स्वतःचे आचरण आणि भाव यांमुळे इतरांमध्ये सकारात्मक पालट घडवू शकणारे पू. माधव साठे !

साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था

पू. (कै.) माधव साठे

‘पू. माधव साठेकाका म्हणजे परिपूर्ण सेवा करणारे व्यक्तीमत्त्व होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची सेवेची तळमळ दिसून आली. २३.४.२०२१ या दिवशी पू. माधव साठे यांनी देहत्याग केला. रुग्णाईत असूनही ते सेवा, नामजप आणि नामजपादी उपाय नियमितपणे करत होते.

भाग २

भाग १ वाचण्यासाठी या लिंकवर किल्क करा : https://sanatanprabhat.org/marathi/473932.html


१. पू. साठेकाकांनी शेवटपर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवून क्रियमाणाचा पूर्ण वापर करणे

पू. (सौ.) संगीता जाधव

पू. साठेकाकांना कोरोना झाला आणि त्यांची ऑक्सिजनची पातळी ८८ ते ९२ यांमध्ये येत होती; परंतु अतीदक्षता विभागात जागा मिळत नव्हती. तेव्हा ‘अन्य रुग्णालयात ‘ऑक्सिजन’ उपलब्ध होतो का ? अन्य आधुनिक वैद्यांचे मार्गदर्शन घ्यायला हवे का ? हिंदुत्वनिष्ठांना संपर्क करायला हवा का ?’, असा त्यांचा विचार होता. कोरोनामुळे परिस्थिती अतिशय भयंकर झाली होती. सर्वच रुग्णालये रुग्णांनी भरली होती. अतीदक्षता विभागात भरती होण्यासाठी रुग्णांच्या रांगा लागत होत्या. ‘ऑक्सिजन’ मिळत नव्हता आणि मृतांची संख्याही वाढत होती. तेव्हा पू. साठेकाकांच्या समवेत असलेली त्यांची मुलगी सौ. मानसी त्यांना म्हणाली, ‘‘बाहेरून कुठलेही साहाय्य मिळत नाही. आता देवच काय ते करील ?’’ तेव्हा ते तिला म्हणाले, ‘‘माझ्या समवेत परात्पर गुरु डॉक्टर आहेत. माझी त्यांच्यावर दृढ श्रद्धा आहे; परंतु आपण स्थुलातील क्रियमाण चुकवायला नको. सर्व देवच करत आहे. आपण केवळ आपले क्रियमाण वापरायचे आहे.’’

२. शेवटच्या क्षणापर्यंत पत्नीला साहाय्य करणारे आणि तिचे निधनही सहजतेने स्वीकारणारे पू. साठेकाका !

पू. साठेकाका आणि काकू दोघेही रुग्णालयात जवळजवळ होते. काकूंची प्रकृती फारच खालावलेली असल्यामुळे पू. साठेकाका स्वतः रुग्णाईत असूनही काकूंना साहाय्य करत होते. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत पत्नीची सेवा केली. साठेकाकूंच्या निधनानंतर मी भ्रमणभाष करून काकांना विचारले, ‘‘तुम्ही बरे आहात ना ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी बरा आहे. देवाने तिला (पत्नीला) अधिक त्रास होऊ दिला नाही. अगदी व्यवस्थित नेले.’’ त्यांच्या बोलण्यात किंचितही गार्‍हाणे नव्हते किंवा कुठल्याही प्रकारच्या भावना व्यक्त होत नव्हत्या.

३. अत्यंत त्रास होत असूनही जेवणापूर्वी प्रार्थना करूनच ग्रहण करणे

जेवणापूर्वी त्यांना जेवणासाठी उठवून बसवले जायचे. तेव्हा त्यांचे हात फार थरथरायचे. तरीही ते नेहमीप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, श्री गणेश आणि अन्य देवतांना प्रार्थना करून, अन्न चैतन्याने भारीत करूनच ग्रहण करायचे.

४. पत्नीचे निधन झाले असतांना स्थिर राहून सेवा करणारे आणि भावनेच्या पलीकडे गेलेले पू. साठेकाका !

४ अ. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या चर्चासत्रांची आमंत्रणे हिंदुत्वनिष्ठांना देणे : पू. साठेकाकांची साधनेची तळमळ तीव्र होती. त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते आणि ते स्वतः रुग्णाईत होते. अशा परिस्थितीतही ते रुग्णालयातून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित राष्ट्र-धर्म विषयक चर्चासत्रांचे निमंत्रण देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना भ्रमणभाषवरून संपर्क करत होते.

४ आ. ‘स्वतः केलेल्या साधनेमुळे पत्नीला पुढची गती सुलभतेने मिळेल’, अशी दृढ श्रद्धा असल्यामुळे स्वतःची व्यष्टी साधना पूर्ण करून समष्टी सेवा करणारे पू. साठेकाका ! : साठेकाका ५ घंटे व्यष्टी नामजप पूर्ण करून ५ घंटे सेवा करत होते. तेव्हा ‘कालच आईचे निधन झाले आहे, तरी बाबा सतत सेवा करत आहेत’, हे पाहून त्यांच्या मुलीने त्यांना विचारले, ‘‘बाबा, तुम्ही अशा स्थितीतही सेवा करत आहात ? तुम्हाला काही वाटत नाही का ?’’ तेव्हा त्यांनी तिला सांगितले, ‘‘मी आता अन्य काहीच करू शकत नाही. मी स्वतः रुग्णाईत असल्याने तिच्यासाठी कुठले विधी करण्यासाठी बाहेरही जाऊ शकत नाही. उलट मी सेवा आणि साधना केली, तर तिचा पुढचा प्रवास सुलभ होईल.’’ यातून ‘पू.काका निरपेक्षतेच्या टप्प्यात गेले होते’, हे लक्षात येते.

५. पू. साठेकाकांची सेवा केल्याने मुलीमध्ये झालेला सकारात्मक पालट !

५ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पू. साठेकाकांचा असलेला भाव, शरणागती आणि सेवेची तळमळ पाहून मुलीमध्ये पालट होणे : शेवटचे काही दिवस पू. साठेकाकांची मुलगी मानसी त्यांच्या समवेत होती. पू. काकांना तीव्र त्रास होत असूनही ‘त्यांचा गुरुदेवांप्रतीचा याचकभाव, सेवेची तळमळ, शरणागत भाव, गुरुदेवांना आळवणे, गुरूंप्रतीची शरणागती यांमुळे मानसीमध्ये सकारात्मक पालट झाला’, असे माझ्या लक्षात आले. (एरव्ही तिच्या बोलण्यात तिला असणार्‍या आध्यात्मिक त्रासामुळे नकारात्मकता जाणवायची.)

५ आ. पू. साठेकाकांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव, तळमळ, शरणागती आणि मुलीने केलेली त्यांची भावपूर्ण सेवा यांमुळे तिला त्यांचे निधन स्वीकारता येणे : सौ. मानसीला आध्यात्मिक त्रास आहे. त्यामुळे तिच्यामध्ये नकारात्मक विचार करणे, विकल्प येणे, भावनाशीलता यांची तीव्रता अधिक होती. तिच्या आईचे निधन झाल्यावर ती म्हणाली, ‘‘आता आई गेलीच आहे; परंतु बाबा कुठल्याही परिस्थितीत घरी यायला हवेत.’’

तिच्या या मानसिक स्थितीमुळे पू. साठेकाकांचे (बाबांचे) निधन, ही मानसीसाठी सहजासहजी सहन होणारी गोष्ट नव्हती; परंतु परिस्थिती एकदम पालटली. काही दिवसांचा पू. काकांचा सहवास, तिने केलेली त्यांंची सेवा आणि सेवेतील तिची एकरूपता यांमुळे तिच्यात पालट झाला. त्यांचे निधन झाल्याचे तिने सहजतेने स्वीकारले. ‘बाबा जातांना काय काय अनुभवले ?’, हे तिने मला सहजतेने सांगितले. त्या वेळी तिचे मन शांत होते आणि ती आनंदी होती. पू. साठेकाकांच्या शेवटच्या क्षणी ती त्यांना ‘गुरुदेव तुमच्या समवेत आहेत’, असे सांगत होती. तेव्हा पू. साठेकाका अतीदक्षता विभागात होते आणि ती बाहेर होती. त्या वेळी तिने भ्रमणभाषवरून ‘ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे…..।’ हा श्‍लोक म्हटला. त्याला पू. साठेकाका प्रतिसाद देत होते आणि शेवटी ‘जय गुरुदेव’, असे म्हणून त्यांनी प्राण सोडला. हे सर्व बघून तिच्यामध्ये पालट झाला आणि ‘बाबा अजून रहायला हवे होते’, हा तिच्या मनातील विचार निघून गेला.

५ इ. ‘पू. साठेकाकांच्या केलेल्या सेवेचा मुलीला आध्यात्मिक लाभ झाला’, असे जाणवणे : मी तिला भ्रमणभाष केला आणि ‘‘कशी आहेस ?’’, असे विचारले. तेव्हा तिला देवाचे अस्तित्व अनुभवता येत होते. ती स्थिर असल्याचे जाणवले. तिने बाबांची चांगली सेवा केली. त्यातून भगवंताने तिला इतके दिले की, त्यांच्या समवेत तीही स्थिर आणि आनंदी झाली. तेव्हा माझा विश्‍वास बसत नव्हता. ‘नकारात्मक बोलणारी मानसीताई हीच आहे का ?’, ती स्वतःच मला बाबा आणि ते करत असलेल्या सेवा यांविषयी उत्साहाने सांगत होती. मोठे काहीतरी मिळाल्याचा आनंद तिच्या बोलण्यातून जाणवत होता. त्या वेळी ‘अनेकांनी तिच्याशी बोलून हा आनंद घ्यायला हवा’, असे मला वाटले.’

– (पू.) सौ. संगीता जाधव, ठाणे (१.५.२०२१) (क्रमशः)

पू. माधव साठे यांच्या मुली आणि जावई यांना त्यांची जाणवलेली वैशिष्ट्ये

१. सौ. प्राची मराठे (पू. साठेकाका यांची ज्येष्ठ कन्या)

१ अ. कुटुंबियांवर साधनेचा संस्कार करून त्यांच्याकडून साधना करवून घेणे : ‘साधनेत नियमितपणा असायला पाहिजे’, याकडे बाबांचा भर असायचा. माझी व्यष्टीची घडी नीट बसायला हवी, याकडे त्यांचे लक्ष असायचे. सकाळी ‘ऑनलाईन’ होणार्‍या सामूहिक नामजपाला मी जोडलेली नसेल, तर ते आईला मला संपर्क करायला सांगून जपाला बसायला सांगायचे. घरात वादाचा प्रसंग झाल्यास ते अतिशय स्थिर असायचे. माझ्या मोठ्या मुलीवर त्यांनी साधनेचा संस्कार बिंबवला. त्यामुळे ती नियमित नामजप करायला लागली.

२. सौ. कल्याणी फडके (पू. साठेकाका यांची कनिष्ठ कन्या)

२ अ. स्वावलंबी : ‘घरात कोणतेही काम असले, तरी बाबा त्यात साहाय्य करायचे. शक्यतो ‘स्वतःचे काम अन्य कुणाला करायला लागू नये’, असा बाबांचा प्रयत्न असायचा. ते आईलाही असेच समजावून सांगायचे. त्यांची आणि आईची सर्व कामे ते स्वतः करायचे.

२ आ. समजूतदारपणा : बाबा अतिशय समजूतदार होते. ते आहे ती परिस्थिती त्वरित स्वीकारायचे. त्यांना कोणतीच आवडनिवड नव्हती.

२ इ. कल्पकता : बाबांकडे कल्पकता होती. त्यांच्या नातवाला शाळेत कंदील सिद्ध करायला सांगितला होता. त्या वेळी त्यांनी नातवाकडून छान कंदील सिद्ध करवून घेतला.’

३. श्री. जितेंद्र जोशी (पू. साठेकाका यांचे मधले जावई)

३ अ. साधकत्व : ‘बाबा अतिशय संयमी होते. ते व्यवस्थित समजावून सांगायचे. त्यांना राग यायचा नाही. त्यांची साधना, नामजप आणि सेवा यांमध्ये सातत्य होते. ते नियमित वृत्तपत्र वाचन आणि सभोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास करायचे. सतर्क आणि सावध असायचे. ते नेहमी सर्वांना निरपेक्षपणे साहाय्य करायचे. त्यांना पैसे आणि व्यावहारिक गोष्टी यांमध्ये आसक्ती नव्हती. ते सर्वांशी मिळून मिसळून वागायचे.’

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.