आगामी काळात तिसरे महायुद्ध होऊन त्यात कोट्यवधी लोक अणूसंहारामुळे मृत्यू पावतील, तसेच भीषण नैसर्गिक आपत्तीही ओढवतील, असे संतांचे भाकीत आहे. आपत्काळात दळणवळणाची साधने, डॉक्टर, तयार औषधे इत्यादी उपलब्ध होतील, याची शाश्वती नसते. सध्या कोरोनामुळे ही स्थिती सर्वत्र अनुभवण्यास येत आहे. आपत्काळात आयुर्वेदीय औषधी वनस्पतींचा वापर करून आपल्याला आरोग्यरक्षण करावे लागेल. योग्य वेळी योग्य ती औषधी वनस्पती उपलब्ध होण्यासाठी ती आपल्या सभोवताली असायला हवी. यासाठी अशा औषधी वनस्पतींची लागवड आताच करून ठेवणे, ही काळाची नितांत आवश्यकता आहे. नैसर्गिक, तसेच मानवनिर्मित विविध कारणांमुळे अनेक औषधी वनस्पती दुर्मिळ झाल्या आहेत. त्यांच्या लागवडीमुळे त्यांच्या संवर्धनासह आपले आरोग्य टिकवण्यासही साहाय्य होणार आहे. भावी हिंदु राष्ट्रात आयुर्वेद हीच मुख्य उपचारपद्धत असणार आहे. यादृष्टीनेही आयुर्वेदाच्या संवर्धनासाठी वनौषधींची लागवड करणे आवश्यक ठरते. आयुर्वेद हे भारतीय शास्त्र आहे. त्याच्या संवर्धनासाठी औषधी वनस्पतींची लागवड करणे, हे प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाचे कर्तव्य आहे.
आगामी भीषण आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येकानेच औषधी वनस्पतींची लागवड करायला हवी. तुळस, कोरफड यांसारख्या लहान आकारातील औषधी वनस्पती कुंड्यांमध्ये लावून परसबागेत किंवा सदनिकेच्या आगाशीत ठेवता येतात. कुंड्यांमध्ये झाडे कशी लावावीत आणि त्यांची काळजी कशी घ्यावी ? हा यापूर्वी दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेला लेख वाचकांच्या सोयीसाठी पुनःप्रसिद्ध करत आहोत. औषधी वनस्पतींच्या लागवडी विषयीची सविस्तर माहिती सनातनचे ग्रंथ जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड आणि औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ? यांत दिली आहे. वाचकांनी हे ग्रंथ अवश्य वाचून यात दिल्याप्रमाणे औषधी वनस्पतींची लागवड करावी !
१. कुंड्यांमध्ये झाडे कशी लावावीत ?
कुंड्यांऐवजी पर्यायी साधनांमध्ये (उदा. प्लास्टिकच्या पिशव्या, पत्र्याचे डबे) लागवड करायची असल्यासही याप्रमाणेच लागवड करावी.
१ अ. झाडांसाठी माती सिद्ध करणे : कुंड्यांमध्ये झाडे लावण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणची भूमीच्या वरच्या थरातील माती घ्यावी. जिच्यामध्ये झाडांचा पालापाचोळा कुजलेला आहे, अशी माती श्रेष्ठ समजावी. अधिक खालच्या थरातील मातीमध्ये झाडासाठी लागणार्या पोषणद्रव्यांचा अभाव असू शकतो. यासाठी १ फुटाहून अधिक खोलवरची माती शक्यतो घेऊ नये. मातीत मोठे खडे असल्यास ते वेचून काढावेत किंवा माती चाळून घ्यावी. ही माती ३ भाग घेऊन तिच्यामध्ये १ भाग चांगले कुजलेले शेणखत आणि थोडीशी राख मिसळावी. कुजलेले शेणखत पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्यास ३ भाग मातीला २ भाग शेणखत, असे प्रमाण ठेवावे. ताजे शेण थेट न वापरता ते नीट कुजल्यावरच वापरावे. कुजलेले शेणखत न मिळाल्यास कुजलेला पालापाचोळा किंवा घरातील कुजवलेला काडी-कचरा खत म्हणून वापरावे.
१ अ १. मातीला पर्याय : झाडांना माती ही आधारासाठी आणि वाढीसाठी अन्नघटक पुरवणारे माध्यम म्हणून लागते. घरातील भाज्यांचे देठ, साली, वाया गेलेले अन्न, निवासी संकुलाच्या (सोसायटीच्या) झाडांची पडलेली पाने, रसवंती गृहातील चिपाड या सर्वांचा उपयोग करून आपण झाडांसाठी उत्तम माती सहजपणे घरच्या घरी बनवू शकतो. सर्व सेंद्रिय (नैसर्गिक) घटकांचे कुजल्यावर मातीमध्ये रूपांतर होते. यात पाण्याचा ओलावा धरून ठेवण्याची क्षमता आणि अन्नद्रव्ये उत्तम प्रमाणात असतात. – श्री. राजेंद्र भट, लोकसत्ता (२६.२.२०१५)
१ आ. योग्य आकाराच्या मातीच्या कुंड्यांची निवड करणे : झाडांसाठी कुंड्या निवडतांना त्या कुंड्या मातीच्या असणे आवश्यक आहे; कारण सिमेंट किंवा प्लास्टिक यांच्या कुंड्यांमधून सूक्ष्म वायूविजन होऊ शकत नसल्याने त्यांत लावलेल्या झाडांची मुळे गुदमरतात. परिणामी झाडांची हवी तशी वाढ होत नाही. कुंडीचा आकार वरून रुंद आणि खालून निमूळता असावा. (आकृती क्र. १ पहा.) यामुळे माती पालटणे सोपे जाते. आकृती क्र. २ मध्ये दाखवल्याप्रमाणे कुंडी फुगीर नसावी. अशी कुंडी असल्यास माती पालटणे कठीण होते. लहान झाडासाठी ६ ते ८ इंच व्यासाची आणि ४ ते ६ इंच उंचीची, तर मोठ्या झाडासाठी १० ते १४ इंच व्यासाची आणि ८ ते १२ इंच उंचीची कुंडी घ्यावी. त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या कुंड्या हाताळणेही अवघड असते. कुंडीच्या तळाजवळ पाणी जाण्यासाठी १ – २ छिद्रे असल्याची निश्चिती करून घ्यावी.
१ इ. मातीची कुंडी चांगली भाजली असल्याची निश्चिती करणे आवश्यक असणे : मातीची कुंडी निवडतांना ती चांगली भाजली असल्याची निश्चिती करावी. त्यासाठी कुंडी हातात धरून तिच्यावर एक रुपयाच्या नाण्याने आघात करावा. ती टण् अशी वाजल्यास चांगली आहे, असे समजावे. ती भाजलेली नसेल किंवा अल्प प्रमाणात भाजलेली असेल, तर बद् असा नाद येईल. अशी कुंडी घेऊ नये. अशी कुंडी तडकण्याची शक्यता अधिक असते.
१ ई. कुंडीत माती भरण्याची पद्धत : कुंडीच्या तळाशी पाणी जाण्यासाठी ठेवलेल्या छिद्रांवर प्रत्येकी एकेक खापरीचा तुकडा किंवा पातळसा दगड ठेवावा. यामुळे कुंडीला पाणी दिल्यावर त्या छिद्रांतून आतील माती बाहेर वाहून जाणार नाही. त्यानंतर कुंडीच्या तळाशी नारळाचा काथ्या किंवा विटांचे लहान तुकडे अथवा लहान दगड ठेवावेत. असे केल्याने अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल. यावर भीमसेनी कापराच्या एका लहान वडीचे बारीक बारीक तुकडे करून टाकावेत. आता आपण सिद्ध केलेली माती हळूवार हाताने कुंडीत अर्ध्यापर्यंत भरून कुंडी हळूहळू हलवावी. यामुळे आतील खाचा, कोपरे आपोआप भरले जातील. त्यानंतर ती माती थोडी दडपून घ्यावी. आता आपली कुंडी झाड लावण्यास सिद्ध झाली.
१ उ. कुंडीत बी पेरण्याची पद्धत : बिया अगदी वरचेवर अथवा खोल पुरू नयेत. मधोमध राहतील अशा बेताने त्यांची पेरणी करावी. बी पेरणी झाल्यावर हलक्या हाताने कुंडीवर पाणी शिंपडावे. पाणी शिंपडतांना त्यात शक्य झाल्यास चिमूटभर हळद आणि दोन चमचे गोमूत्र मिसळावे. पेरणी केल्यानंतर तीन ते चार दिवसांनंतर अंकुर येतात. बीजांकुर लहान असतांना पक्षी ते खाऊन टाकण्याची भीती असते. त्यासाठी संरक्षण म्हणून कुंडीभोवती काट्या टोचून ठेवाव्यात. त्यामुळे पक्ष्यांची चोच बीजांकुरापर्यंत पोहोचत नाही.
– श्री. राजेंद्र भट, लोकसत्ता (१४.५.२०१५)
१ ऊ. कुंडीत झाड लावण्याची पद्धत : जे झाड आपण लावणार आहोत, ते कुंडीच्या मधोमध ठेवून राहिलेली कुंडी भरावी. माती भरतांना झाडाच्या मुळांजवळ पोकळी रहाणार नाही, अशा पद्धतीने भरावी. त्यासाठी माती हाताने नीट दाबून घ्यावी. पुरेसे पाणी रहाण्यासाठी कुंडीचा २ इंच वरचा भाग रिकामा सोडावा. झाड लावल्यावर लगेच पाणी द्यावे.
१ ए. कुंड्यांच्या अभावी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये झाडे लावण्याची पद्धत : झाड लावण्यासाठी कुंड्या उपलब्ध नसल्यास प्लास्टिकच्या पिशव्यांमध्येही वरील पद्धतीनेच झाडे लावता येतात. पिशवीमध्ये झाड लावण्यापूर्वी पिशवीच्या तळाशी आणि चारही बाजूंना अतिरिक्त पाण्याचा निचरा, तसेच वायूविजन होण्यासाठी छिद्रे ठेवण्यास विसरू नये. या छिद्रांच्या वर कुंडीत ठेवल्याप्रमाणे खापरी किंवा दगड ठेवण्याची आवश्यकता नसते. पिशवीमध्ये माती भरण्यापूर्वी पिशवीचे खालचे कोन आतमध्ये दुमडून घेतल्यास पिशवी भरल्यावर तिला दंडगोलाचा आकार येतो आणि पिशवी भूमीवर नीट उभी ठेवता येते.
१ ऐ. आपत्काळाच्या दृष्टीने मातीच्या कुंड्यांपेक्षा अन्य पर्याय वापरणे अधिक चांगले : मातीच्या कुंड्यांमध्ये झाडे लावणे हे झाडांच्या वाढीच्या दृष्टीने आदर्श आहे; परंतु मातीच्या कुंड्या हाताळतांना फुटू शकतात. आपत्काळामध्ये काय होईल, याची शाश्वती नसल्याने कुंड्या फुटून होणारी हानी टाळण्यासाठी या काळात मातीच्या कुंड्यांपेक्षा पत्र्याची पिंपे, तेल भरून येणारे पत्र्याचे डबे, प्लास्टिकच्या गोण्या, पिशव्या, डबे किंवा पिंपे यांचा वापर करणे अधिक चांगले. हे पर्याय वापरतांना त्यांच्या तळाशी पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्रे ठेवावीत.
२. झाडांची काळजी कशी घ्यावी ?
२ अ. लागवड केलेल्या कुंड्या ठेवण्यासाठी योग्य जागा निवडणे : आपण जेथे झाड ठेवण्याचे ठरवले आहे, तेथे किती ऊन असते, याचा अभ्यास करावा. वर्षभरात सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन यांनुसार आपल्या घरात येणार्या उन्हाचा कालावधी पालटत असतो. यामुळे लागवड केलेल्या कुंड्या घराच्या आगाशीत किंवा अंगणात न्यूनतम चार घंटे सूर्यप्रकाश मिळेल, अशा ठिकाणी ठेवाव्यात. लाकडी किंवा लोखंडी मांडणीमध्ये कुंड्या ठेवल्यास अल्प जागेत भरपूर कुंड्या ठेवता येतात. कुंडी एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी ठेवायची झाल्यास ती काठाला धरून न उचलता मध्ये धरून उचलावी.
२ आ. झाडाला पाणी देणे
२ आ १. झाडांना अधिक पाणी देणे टाळावे : वनस्पतींच्या मुळांना ओलावा लागतो, पाणी नाही. केवळ कमळासारख्या वनस्पती पाण्यातून ऑक्सिजन घेऊन स्वत:चा विकास करू शकतात. आपल्याकडील झाडे अतिरिक्त पाण्यामुळे मरतात. कुंडीतील पाण्याचा निचरा झालाच पाहिजे आणि मातीत योग्य ओलावा टिकून राहिला पाहिजे. कुंडीमधून पाणी बाहेर येत असेल, तर आपण अधिक पाणी घालत आहोत, हे लक्षात घ्यावे. अतिरिक्त पाण्यामुळे जशी झाडाची वाढ नीट होत नाही, त्याचप्रमाणे जास्त पाण्यामुळे बुरशीजन्य रोग वाढतात. झाडे अशक्त होतात. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढतो; म्हणून झाडांना योग्य पाणी देणे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. – श्री. राजेंद्र भट, लोकसत्ता (२६.२.२०१५)
२ आ २. पाण्याचे प्रमाण : थंडीच्या दिवसांत कुंडीतील झाडांना २४ घंट्यांतून एकदा दिलेले पाणी पुरेसे होते. शक्यतो संध्याकाळच्या वेळी पाणी द्यावे. यामुळे बाष्पीभवनाने पाणी उडून जाणे टळते, तसेच झाडांना पूर्ण विश्रांती मिळून ती टवटवीत होतात. उन्हाळ्याच्या दिवसांत मात्र अशा झाडांना दोनदा पाणी देणे आवश्यक असते. कुंडीच्या २५ टक्के आकारमानाइतके पाणी रोपट्यांना पुरेसे असते. झाडांच्या मुळांशी पालेभाज्यांचे देठ, चहाचा चोथा आदी टाकलेले असेल, तर पाणी फारसे घालण्याची आवश्यकता भासत नाही. कुंडीमध्ये झाडाच्या चारही बाजूंनी पाणी द्यावे. कुंडीमधून आलेले मातीचे पाणी बाहेर सांडून घरातील फरशी खराब होऊ नये, यासाठी कुंडीच्या खाली प्लास्टिकची किंवा धातूची जुनी ताटली ठेवावी.
२ आ ३. झाडांसाठी पोषक पाणी : घरातील भांडी घासण्यापूर्वी साबण न लावता ती विसळून घ्यावीत आणि ते पाणी झाडांना थोडे थोडे घालावे. स्वयंपाक करतांना आपण डाळ, तांदूळ धुवून घेतो. ते धुतलेले पाणी असेच वाया न घालवता कुंडीमध्ये टाकावे. वेगळे पाणी वापरण्यापेक्षा हे पाणी अधिक पोषक ठरते, तसेच यामुळे पाण्याचा अपव्ययही टळतो. एक लिटरभर पाण्यात वाटीभर ताक मिसळून ते दिल्यास झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचप्रमाणे एक लिटर पाण्यात चिमूटभर हळद पूड, अर्धा कप निरसे दूध यांचे मिश्रणही झाडांसाठी लाभदायक असते.
– श्री. राजेंद्र भट, लोकसत्ता (१४.५.२०१५)
२ इ. झाडाला वरखत (पातळ खत) देणे आणि ते बनवण्याची पद्धत : कुंड्यांतील झाडांना १५ दिवसांच्या अंतराने पातळ खत दिल्यास ती अधिक प्रफुल्लित आणि नेहमी पाना-फुलांनी डवरलेली दिसतात. त्यासाठी गायीचे अनुमाने वाटीभर ताजे शेण तांब्याभर पाण्यात घालून काठीने ढवळून २४ घंटे भिजत ठेवावे. त्यानंतर त्यात भीमसेनी कापराचा लहान तुकडा चुरडून घालावा आणि हे मिश्रण पुन्हा ढवळून घ्यावे. असे सिद्ध झालेले खत प्रत्येेक झाडाला एक पेला या प्रमाणात द्यावे. हे वरखत देण्याआधी झाडाला साधे पाणी देणे आवश्यक आहे; कारण काही झाडे अधाशासारखी हे पाणी शोषून घेतात आणि त्यामुळे त्यांच्या मुळांना धोका पोहोचून झाड मरू शकते.
२ इ १. नत्र, स्फुरद आणि पालाश हे घटक पुरवणारे नैसर्गिक पदार्थ झाडाची सुकी पाने, भाज्यांचे देठ, साली यांचा वापर खत म्हणून करता येतो. त्यांच्यामुळे मातीची पोषणमूल्ये वाढतात. झाडाला नत्र मिळण्यासाठी मेथीच्या भाजीचा टाकाऊ भाग, तर स्फुरद (फॉस्फरस) मिळण्यासाठी कोबी, फ्लॉवर यांच्या देठांचा खत म्हणून वापर करावा. कित्येकदा पालाशाच्या (पोटॅशिअमच्या) अभावाने पाने गंजल्यासारखी दिसतात. अशा वेळी केळी, पपईची पाने वापरावीत. (संदर्भ : लोकसत्ता (२२.४.२०१५)
२ ई. ठराविक काळाने कुंडीतील माती पालटणे
२ ई १. कुंडीतील माती पालटण्याची पद्धत : मोठ्या कुंडीतील माती वर्षातून एकदा आणि लहान आकाराच्या कुंडीतील माती ६ मासांतून एकदा पालटावी. माती पालटते वेळी उभे राहून आपल्या डाव्या हाताची तर्जनी आणि मध्यमा या दोन बोटांच्या मध्ये झाड अलगद धरून कुंडी आपल्या हातावर पालथी करावी आणि दुसर्या हाताने कुंडीच्या काठाला खालून वर हलका झटका द्यावा. यामुळे कुंडीतून झाड मातीसह बाहेर निघेल. (पिशवीत लावलेल्या झाडाची माती पालटण्यासाठी झाड लावलेली पिशवी धारदार ब्लेडच्या साहाय्याने हलक्या हाताने उभी कापून तिच्यातून झाड मातीसह अलगद बाहेर काढावे.) त्यानंतर हलक्या हाताने झाडाच्या मुळांभोवतीची माती हळूवारपणे काढून त्याची मुळे दुखावली जाणार नाहीत, अशा पद्धतीने ते पुन्हा कुंडीत लावावे आणि पाणी द्यावे. माती पालटण्याची प्रक्रिया शक्यतो संध्याकाळी करावी; म्हणजे रात्रभर विश्रांती मिळाल्याने सकाळपर्यंत झाड पुन्हा टवटवीत होते. काही वेळा अनावश्यक मुळांची छाटणी करावी लागते. अशा वेळी त्यांना पूर्ण विश्रांती मिळावी; म्हणून पाणी दिल्यावर ती झाडे चार दिवस सावलीत ठेवावीत. एरव्ही कुंडीतील झाडांना भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असल्याने ज्या ठिकाणी तो भरपूर प्रमाणात मिळेल, अशा ठिकाणी झाडे ठेवावीत.
२ ई २. मोठ्या कुंडीतील माती पालटतांना घ्यावयाची काळजी : मोठ्या कुंडीतील माती पालटणे थोडे अवघड असते; म्हणून अशा कुंड्यांना माती पालटण्यापूर्वी आवश्यक तेवढे पाणी देऊन त्याचा निचरा झाल्यावर त्या भूमीला समांतर आडव्या ठेवाव्यात. पाण्यामुळे माती ओली झालेली असल्याने झाडाला मुळाशी धरून हळूहळू बाहेर ओढल्यावर ते मातीसह कुंडीच्या बाहेर येते.
२ उ. बुरशीजन्य रोगांना आळा घालण्यासाठी झाडांचे निर्जंतुकीकरण आवश्यक असणे : बर्याच वेळा आपण बाहेरून झाडे विकत आणतो. अशा वेळी त्या झाडांवर किंवा त्यांच्या बुंध्याशी निरनिराळे कीटक किंवा मुंग्या असू शकतात. अशा वेळी सुमारे अर्धी बालदी पाणी घेऊन त्यात १ चमचा हळदपूड, ४ चिमूट खाण्याचा हिंग आणि कापराच्या दोन वड्या चुरा करून टाकाव्यात आणि ते पाणी चांगले ढवळून घ्यावे. प्रत्येक झाड १० मिनिटे त्यात बुडवून नंतरच ते कुंडीत लावावे. त्यामुळे बुरशीजन्य रोगांनाही आळा बसतो.
२ ऊ. कुंडीतील झाडांवरील किडींचा प्रतिबंध करण्याचे घरगुती उपाय : काही वेळा कुंडीतील झाडांना मुंग्या, अळ्या, कोळी यांसारखे कीटक उपद्रव करतात. हे कीटक झाडाची पाने खाऊन टाकतात किंवा ती खराब करतात. मोठ्या अळ्या असल्यास त्या वेचून काढून माराव्यात. झाडावरील किडींना प्रतिबंध करण्यासाठी पुढीलपैकी कोणतेही घरगुती उपाय करून पहावेत.
१. दोन चमचे तंबाखू पाऊण तांब्या पाण्यामध्ये सकाळी भिजत घालून दुपारी तो त्याच पाण्यात उकळून त्याचा अर्धा तांब्या काढा करावा. हा काढा थंड झाल्यावर फवार्याच्या बाटलीत भरून सायंकाळच्या वेळेस कुंडीतील झाडावर सर्व बाजूंनी फवारावा. बहुतेक किडी सायंकाळच्या वेळेस येत असल्याने या वेळेत फवारणी करणे इष्ट ठरते. किडी पानांच्या खाली लपलेल्या असल्याने पानांच्या खालूनही फवारणी करावी.
२. तंबाखूप्रमाणेच कडुनिंबाचाही काढा करून त्याची फवारणी करता येते.
३. काही वेळा नुसत्या कापराच्या अथवा हिंगाच्या पाण्यानेही मुंग्या – किडी पळून जातात. कापराचे किंवा हिंगाचे पाणी करतांना हिंग किंवा कापूर पुरेशा पाण्यामध्ये उग्र वास येईल एवढ्या प्रमाणात घालावा.
– श्री. माधव रामचंद्र पराडकर, व्हाळशी, डिचोली, गोवा.
२ ए. झाडांना रोग झाल्यास भौतिक उपायांसह आध्यात्मिक उपायही करावेत ! : पुष्कळ वेळा झाडावर किडींचा प्रादुर्भाव होणे, बुरशी येणे, झाड वाळून जाणे आदी त्रासांमागे आध्यात्मिक कारणेही असू शकतात. यामुळे झाडाच्या संरक्षणासाठी भौतिक उपायांसह झाडावर विभूती फुंकरणे, झाडाभोवती नामजपाच्या पट्ट्यांचे मंडल काढणे, मंत्रांनी पाणी अभिमंत्रित करून ते झाडावर शिंपडणे यांसारखे आध्यात्मिक उपायही करावेत.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?)