‘शेवटच्या श्वासापर्यंत गुरुसेवा कशी करावी ?’, याचा आदर्श वस्तूपाठच साधकांसमोर घालून देणारे कल्याण (ठाणे) येथील पू. माधव साठे !

साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था

२३.४.२०२१ या दिवशी पू. माधव साठे यांनी देहत्याग केला. त्या निमित्ताने कल्याण येथे सेवारत असलेल्या पू. माधव साठेकाका यांच्याकडून कल्याण आणि ठाणे येथील साधकांना शिकायला मिळालेली अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.               

(भाग ४)

भाग १ वाचण्यासाठी या लिंकवर किल्क करा : https://sanatanprabhat.org/marathi/473932.html

भाग २ वाचण्यासाठी या लिंकवर किल्क करा : https://sanatanprabhat.org/marathi/474132.html

भाग ३ वाचण्यासाठी या लिंकवर किल्क करा : https://sanatanprabhat.org/marathi/474457.html


पू. (कै.) माधव साठे

२. सौ. दीक्षा पेंडभाजे आणि सौ. सीमा भोर

२ अ. दत्तजयंती आणि महाशिवरात्री या दिवशी ग्रंथकक्षाच्या समवेत वैयक्तिक संपर्कांचे नियोजन करून दिल्यामुळे ग्रंथवितरण वाढणे : ‘पू. साठेकाका कल्याण येथे आल्यावर ‘कुठलीही सेवा देवाला अपेक्षित अशी होण्यासाठी आणखी काय करूया ?’, याचे चिंतन करायचे. पू. साठेकाका कल्याण येथे येण्यापूर्वी दत्तजयंती आणि महाशिवरात्री या दिवशी साधक केवळ ग्रंथकक्षावर सेवा करायचे; मात्र पू. काकांनी या दिवशी साधकांचे नियोजन करून दिवसभर जिज्ञासूंना वैयक्तिक संपर्क करून ग्रंथवितरण करण्याची नवी कार्यपद्धत घालून दिली. तेव्हापासून कल्याण येथे प्रत्येक दत्तजयंती आणि महाशिवरात्री या दिवशी असे नियोजन व्हायला लागले. त्यामुळे समाजात अधिक प्रमाणात ग्रंथ वितरित होऊ लागले. अन्य वयस्कर साधकांचे ग्रंथकक्षावरच नियोजन असायचे; मात्र त्यांनी स्वतः अशी कुठलीच सवलत न घेता स्वतःचेही वैयक्तिक संपर्कांचे नियोजन केले.’

३. सौ. सीमा भोर, कल्याण, ठाणे.

३ अ. नेतृत्व : ‘पू. साठेकाका आम्हा ३ साधकांचा एक वर्षभर साधनेचा आढावा घेत होते. त्यांच्या आढाव्यातून आम्हाला फार आनंद मिळायचा. ‘जणूकाही गुरुमाऊली आमचा आढावा घेत आहे’, असे चैतन्य आणि सात्त्विकता आम्हाला जाणवायची.

३ अ १. प्रतिदिन गृहपाठ देऊन त्याचा अभ्यास करायला सांगणे आणि हळूहळू सर्व प्रकारच्या सेवा करण्यासाठी उद्युक्त करणे : पू. साठेकाका आम्हाला प्रतिदिन एक गृहपाठ द्यायचे आणि दुसर्‍या दिवशी त्याचा अभ्यास करून यायला सांगायचे. त्यामुळे आमची विचार करण्याची क्षमता वाढली. ‘विज्ञापने घेणे’, याविषयी माझ्या मनात फार नकारात्मकता होती. ‘मी विज्ञापने घेऊ शकत नाही. मला कुणी विज्ञापन देईल का ?’, असे विचार माझ्या मनात असायचे. मागील वर्षी गुरुपौर्णिमेच्या कालावधीमध्ये त्यांनी आम्हा तिन्ही साधकांकडून प्रयत्न करवून घेतले आणि आम्हाला प्रत्येकाला बरीच विज्ञापनेही मिळाली. त्या समवेत ग्रंथांचेही ध्येय दिले आणि आम्हाला ग्रंथांचीही मागणी मिळाली. ‘प्रत्येकाने प्रवचन ठरवायचे ध्येय घ्यायचे’, असेही त्यांनी आम्हाला सांगितले. अशा प्रकारे सगळ्या सेवा करण्यासाठी ते आम्हाला उद्युक्त करायचे आणि आमच्याकडून त्या करवूनही घ्यायचे.

३ आ. सेवेची तळमळ : कुठलाही उपक्रम असला, तरी त्यांचा ग्रंथ वितरणावर फार भर असायचा. त्यांचे प्रत्येक उपक्रमाचे ध्येय ‘१०० – २०० ग्रंथवितरण’, असेच असायचे आणि पू. साठेकाका ते पूर्णही करायचे. त्यांना गुरुमाऊलीने दिलेले ज्ञान समाजापर्यंत पोचवण्याचा ध्यास होता. ‘गुरुमाऊलीने जे काही ज्ञान लिहिले आहे, ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणे, हीच आपली साधना आहे’, अशी पू. काकांना तीव्र तळमळ होती आणि त्यासाठी ते फार प्रयत्न करायचे. पू. काकांना गुरुकार्याची पुष्कळ तळमळ होती. ते गुरुमाऊलीला अपेक्षित अशीच सेवा करायचे.

३ इ. प्रार्थना : गुरुमाऊलीच्या कृपेने आम्हाला पू. साठेकाकांसारखे सहसाधक मिळाले आणि त्यांच्याकडून शिकता आले. ‘या सर्व गोष्टी आम्हाला कृतीत आणता येऊ दे’, हीच गुरुमाऊलीच्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.’

४. श्री. राकेश सुरेश गोडांबे, कल्याण

४ अ. सकाळी पत्नीचे निधन झालेले असतांनाही अत्यंत स्थिर राहून संपर्काची सेवा करणे : ‘साठेकाकूंना देवाज्ञा झाली, त्याच दिवशी मी होमिओपॅथी वैद्या (सौ.) राजश्री घाडगे यांच्याकडे माझ्या वडिलांचे औषध घ्यायला गेलो होतो. त्या साठेकाकूंनाही औषधे द्यायच्या. ‘साठेकाकूंना देवाज्ञा झाली’, असे कळल्यावर त्यांनाही पू. साठेकाकांना संपर्क करायचा धीर होत नव्हता. आमचे बोलणे चालू असतांना पू. काकांचाच होमिओपॅथी वैद्या (सौ.) घाडगे यांना भ्रमणभाष आला. त्यांनी भ्रमणभाष ‘स्पीकर’वर ठेवला होता. पू. साठेकाका फार स्थिर आणि शांतपणे बोलत होते. त्यांची वेगळीच स्थिती जाणवत होती. पू. काकाच डॉ. घाडगे यांना समजावत होते. हे बोलून झाल्यावर पू. काकांनी सौ. घाडगे यांना सोमवारी गुढीपाडव्याच्या प्रवचनाचे प्रयत्न करायला सांगितले. तेव्हा सौ. घाडगे स्तंभित झाल्या. एवढेच नाही, तर त्यांनी अक्षय्य तृतीयेसाठी विज्ञापन देण्याविषयीही सांगितले. तेव्हा सौ. घाडगे यांचे डोळे भरून आले. त्या पू. साठेकाकांना म्हणाल्या, ‘‘तुम्ही सांगाल, तसे करते !’’

४ आ. पू. साठेकाकांचे बोलणे ऐकतांना ‘स्वतःचे प्रयत्न किती न्यून आहेत ?’, याची प्रकर्षाने जाणीव होणे : हे सर्व ऐकतांना माझी स्थितीही वेगळीच झाली होती. माझा पुष्कळ भाव जागृत होत होता. ‘गुरुसेवा कशी करावी ? झोकून देऊन कसे प्रयत्न केले पाहिजेत ?’, हे मला या प्रसंगातून शिकायला मिळाले. ‘मी किती न्यून पडत आहे ? माझे प्रयत्न किती अल्प आहेत ?’, याचीही मला प्रकर्षाने जाणीव झाली आणि खंतही वाटली. पू. साठेकाकांनी आम्हाला प्रत्येक सेवा आणि साधनेचे सूत्र हे कृतीच्या स्तरावर शिकवले आहे.

४ इ. अभ्यासू वृत्ती : दत्तजयंती किंवा महाशिवरात्री यांसाठीचे प्रदर्शन लावायचे असो, वाचक संपर्क असो वा अर्पण सेवा असो, या सर्व सेवा करतांना त्यांचा वस्तुनिष्ठ अभ्यास असायचा. पू. काकांची निरीक्षणक्षमताही फार प्रचंड होती.

४ ई. परिपूर्ण सेवा : उपक्रम सेवांमध्ये मला पू. साठेकाकांकडून एक महत्त्वाचे सूत्र शिकायला मिळाले. ‘सर्व उपक्रम थोडे थोडे करण्यापेक्षा कुठलाही एक उपक्रम ठरवून तो नीट आणि परिपूर्ण होईल, यासाठी प्रयत्न करूया’, असे त्यांचे नेहमी सांगणे असायचे.

४ उ. जिज्ञासूंना चैतन्याच्या स्तरावर जोडणे : गुढीपाडव्याच्या दिवशी मला पू. साठेकाकांच्या संपर्कातील जिज्ञासूंना शुभेच्छा देण्याची सेवा मिळाली. ही सेवा करतांना मला वेगळीच आनंदाची अनुभूती येत होती. पू. साठेकाकांनी ‘प्रत्येक वाचक, धर्माभिमानी, हितचिंतक आणि जिज्ञासू यांना सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्याशी चैतन्याच्या स्तरावर जोडले आहे’, याचा अनुभव मला घेता आला. गुरुकृपेमुळेच संपर्क सेवेत मला त्यांचा सतत सत्संग मिळाला आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. मला त्यांच्याकडून ‘कृतीच्या स्तरावर कसे प्रयत्न करायचे ?’, हे शिकता आले.

४ ऊ. अनुभूती : ‘पू. साठेकाकांनी देहत्याग केला’, हे कळल्यावर मी एकदम निःशब्द आणि शांत झालो. तेव्हा मी जी स्थिती अनुभवली, ती या आधी कधीही अनुभवली नाही. त्यांच्या समवेत केलेली सेवा आणि त्यांचे मार्गदर्शन आठवून माझा कृतज्ञताभाव जागृत झाला होता. माझी आई ४ वर्षांपूर्वी गेली. त्या वेळीही मी असे अनुभवले नव्हते.

४ ए. प्रार्थना आणि कृतज्ञता : ‘आज माझे साधनेचे जे काही प्रयत्न होत आहेत, ते त्यांचा सहवास आणि मार्गदर्शन यांमुळेच होत आहेत’, हे आता लक्षात येते. यासाठी पू. साठेकाका आणि गुरुदेव यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. ‘मला पू. काकांप्रमाणे झोकून देऊन सेवा करता येऊ दे. त्यांच्याकडून जे काही शिकलो आहे, ते मला कृतीत आणता येऊ दे’, अशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कळकळीची प्रार्थना !’

५. श्री. विनोद पालन, ठाणे   

५ अ. उत्साही : ‘पू. साठेकाकांचा उत्साह पाहून मला ‘ते तरुण आहेत’, असे वाटायचे.

५ आ. परिस्थिती स्वीकारणे : साठेकाकूंची स्थितीही वयोमानानुसार नाजूक होती. त्यांना चालायचा त्रास होता. पू. साठेकाका काकूंचे सर्व आवरून सेवेसाठी वेळेचे नियोजन करायचे. इतर वयस्कर व्यक्तींप्रमाणे त्यांचे काहीच गार्‍हाणे नसायचे. त्यांनी परिस्थितीला दोष न देता ती आनंदाने स्वीकारली होती.

५ इ. साधकांना प्रोत्साहन देणे : गेली २ वर्षे सेवेमुळे माझा पू. साठेकाकांशी अनेक वेळा संपर्क आला. मी एखादा संपर्क त्यांच्या समवेत केल्यावर ते ‘संपर्क फारच छान झाला’, असे मला सांगायचे.

५ ई. सकारात्मक दृष्टीकोन देणे : माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे माझ्याकडून २ वेळा गंभीर चुका झाल्या होत्या. त्यामुळे मला फार निराशा येऊन मनात नकारात्मकता निर्माण झाली होती. त्यानंतर माझा पू. साठेकाकांशी संपर्क झाल्यावर ते मला म्हणायचे, ‘‘आज नेहमीसारखा वाटत नाहीस.’’ त्यानंतर ते मला सकारात्मक दृष्टीकोन द्यायचे. त्या वेळी ते मला त्यांच्या साधनेतील काही प्रसंग सांगायचे आणि म्हणायचे, ‘‘यातून श्री गुरु आणि संत यांनी माझ्यावर कृपा केली अन् माझ्यातील अहं न्यून केला.’’ त्यांच्या या बोलण्याने माझे मन पूर्णतः सकारात्मक व्हायचे.

५ उ. सेवेचा ध्यास : पू. साठेकाकांना दळणवळण बंदीनंतर सेवेसाठी जायचे होते; पण ‘बरेच दिवस घरी थांबून राहिल्याने माझी चालण्याची क्षमता न्यून झाली आहे’, असे त्यांनी सांगितले. त्यावरही त्यांनी उपाय शोधला. त्यांनी साधक आणि धर्मप्रेमी यांचे साहाय्य घेतले अन् दुचाकीचे नियोजन करून संपर्क सेवा चालू केली. ते कुठेच थांबून राहिले नाहीत. त्यांचा सेवेचा हाच ध्यास शेवटपर्यंत होता.

५ ऊ. चैतन्याची अनुभूती

१. पू. साठेकाकांच्या संपर्कात आल्यावर त्यांच्यातील चैतन्याने माझा शारीरिक शीण निघून जायचा आणि उत्साह वाढायचा.

२. माझा त्यांच्याशी संपर्क होई, त्या प्रत्येक वेळी मला त्यांच्याकडून सकारात्मक ऊर्जा मिळायची.

३. संतांचा सत्संग लाभल्यावर नामजप चालू होतो किंवा भावजागृती होते आणि तळमळ वाढते, तसे पू. साठेकाकांच्या संपर्कात आल्यावर मला अनुभवायला मिळायचे.’

६. सौ. श्रेया महाडिक, कल्याण

६ अ. ‘साधकांची साधना व्हावी’, अशी तळमळ असणे : ‘प्रत्येक साधकाने सेवा करून साधनेत प्रगती करावी’, असे त्यांना वाटायचे. पू. साठेकाका साधकांना सेवेचे दायित्व घेण्यास सांगून ‘सेवा करतांना भाव कसा असावा ? ध्येय कसे घ्यावे आणि निरपेक्षपणे सेवा कशी करावी ?’, याविषयी मार्गदर्शन करायचे.

६ आ. स्वतःची प्राणवायूची पातळी न्यून झाली असतांना साधकांना सेवेत साहाय्य करणारे पू. साठेकाका ! : ‘एकदा एका सेवेअंतर्गत मी पू. साठेकाकांना संपर्क केला होता. तेव्हा त्यांना पुष्कळ त्रास होत होता. त्यांना उठून बसण्याचीही शक्ती नव्हती, तरीही पू. काकांनी माझ्या समवेत ती सेवा पूर्ण केली. नंतर ‘त्या वेळी सेवा करतांना पू. साठेकाकांची ‘प्राणवायूची पातळी फार न्यून झाली होती’, असे मला कळले. यावरून त्यांची सेवेप्रतीची तळमळ आणि साधकांप्रती असलेला प्रेमभाव मला अनुभवता आला.’

७. सौ. भक्ती महाजन, कल्याण

७ अ. सेवेची तीव्र तळमळ आणि चिकाटी असलेले पू. साठेकाका ! : ‘गेल्या वर्षी गावांगावात हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे नियोजन केले होते. तेव्हा पू. साठेकाका आमच्या समवेत अर्धा घंटा रिक्शाने प्रवास करून गावात यायचे आणि दिवसभर प्रसारासाठी फिरायचे. त्यांना दम्याचा त्रास असल्याने चालतांना त्यांना मध्ये कधी तरी ‘श्वास लागू नये’, यासाठी असलेला औषधांचा फवारा (स्प्रे) घ्यावा लागायचा. तेव्हा थोडे थांबून ते फवारा (स्प्रे) घ्यायचे आणि पुन्हा चालू लागायचे. त्यांच्यातील तीव्र चिकाटीमुळे कितीही अडचणी आल्या, तरी ते सेवा पूर्णच करायचे. इतकी त्यांची साधनेची तळमळ तीव्र होती.

७ आ. कृतज्ञता : पू. साठेकाकांमध्ये प.पू. गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव होता. त्यामुळे हाती घेतलेली सेवा ते परिपूर्णच करायचे. ते त्यांच्या बुद्धीचा परिपूर्ण वापर करायचे. त्यामुळे पू. काकांच्या सेवेची फलनिष्पत्ती अधिक असायची. देवाने इतकी वर्षे आम्हाला पू. काकांचा सहवास दिला आणि पुष्कळ काही शिकवले. त्यासाठी गुरुदेवांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !’

८. सौ. नलिनी धोंगडे, कल्याण

‘पू. साठेकाका कल्याण केंद्रात आल्यापासून समष्टी सेवा करतांना ‘तळमळ कशी वाढवायची ?’, हे मला शिकायला मिळाले. आधी ‘मला विज्ञापनांची सेवा जमणार नाही’, असाच माझा विचार असायचा; परंतु पू. काकांनी विज्ञापनांची सेवा सोप्या पद्धतीने शिकवून करवूनही घेतली. त्यांनी आमच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी बसवून घेतली.’

९. श्री. सुदिन भावे, कल्याण

‘पू. साठेकाकाकांमुळेच मी साधनेत टिकून आहे. प्रत्येक अडचणीत ते मला सहकार्य करायचे. मला निराशेतून बाहेर काढायचे. मला साधनेसाठी घरातून विरोध आहे. मी माझ्या मनातील सर्व विचार पू. साठेकाकांशी बोलू शकत असे. पू. काकांप्रती पुष्कळ कृतज्ञता !’

१०. ठाणे जिल्ह्यातील सर्व साधक

‘पू. साठेकाका म्हणजे गुणांची खाण ! पू. साठेकाका म्हणजे प्रेमाचा झरा ! पू. साठेकाका म्हणजे ‘गुरुकार्य कसे करावे ?’, याचे मूर्तीमंत उदाहरण ! आम्हाला त्यांच्यातील ‘प्रेमभाव, साधनेची तळमळ, सेवेचा ध्यास, लहान होऊन सेवा करणे, शिकण्याची वृत्ती आणि गुरूंप्रती दृढ श्रद्धा, नियोजन कौशल्य, चिकाटी’, असे अनेक दैवी गुण अनुभवता आले. पू. साठेकाकांनी ‘शेवटच्या क्षणापर्यंत गुरुसेवा कशी करायची ?’, याचा आदर्श वस्तूपाठच आमच्या समोर ठेवला.

‘हे गुरुदेवा, आम्हा साधकांना पू. साठेकाकांचा अनमोल सत्संग दिल्यामुळे आम्ही आपल्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती न्यूनच आहे. ‘पू. साठेकाकांसारखे गुण, तळमळ, सेवेचा ध्यास आणि तुमच्या चरणांप्रती दृढ श्रद्धा आमच्यात निर्माण होऊ दे’, अशी आपल्या पावन चरणी प्रार्थना आहे !’

११. सौ. विनया सावंत, कल्याण – अनुभूती

‘माधव साठेकाकांविषयीची ही धारिका संकलित करतांना माझी भावजागृती होत होती. सेवा करतांना माझ्यावरील आवरण दूर होऊन मला पुष्कळ हलकेपणा जाणवत होता. धारिकेत साठेकाकांच्या नावाचा उल्लेख आल्यावर तिथे ‘पू. साठेकाका’, असे आपोआप म्हटले जात होते.’  (क्रमशः)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक