मोर्चे काढून दहशत निर्माण करणार्‍या रझा अकादमीवर बंदी आणण्याची मागणी

गेवराई (जिल्हा बीड) येथे विविध संघटनांचे राज्यपालांना निवेदन !

रझा अकादमीच्या वतीने पुकारण्यात आलेला बंद

गेवराई (जिल्हा बीड) – रझा अकादमीने मोर्चे काढून हिंदूंमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने दंगे घडवून आणले. त्यामुळे रझा अकादमीची मान्यता रहित करून दंगे घडवून आणणार्‍या व्यक्तींवर कठोर कारवाई करून हिंदु व्यापार्‍यांना न्याय द्यावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती मंच, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, व्यापारी महासंघ यांच्या वतीने राज्यपालांच्या नावे तहसीलदार महेश विटकर यांना १७ नोव्हेंबर या दिवशी तहसील कार्यालयात देण्यात आले.

रझा अकादमी

त्रिपुरा राज्यात काही मशिदी पाडल्याच्या कथित घटनांच्या निषेधार्थ महाराष्ट्रात विविध ठिकाणी १२ नोव्हेंबर या दिवशी रझा अकादमीच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. यानिमित्ताने अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी यांसह अन्य काही शहरांमध्ये मोर्चे काढण्यात आले. या वेळी धर्मांधांनी हिंदु व्यापार्‍यांवर सुनियोजित कटाप्रमाणे आक्रमण केले. या वेळी दुकानांची तोडफोड, पोलिसांना मारहाण, वाहनांची जाळपोळ आणि खासगी मालमत्तेची मोठ्या प्रमाणात हानी करण्यात आली होती.