वर्ष २०५० मध्ये बांगलादेशात हिंदूच नसतील ! – बांगलादेशी लेखकाच्या पुस्तकात दावा

  • ही स्थिती येण्यापूर्वी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करा, जेणेकरून जगभरातील हिंदूंचे रक्षण करता येईल ! – संपादक
  • भारतातील अल्पसंख्यांकांवर कथित अन्याय झाल्यावर आकाश-पाताळ एक करणार्‍या मानवाधिकार संघटना बांगलादेशमधील अल्पसंख्य हिंदूंंचे समूळ उच्चाटन होत असतांना चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

ढाका (बांगलादेश) – प्रतिदिन सरासरी ६३२ हिंदू बांगलादेश सोडून दुसर्‍या देशांत आश्रय घेत आहेत. त्यामुळे येत्या ३ दशकांत, म्हणजे वर्ष २०५० पर्यंत बांगलादेशात हिंदूच नसतील, असा दावा ढाका विद्यापिठातील प्राध्यापक डॉ. अबुल बरकत यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या स्थितीवर लिहिलेल्या ‘पॉलिटिकल इकनॉमी ऑफ रिफॉर्मिंग अ‍ॅग्रीकल्चर-लँड-वॉटर बॉडिज् इन बांगलादेश’ (Political economy of reforming agriculture-land-water bodies in Bangladesh) या पुस्तकात केला आहे. अबुल यांनी संशोधन करून लिहिलेले हे पुस्तक वर्ष २०१६ मध्ये प्रसिद्ध झाले होते. ‘बांगलादेशात एवढी भीषण परिस्थिती  निर्माण होण्यामागे तेथील कट्टरतावादी मुसलमानांचे वर्चस्व वाढणे, हे कारण आहे. कट्टर मुसलमान एकत्रितपणे अल्पसंख्य हिंदूवर आक्रमणे करतात’, असे या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.

बांगलादेशमध्ये केवळ ६.५ टक्के हिंदू शिल्लक !

जागतिक आकडेवारीनुसार बांगलादेशमध्ये हिंदूंची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या ६.५ टक्के इतकी आहे. वर्ष १९७१ मध्ये पश्‍चिम पाकिस्तानापासून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात भारताचा मोठा वाटा होता; पण त्यानंतर लगेचच बांगलादेशात असलेल्या हिंदूंवर अत्याचारांना प्रारंभ झाला. बांगलादेश स्वतंत्र झाल्यापासून हिंदूंवर आक्रमणे झाली नाहीत, असे एकही वर्ष गेले नाही.

‘बांगलादेश ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक’ (बांगलादेश सांख्यिकी विभाग) या संस्थेनुसार बांगलादेशात वर्ष १९७४ पासून हिंदूंची घटणारी लोकसंख्या पुढीलप्रमाणे

अ.क्र.     वर्ष      हिंदूंची लोकसंख्या (टक्क्यांत)
१.         १९७४                १३.५
२.         १९८१                 १२.१
३.         १९९१                 १०.५
४.         २००१                   ९.३
५.         २०११                   ८.५

वर्ष २०२१ मध्ये बांगलादेशात अंदाजे केवळ ६.५ टक्के इतकेच हिंदू आहेत.

गेल्या ९ वर्षांत हिंदूंवर ३ सहस्र ६०० आक्रमणे !

मानवाधिकार संघटनांच्या आकडेवारीनुसार गेल्या ९ वर्षांत हिंदूंवर ३ सहस्र ६०० आक्रमणे झाली आहेत. बांगलादेशात वर्ष १९९०, १९९५, १९९९ आणि वर्ष २००२ या वर्षांत मोठ्या दंगली झाल्या. त्यात हिंदूंना लक्ष्य करण्यात आले होते. बांगलादेशात हिंदूंची मंदिरे पाडणे, त्यांची घरे जाळणे, हिंदु मुली आणि लहान मुले यांचे अपहरण करणे, हिंदु मुली अन् विवाहित महिला यांच्यावर बलात्कार करणे, असे अत्याचार केले जात आहेत.

वर्ष १९७१ मध्ये ३० लाख हिंदूंचा नरसंहार !

बांगलादेशाच्या इतिहासात वर्ष १९७१ मध्ये हिंदूंवर सर्वाधिक अत्याचार झाले. बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या वेळी पाकिस्तानी सैन्याने हिंदूंची गावेच्या गावे उद्ध्वस्त केली होती. एका अहवालानुसार त्या वेळी ३० लाखांहून अधिक हिंदूंचा नरसंहार झाला होता.

हिंदूंची भूमी बळकावण्यासाठीच हिंदूंवर होतात आक्रमणे !

बांगलादेशात हिंदूंविरुद्ध हिंसाचार होण्याचे मुख्य कारण त्यांच्याकडे असलेल्या भूमी बळकवणे, हे आहे. ‘ढाका टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार बहुसंख्य मुसलमान गरीब हिंदूंवर आक्रमण करतात, त्यांच्या महिलांवर अत्याचार करतात, तसेच त्यांची घरे जाळतात. यांमुळे हिंदु कुटुंबाला त्याचे घर सोडून सुरक्षित ठिकाणी जाणे भाग पडते. त्यानंतर मुसलमान हिंदूंची भूमी बळकावतात, अशी येथील अल्पसंख्यांकांवरील आक्रमणाची पद्धत आहे.

बांगलादेशमध्ये वर्ष २०११ मध्ये केलेल्या जनगणनेनुसार मुसलमानांची लोकसंख्या १३ कोटींहून अधिक, तर हिंदूंची लोकसंख्या केवळ १ कोटी २७ लाख २० सहस्र एवढी होती. मागील १० वर्षांच्या कालावधीत बांगलादेशी धर्मांधांकडून हिंदूंवरील आक्रमणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे, अशी माहिती ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ या बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंच्या हितासाठी कार्य करणार्या संघटनेचे अध्यक्ष पू. रवींद्र घोष यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बाेलतांना दिली.