जिल्हा न्यायालयांनी ग्रामीण नागरिकांशी संबंधित सूचना हिंदी भाषेतून प्रकाशित कराव्यात !

‘सांस्कृतिक गौरव संस्थान’च्या वतीने हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

चंडीगड – जिल्हा न्यायालये ग्रामीण नागरिकांच्या संदर्भातील सूचनांची विज्ञापने हिंदी वृत्तपत्रांमधून इंग्रजी भाषेत प्रकाशित करत असल्याने त्यांना ती समजण्यासाठी कठीण जाते. त्यामुळे ही विज्ञापने हिंदी भाषेत प्रकाशित करण्यात यावीत, या मागणीसाठी ‘सांस्कृतिक गौरव संस्थान’च्या वतीने हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. (अशी मागणी का करावी लागते ? सरकार आणि प्रशासन यांच्या हे स्वतःहून लक्षात का येत नाही ? ग्रामीण भागातील बहुतांश जनतेला हिंदी भाषा कळत असतांना आणि राष्ट्रभाषा हिंदी असतांना अशी मागणी करावी लागणे लज्जास्पद ! – संपादक)

या निवेदनामध्ये म्हटले आहे की, हरियाणा सरकारची राजभाषा हिंदी आहे. त्यामुळे सरकारी विभाग, कार्यालये, जिल्हा न्यायालये, विश्वविद्यालये आणि विद्यालये यांनी त्यांचे कार्य हिंदीमध्ये करण्यासंदर्भात ३ वर्षांपूर्वी राज्यशासनाने एक आदेश काढला होता. त्यामुळे सध्या जिल्हा न्यायालयांनी हिंदी वृत्तपत्रांमध्ये इंग्रजी भाषेत विज्ञापने प्रकाशित करणे, हा या आदेशाचा अवमान आहे. (अशांवर शासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक) त्यामुळे हिंदी भाषेत कार्य करण्याविषयी जिल्हा न्यायालयांना पुन्हा आदेश देण्यात यावा, तसेच न्यायालयामध्ये आदेशाची कार्यवाही करणार्‍यांचे प्रबोधन करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी.