त्यासाठी २ व्यक्ती मिळाल्या. त्यांनी चारचाकीला धक्का मारल्यावर ती चालू झाली.
२. गावाहून चारचाकीने कुडाळ येथे जातांना आणि तेथून रामनाथी आश्रमात जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर जातांना घडलेली घटना
काही दिवसांनी आमचे गावाहून कुडाळ येथे चारचाकीने आणि पुढे रेल्वेने रामनाथी आश्रमात जाण्याचे नियोजन झाले. चारचाकीने कुडाळ सेवाकेंद्रात जातांना एक मांजर अर्ध्या वाटेत आले आणि पुन्हा मागे फिरले. ‘पुन्हा ते आडवे जाण्याआधी गाडी पुढे न्यावी’, असा विचार करीपर्यंत मांजर आडवे गेले. तेव्हा ‘आता यानंतर काय होणार ?’ असे मला वाटले.
कुडाळ सेवाकेंद्रात गेल्यावर मी हा प्रसंग विसरून गेलो. नंतर आम्ही कुडाळ येथे आल्यावर गोवा येथे जाणार्या गाडीची नियोजित वेळ जवळ आली असल्याचे कळले. एका साधकाने ‘इंटरनेट’वर पाहून ‘गाडी येण्यास अजून अवधी आहे’, असे सांगितले. त्यामुळे आम्ही थोडा वेळ तेथे थांबलो. नंतर ‘गाडी केव्हाही अंतर पार करू शकते’, अशी चर्चा झाल्याने आम्ही तेथून रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी निघालो. आम्ही रेल्वेस्थानकाच्या जवळ आलो असतांना आम्हाला रेल्वे मडगावच्या दिशेने जातांना दिसली. आम्हाला रेल्वेत बसता आले नाही. नंतर ‘त्याच दिवशी गोवा येथे जाण्यासाठी कसेही करून निघायचेच’, या सूत्रावरून माझा आणि वडिलांचा वाद झाला.
३. रामनाथी आश्रमातून निवासस्थानी दुचाकीने जात असतांना मार्गात मांजर आडवे आल्यावर ‘नामजप करायचा’, असा विचार केल्यावर काहीही न घडणे
नंतर ४ – ५ दिवसांनी मी रामनाथी आश्रमातून निवासस्थानी दुचाकीने जात असतांना मार्गात मांजर आडवे आले. तेव्हा माझ्या मनात ‘आता काय होणार ? कुठला प्रसंग घडणार ?’, असे विचार आले. ‘अप्रिय घटना घडू नये, यासाठी पुष्कळ नामजप करायचा. प्रसंग घडू द्यायचा नाही’, असा मी विचार केला. ‘परिणामी मला होणार्या आध्यात्मिक त्रासामुळे वादाचा प्रसंग घडू शकत असतांनाही तो टळला’, असे माझ्या लक्षात आले.
‘मांजर आडवे आल्यामुळे अडचणी येतात’, असे नसून ‘मांजर आडवे जाणे, हे काहीतरी अडचण येण्याचे निर्देशक आहे’, असे माझ्या लक्षात आले; मात्र ‘साधना वाढवल्यास संभाव्य अडचण किंवा समस्या यांचे निराकरण होते’, हे मला यातून शिकता आले.’
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.११.२०१८)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/सद् गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |