हिंदुत्वनिष्ठ आणि हितचिंतक यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतीचा भाव !

१. कलियुगात परात्पर गुरु डॉ. आठवले हे समर्थ रामदासस्वामी यांचेच अवतार आहेत !

श्री. प्रमोद मुतालिक

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मी गुरु मानतो. ते ऋषीसमान आहेत. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदासस्वामींनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली, त्याप्रमाणे आजच्या कलियुगात परात्पर गुरु डॉ. आठवले हे समर्थ रामदासस्वामी यांचेच अवतार आहेत, अशी माझी श्रद्धा आहे. त्यांचे मार्गदर्शन हिंदूंच्या घराघरांत आणि सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांना मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, ही त्यांची इच्छा आहे. ती निश्चित पूर्ण होईल. त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण प्रार्थना करणे, हे आपले कर्तव्यच आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो, अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो.’  – श्री. प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना. (दैनिक ‘सनातन प्रभात’, २१.५.२०१७)

२. ‘संतनिर्मिती’चे तंत्र निर्माण करून अवतारत्वाचे स्थान प्राप्त झालेले आणि हिंदु धर्माला ‘कणखर कणा’ निर्मिणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

श्री. रा.वि. वेलणकर

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, आपण ‘धर्मविचार हा माणसाच्या विचारशक्तीचा विकास करणारी गोष्ट आहे’, हा विचार प्रकर्षाने मांडलात आणि आपण ‘संत निर्माण करण्याचे तंत्र’ निर्माण केलेत, यांमुळे आपल्या जन्माला ‘अवताराचे स्थान’ प्राप्त झाले आहे. त्यामुळे हिंदु धर्माला ‘कणखर कणा’ निर्माण करण्याचे पुण्य आपल्याला लाभले आहे.’ – श्री. रा.वि. वेलणकर, श्री गजानन वीव्हिंग मिल्स् कंपाउंड, ५६०, खणभाग, शिवाजीनगर, सांगली ४१६ ४१६. (१६.१.२०१९)