एस्.टी. महामंडळाला ३ सप्टेंबरपर्यंत वेतन देण्याचे औद्योगिक न्यायालयाचे आदेश !

मुंबई – एस्.टी. महामंडळाला औद्योगिक न्यायालयाने ३ सप्टेंबरपर्यंत सर्व कामगारांचे वेतन देण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटली असली, तरी प्रवाशांची संख्या वाढलेली नाही. त्यामुळे एस्.टी.ला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. प्रत्येक मासात कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी ३०० कोटी रुपयांचा व्यय येत आहे. कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून एस्.टी. महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यामुळे महामंडळाने कर्मचार्‍यांचे जुलै मासाचे वेतनच दिले नाही. या प्रकरणी मान्यताप्राप्त एस्.टी. कर्मचारी संघटनेने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. मागील वर्षी एस्.टी. बस वाहतूक बंद असतांना शासनाकडून मिळालेल्या एक सहस्र कोटी रुपयांच्या निधीतून कर्मचार्‍यांना वेतन मिळाले होते. त्यानंतर सवलत मूल्याच्या रकमेतून अकराशे कोटी मिळाल्याने जून मासापर्यंतचे वेतन महामंडळाने दिले. आता हा निधीसुद्धा संपला असल्याने कर्मचार्‍यांचा वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.