‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी कार्यक्रमाचे खरे स्वरूप उघड करणारा ट्विटर ट्रेंड द्वितीय स्थानी !

मुंबई – ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन) या परिषदेच्या माध्यमातून पूर्ण जगामध्ये हिंदु धर्म, हिंदुत्व आणि हिंदु समाज यांना चुकीचे अन् हिंसक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. १० ते १२ सप्टेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही परिषद केवळ हिंदु धर्माला अपकीर्त करण्यासाठी आयोजित केली गेली होती, हेच परिषदेला संबोधित करणार्‍या वक्त्यांच्या वक्तव्यांतून लक्षात आले. या परिषदेचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी धर्मप्रेमी हिंदूंनी ट्विटरवर #DGH_Conf_Agenda_Hinduphobia हा ‘हॅशटॅग’ (एकाच विषयावर घडवून आणलेली चर्चा) ट्रेंड केला. हिंदूंच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा ट्विटर ट्रेंड अवघ्या अर्ध्या घंट्यातच राष्ट्र्रीय ट्रेंडमध्ये द्वितीय क्रमांकावर होता. सायंकाळपर्यंत या विषयावर १५ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आले होते.

ब्राह्मणांचे वर्चस्व, आर्य-द्रविड संघर्ष, आर्य आक्रमण सिद्धांत आदी निराधार संकल्पनांवर या हिंदुद्वेष्ट्या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली होती. या सर्व संकल्पना कशा कपोलकल्पित आणि वास्तवाला धरून नाहीत, ते या ट्रेंडच्या माध्यमातून केलेल्या ट्वीट्समधून हिंदु धर्मप्रेमींनी समाजाला लक्षात आणून दिले.