गंगेतून वाहून आलेल्या सहस्रो प्रेतांविषयी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मत व्यक्त करावे, अशी अपेक्षा होती !

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विधान

संजय राऊत

मुंबई – गंगा नदीच्या प्रवाहात सहस्रो प्रेते वाहून आली. हा विषय हिंदुत्वाचा होता. राम मंदिराइतकाच महत्त्वाचा होता. त्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मत व्यक्त करावे, अशी आमची अपेक्षा होती, अशी अपेक्षा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी गंगा नदीच्या प्रवाहातून अनेक प्रेते वाहून आल्याचे आढळून आले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या हिंदूंवर अग्निसंस्कार करणे शक्य नसल्यामुळे ही प्रेते गंगेत सोडण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

याविषयी संजय राऊत म्हणाले, ‘‘मोहन भागवत हे आदरणीय आहेत. त्यांचा आम्ही आदर करतो. ‘त्यांनी परखडपणे मत व्यक्त करावे’, अशी आमची अपेक्षा आहे. त्यांच्या मताला देशात महत्त्व आहे; पण मागील काही दिवसांपासून ते शांत आहेत. गंगेच्या प्रवाहात सहस्रो प्रेते वाहून आली. त्यावर हिंदु संस्कृतीनुसार अंत्यसंस्कार झाले नाहीत. हा विषय हिंदुत्वाचा आहे. राममंदिराइतकेच हे महत्त्वाचे सूत्र आहे. देशातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी याविषयी स्वत:ची भूमिका मांडायला हवी होती.’’