अन्नपदार्थांत भेसळ आढळल्यास भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण प्राधिकरणाकडे (एफ्.एस्.एस्.ए.आय.) तक्रारी करा ! – मोहन केंबळकर, साहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन विभाग, कोल्हापूर

‘सुराज्य अभियान’ आणि ‘आरोग्य साहाय्य समिती’ या उपक्रमांच्या अंतर्गत ‘अन्नभेसळ कशी ओळखावी अन् त्यासाठीचे उपाय’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !

रामनाथी (गोवा) – अन्नपदार्थांमध्ये भेसळ केली असेल, पॅकबंद अन्नपदार्थांवरील ‘पॅक’वर चुकीचे ‘लेबल’ असेल, तसेच अन्नपदार्थांविषयी लोकांची दिशाभूल करणारी विज्ञापने प्रसारित केली जात असतील, तर अन्न सुरक्षेविषयीच्या विद्यमान कायद्यांनुसार दोषींच्या विरोधात शिक्षेच्या तरतुदी अस्तित्वात आहेत. या संदर्भातील गुन्ह्यांसाठी आर्थिक दंड, कारावास आदी शिक्षा आहेत. अनेकदा दुधामध्ये भेसळ केली जाते. मे २०१८ ते ऑक्टोबर २०१८ या कालावधीत ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’ने संपूर्ण भारतभरातील दुधाचे ६ सहस्र ४३२ नमुने पडताळले. त्यातील ५ सहस्र ९७६ नमुन्यांची गुणवत्ता चांगली होती. म्हणजेच चांगल्या दुधाची गुणवत्ता ९३ टक्के इतकी होती. विशेषत: तेलंगाणा, केरळ आणि मध्यप्रदेश या राज्यांत दुधामध्ये हायड्रोजन पॅराक्सॉईड, युरिया या पदार्थांची भेसळ आढळली. ७८ नमुन्यांमध्ये साखरेची भेसळ आढळली. ‘पदार्थांमधील भेसळ कशी ओळखावी ?’, याविषयी भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण प्राधिकरणा’च्या (एफ्.एस्.एस्.ए.आय.) संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. दूध किंवा कुठल्याही अन्नपदार्थांमध्ये भेसळ लक्षात आल्यास ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’कडे दूरभाष, ‘ऑनलाईन’ किंवा प्रत्यक्ष पत्रव्यवहार यांद्वारे तक्रार करता येते. तक्रार प्राप्त झाल्यावर ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’चे अधिकारी तक्रारदाराला पुढील कारवाईच्या संदर्भात रितसर माहितीही देतात. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते. अन्नपदार्थांत भेसळ आढळल्यास जागरूक नागरिकांनी ‘भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण प्राधिकरणा’कडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन कोल्हापूर येथील अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त श्री. मोहन केंबळकर यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीचे ‘सुराज्य अभियान’ आणि ‘आरोग्य साहाय्य समिती’ या उपक्रमांच्या अंतर्गत ‘अन्नभेसळ कशी ओळखावी अन् त्यासाठीचे उपाय’ या ऑनलाईन’ विशेष परिसंवादात बोलत होते.

१३ ऑक्टोबर या दिवशी हा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम घेण्यात आला. १ सहस्र ४५७ जणांनी याचा लाभ घेतला. या कार्यक्रमात सातारा आणि कोल्हापूर येथील जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी श्री. सुनील पाखरे यांनी दूध, चहा पावडर, डाळी आदी पदार्थांमधील भेसळ कशी ओळखावी ? हे प्रात्यक्षिकांसह दाखवले. समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

श्री. मोहन केंबळकर यांनी मांडलेली अन्य सूत्रे

श्री. मोहन केंबळकर

१. काही ठिकाणी ‘कॅल्शिअम कारबाईट’ सारखी रसायने वापरून कृत्रिमरित्या फळे पिकवली जातात. ही फळे चवीला आंबट तर लागतातच, शिवाय मानवी शरिरासाठी ती अपायकारक असतात. तसेच हातगाड्यांवरील ज्यूस, सरबते यांमध्येही विविध प्रकारचे रंग वापरून भेसळ केली जाते. नागरिकांना कुठल्याही प्रकारची भेसळ आढळल्यास त्यांनी याविषयी ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’च्या केंद्रीय विभागाला १८०००११२१०० आणि महाराष्ट्र राज्यासाठी १८००२२२३६५ या ‘टोल फ्री’ क्रमांकावर तक्रार करावी.

२. काही ठिकाणी विकल्या जाणार्‍या ज्यूसमधील बर्फ खाण्यायोग्य नसतो. स्वच्छतेचे निकष पाळले जात नसलेल्या ठिकाणांवरील, तसेच उघड्यावरील पदार्थ खाणे नागरिकांनी टाळावे.

३. भेसळयुक्त दुधासंदर्भात तक्रार आल्यास ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’चे अधिकारी दुधाचा नमुना मागवून त्याची पडताळणी करतात. त्यामुळे भेसळयुक्त दुधाची तक्रार करतांना नागरिकांनी दुधाचा नमुना समवेत ठेवावा.

श्री. सुनील पाखरे यांनी पदार्थ भेसळयुक्त आहे का ? हे ओळखण्याच्या संदर्भात सांगितलेली सूत्रे

श्री. सुनील पाखरे

१. चहापूडमधील भेसळ कशी ओळखावी ?

वापरलेली चहापूड वाळवून त्यामध्ये कृत्रिम रंग घातले जातात. त्यानंतर पुन्हा ती वापरली जाते. अशा प्रकारे चहापूडमध्ये भेसळ केली जाते. ही भेसळ ओळखण्यासाठी चहापूडमध्ये थोडे पाणी घालावे. पाण्याला तपकिरी (ब्राऊन) रंग आल्यास ती चांगली चहापूड असते; परंतु लाल-केशरी रंग आल्यास ती भेसळयुक्त चहापूड असू शकते.

२. तूरडाळीतील भेसळ कशी ओळखावी ?

तूरडाळीमध्ये लाखी डाळीची भेसळ केली जाते. लाखी डाळीचा आकार उलटे ठेवलेल्या सुपाप्रमाणे असतो, तर तूरडाळ भरीव आणि गोल असते. लाखी डाळ पाण्यात घातल्यास डाळीचा रंग उतरुन पाण्यात पिवळसर रंग येतो.

दुधाची शुद्धता पडताळण्यासाठी घरगुती स्तरावर करता येण्यासारखे पर्याय

दुधाची शुद्धता पडताळण्यासाठी घरगुती स्तरावर काय करता येईल ? याविषयी श्री. मोहन केंबळकर यांनी काही सोपे पर्याय सांगितले. ते पुढीलप्रमाणे आहेत.

१. दुधात अधिक प्रमाणात पाणी मिसळून भेसळ केली आहे ? हे कसे ओळखावे ?

काचेचा रिकामा पेला उपडा ठेवून त्यावर २-३ थेंब दूध ओतावे. दूध जर हळुवारपणे खाली आले आणि पेल्यावर दुधाची पांढरी छटा राहिली, तर दूध शुद्ध आहे, असे समजू शकतो. जर दूध वेगाने खाली आले आणि पेल्यावर पांढर्‍या रंगाची छटा आढळली नाही, तर दुधात अधिक प्रमाणात पाणी मिसळून भेसळ केली आहे, हे लक्षात येते.

२. दुधात ‘डिटर्जंट’ मिसळले आहे का ?’, हे कसे पडताळावे ?

दूध एका पेल्यात घेऊन ते चमच्याने ढवळावे. त्याला अधिक प्रमाणात फेस आला, तर दुधात ‘डिटर्जंट’ मिसळलेले असते.

३. दुधात पीठ (स्टार्च)ची भेसळ असल्यास कशी ओळखावी ?

दोन ते तीन चमचे दुधात तीन ते चार थेंब आयोडिन टाकल्यास जर दुधाला निळसर छटा आली, तर त्यात पीठ (स्टार्च) मिसळून भेसळ केलेली असते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतांना श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केलेले आवाहन !

श्री. नरेंद्र सुर्वे

‘सध्या अन्नभेसळीमुळे समाजाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हानी सोसावी लागत आहे. ‘भेसळ’ या समस्येविषयी कायदेशीर लढा देण्यासाठी ‘सुराज्य अभियाना’शी संपर्क साधावा’, असे आवाहन श्री. नरेंद्र सुर्वे यांनी कार्यक्रमात केले.

पत्ता : ‘सुराज्य अभियान’, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा ४०१४०३. संपर्क क्रमांक : ९५९५९८४८४४

ई-मेल पत्ता : [email protected]