‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेच्या विरोधात मुंबई आणि देहली येथील अमेरिकी दुतावासाजवळ हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !

मुंबई येथे निदर्शने करताना धर्माभिमानी

मुंबई – १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत अमेरिकेत चालू असलेल्या ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमधून हिंदुत्वाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात द्वेष पसरवून जगभरातील हिंदूंसाठी असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले जात आहे. या परिषदेचे आयोजक, सहभागी वक्ते, या परिषदेला पाठिंबा देणार्‍या व्यक्ती, तसेच संस्था या सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आज मुंबई आणि देहली येथील अमेरिकी दुतावासाजवळ निदर्शने केली. या संदर्भातील निवेदन दुतावासाच्या वतीने मुंबई येथील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तर देहली येथे अमेरिकी दुतावासाच्या सुरक्षा अधिकारी यांनी स्वीकारले.

मुंबई पोलिसांनी दुतावासाच्या समोर आंदोलन करण्याची अनुमती नाकारली होती; मात्र पोलिसांनी दिलेल्या जागेत कोरोनाचे सर्व शासकीय नियम पाळून निदर्शने करण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समिती, हिंद सायकल गणेशोत्सव समिती, हिंदुराष्ट्रसेना आदी संघटनांसह हिंदु धर्मप्रेमी यांनी हातात निषेधफलक धरून आंदोलन केले.

‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या वतीने ‘हिंदुत्व रक्षण बैठक’

‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या वतीने ‘हिंदुत्व रक्षण बैठकी’च्या माध्यमातून ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेच्या माध्यमातून होणार्‍या वैचारिक आक्रमणांविरोधात, तसेच या संदर्भातील पुढील प्रयत्नांची दिशा निश्चित करण्यात येणार आहे. या बैठकीला भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, मान्यवर, अधिवक्ते आदी सहभागी होतील, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी या वेळी सांगितले.