भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक !

सोलापुरात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष तीव्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर गोपीचंद पडळकर यांच्या दोन समर्थकांनी दगडफेक केली

सोलापूर, १ जुलै – सोलापुरात १ जुलै या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या दोन समर्थकांनी दगडफेक केली. ३० जून या दिवशी आमदार पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आपण हे पाऊल उचलले आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी शरणू हांडे आणि सोमनाथ घोडके हे दोघे पोलीस ठाण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे सोलापुरात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष तीव्र होत असल्याचे चित्र आहे.

१. ३० जून या दिवशी रात्री आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.  सोलापुरातील मड्डी वस्ती इथे हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

२. सोलापुरातील भवानी पेट परिसरात ३० जून या दिवशी अक्कमहादेवी मंदिर येथे झालेल्या घोंगडी बैठकीत कोरोना नियमांचे पालन न करता गर्दी जमवली, सामाजिक अंतराचे पालन न करता लोकांच्या जीवितेला धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याचा गुन्हा आमदार पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर नोंदवण्यात आला आहे.