‘शेवटच्या श्वासापर्यंत गुरुसेवा कशी करावी ?’, याचा आदर्श वस्तूपाठच साधकांसमोर घालून देणारे कल्याण (ठाणे) येथील पू. माधव साठे !

साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था

 

२३.४.२०२१ या दिवशी पू. माधव साठे यांनी देहत्याग केला. त्या निमित्ताने कल्याण येथे सेवारत असलेल्या पू. माधव साठेकाका यांच्याकडून कल्याण आणि ठाणे येथील साधकांना शिकायला मिळालेली अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.      

(भाग ३)

भाग १ वाचण्यासाठी या लिंकवर किल्क करा : https://sanatanprabhat.org/marathi/473932.html

भाग २ वाचण्यासाठी या लिंकवर किल्क करा : https://sanatanprabhat.org/marathi/474132.html


पू. (कै.) माधव साठे

१. सौ. दीक्षा पेंडभाजे, कल्याण

१ अ. वेळेचे गांभीर्य : ‘पू. माधव साठेकाका अत्यंत वक्तशीर होते. त्यांना कल्याण येथील सत्संगासाठी यायला कधीच उशीर झाला नाही. मला सत्संगासाठी यायला उशीर व्हायचा. तेव्हा ‘वेळेआधी सत्संगाला पोचण्यासाठी काय करू शकतो ?’, याविषयी त्यांनी मला मार्गदर्शन केले आणि त्याप्रमाणे माझ्याकडून वेळेआधी येण्यासाठी प्रयत्न करवून घेतले. ‘त्यांना सत्संगाला यायला जमणार नसेल, तर ते आठवणीने मला तसे कळवायचे.

१ आ. तत्त्वनिष्ठ : पू. साठेकाका तत्त्वनिष्ठ होते. त्यामुळे कुणाकडूनही चूक झाल्यास ते त्यांना स्पष्टपणे चुकीची जाणीव करून द्यायचे. ते मला माझ्या चुका सांगतांना काही वेळा रागवायचेही; मात्र त्यामागे ‘माझी साधना व्हावी’, हीच त्यांची तळमळ असायची. तेव्हा ‘त्या ठिकाणी गुरुमाऊली असती, तर तिनेही मला याच शब्दांत सांगितले असते’, याची मला जाणीव व्हायची. पू. साठेकाकांचा विशुद्ध भाव असल्यानेच त्यांनी कशीही चूक सांगितली, तरी मला कृतज्ञताच वाटायची. त्यांनी वेळोवेळी मला साधक वडिलांप्रमाणे स्वानुभव सांगून साधनेत मार्गदर्शन केले.

१ इ. व्यष्टी साधना पूर्ण करणे : त्यांची समष्टी प्रकृती होती; मात्र त्यांनी कधीही ‘सेवा आहे’; म्हणून उपायांसाठी सवलत घेतली नाही. ते त्यांचे उपाय सकाळी लवकर उठून पूर्ण करायचे आणि दिवसभर सेवेसाठी बाहेर पडायचे. पू. साठेकाका केवळ स्वतःचेच नाही, तर साठेकाकूंचेही चित्रांचे उपाय नियमितपणे करायचे. काकूंना स्वत:चे काहीच करता यायचे नाही. त्यामुळे पू. साठेकाका सकाळी आणि रात्री नियमित काकूंचीही चित्रे पालटून चित्राचे उपाय गांभीर्याने पूर्ण करायचे.

१ ई. इतरांना समजून घेणे : पू. साठेकाका सत्संगाला न येणार्‍या साधकांच्या घरी जाऊन त्यांची वैयक्तिक भेट घ्यायचे आणि त्यांच्या अडचणी समजून घ्यायचे. त्यांना सत्संगातील सूत्रे सांगून सेवेसाठी उद्युक्त करायचे.

१ उ. पू. माधव साठेकाकांची सेवेविषयी जाणवलेली तळमळ आणि भाव !

१ उ १. उन्हाळा किंवा स्वतःचे वय या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता उत्साहाने सेवारत रहाणे : पू. साठेकाकांमध्ये उच्चकोटीचा सेवाभाव होता. ते कुठल्याही सेवेत सहजतेने सहभागी व्हायचे. सेवा करतांना कधीही त्यांना वय किंवा ऊन यांचा अडथळा आला नाही. कल्याण येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे नियोजन केल्यावर त्यात ते सक्रीय सहभागी व्हायचे. ‘वैयक्तिक संपर्क, घरोघरी सभेचा प्रसार, सभेसाठी जागा मिळवणे’, अशा सर्व प्रकारच्या सेवांमध्ये ते सहभागी होत होते.

१ उ २. आधी केले, मग सांगितले ! : पू. साठेकाका ‘एखादी सेवा कशी करू शकतो ?’, याविषयी सांगायचे. तेव्हा त्यांनी आधी ती सेवा तशी केलेली असायची. त्यामुळे ते आत्मविश्वासाने सांगू शकायचे. त्यांच्या या सांगण्यामुळे आम्हालाही प्रेरणा मिळायची.

१ उ २ अ. ‘तीव्र त्रास होत असतांना सेवा केल्यास त्रास त्वरित न्यून होतो, अशी स्वानुभूती आहे’, असे पू. साठेकाकांनी सांगणे : मला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. एकदा मी पू. साठेकाकांच्या समवेत संपर्काला जाणार होते; परंतु माझा त्रास वाढला होता. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मलाही असा त्रास होतो. तेव्हा मी तत्परतेने सेवेसाठी बाहेर पडतो आणि लगेचच माझा त्रास न्यून होतो.’’ त्याप्रमाणे मीही त्यांच्या समवेत सेवेला बाहेर पडले आणि माझाही त्रास न्यून झाला. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘सर्व आध्यात्मिक त्रासांवर सेवा (साधना) हाच प्रभावी उपाय आहे.’’

१ उ २ आ. पू. साठेकाका सत्संगानंतर लगेचच २-३ संपर्काच्या सेवा करायचे. ते म्हणायचे, ‘‘सत्संगात आपल्याला समष्टी गुरुतत्त्व आणि देवतांचे चैतन्य मिळते. त्याचा लाभ होतो.’’

१ उ २ इ. ‘गुरुदेवांचे ग्रंथ घराघरांत पोचले पाहिजेत’, अशी तळमळ असणे : त्यांना नेहमी ‘गुरुदेवांचे ग्रंथ घराघरांत पोचवायला हवेत’, असे वाटायचे. यासाठी ते साधकांमध्ये जागृती करून साधकांकडून ग्रंथवितरण करवून घ्यायचे आणि ते स्वतःही मोठ्या प्रमाणात समाजात ग्रंथवितरण करायचे.

१ उ ३. समाजातील जिज्ञासूंना सेवेत सहभागी करवून घेणे : समाजातील चांगल्या जोडल्या गेलेल्या जिज्ञासूंना साधनेत पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांनी तळमळीने प्रयत्न केले. जिज्ञासूंकडून केवळ अर्पण किंवा विज्ञापने यांच्या माध्यमातून धनाचा त्याग करवून घेण्यापर्यंत मर्यादित न रहाता ते प्रत्येक वेळी जिज्ञासूंना पुढच्या टप्प्याची सेवा देण्याचे नियोजन करायचे. ते जिज्ञासूंना नियमित भेट द्यायचे आणि जिज्ञासूंचा योग्य अभ्यास करून ‘त्यांच्याकडून काय सेवा करवून घेऊ शकतो ?’, याचे चिंतन करून त्याप्रमाणे कृती करायचे. त्यांनी ‘त्यांना ग्रंथकक्षाच्या सेवेत सहभागी करवून घेणे, धर्मसभेच्या सेवेत पूर्ण दिवस सहभागी करून घेणे, त्यांच्याकडून प्रवचनांचे आयोजन करवून घेणे, ग्रंथ आणि सनातन पंचांग यांचे वितरण करवून घेणे, जिज्ञासू आणि समाजातील अन्य व्यक्तींकडून अर्पण अन् विज्ञापने घेण्यास उद्युक्त करणे’, अशा विविध सेवा करवून घेतल्या.

१ ऊ. पू. माधव साठेकाकांविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

१ ऊ १. ‘शेवटच्या श्वासापर्यंत गुरुसेवा कशी करायची ?’, हे कृतीतून शिकवणारे पू. साठेकाका ! : पू. साठेकाका रुग्णाईत झाल्यावर त्यांना कृत्रिम प्राणवायू (ऑक्सिजन) लावला होता. ते अतीदक्षता विभागात भरती होते; मात्र त्या वेळीही ते ‘भावसत्संग ऐकणे, सकाळच्या सामूहिक नामजपाला जोडणे, सत्संगांच्या ‘लिंक’ जिज्ञासूंना पाठवणे, अर्पण आणि विज्ञापने यांचे गुरुपौर्णिमेसाठी घेतलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी जिज्ञासूंना संपर्क करणे’, या सेवा करत होते. माझ्या मनातही ‘शेवटच्या श्वासापर्यंत गुरुसेवा घडायला हवी’, असा विचार असतो; पण गुरुमाऊलीने  पू. साठेकाकांच्या माध्यमातून ‘शेवटच्या श्वासापर्यंत सेवा कशी करायची ?’, हे प्रत्यक्ष उदाहरणातून मला दाखवून दिले.

१ ऊ २. अतिशय स्थिर आणि देहबुद्धीपलीकडे गेलेले पू. साठेकाका ! : पू. साठेकाका आणि त्यांच्या पत्नीला एकाच वेळी रुग्णालयात भरती करण्यात आले होते; मात्र साठेकाकूंची प्रकृती आणखीनच बिघडून त्यांचे सकाळीच निधन झाले. काकूंचे निधन झाले, त्या दिवशी उद्योगपती परिसंवाद होता. त्यासाठी पू. साठेकाकांनी ‘दुपारी उद्योगपतींना निमंत्रण देणे आणि सायंकाळी आठवणीसाठी संपर्क करणे’ या दोन्हीही सेवा केल्या. उद्योगपतींना संपर्क करतांना त्यांनी स्वतःच्या पत्नीच्या निधनाची वार्ताही दिली. यावरून ‘ते देहबुद्धीच्या पलीकडे गेले होते. ते केवळ आणि केवळ समष्टी गुरुरूपाची सेवा करत होते आणि त्यात कुठेही न्यूनता राहू नये, असे त्यांना वाटत होते’, असे मला वाटले.

१ ऊ ३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर असलेल्या अपार श्रद्धेमुळे पत्नीच्या निधनाची वार्ता ऐकल्यावर ‘तिला चांगली गती मिळावी’, यासाठी अधिकाधिक सेवारत रहाणारे पू. साठेकाका ! : पू. साठेकाकांची मुलगी साधिका सौ. प्राची मराठे या आई-वडिलांची सेवा करण्यासाठी त्यांच्या समवेतच होत्या. प्राचीताईंनी मला त्यांच्या आईच्या निधनाची वार्ता दिली. त्या म्हणाल्या, ‘‘याही स्थितीत बाबा सेवा करत आहेत. ‘सेवा केल्यानेच आईच्या गतीतील अडथळे दूर होतील आणि तिला अधिक लाभ होईल. त्यामुळे आपण अधिकाधिक सेवाच केली पाहिजे’, असे ते म्हणत आहेत.’’ ते ऐकून माझी पुष्कळ भावजागृती झाली. मी गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. धन्य ती गुरुमाऊली ! जिचे असे शिष्य या कलियुगात आहेत आणि त्यांचा सत्संग मला मिळाला आहे.

१ ऊ ४. ‘पत्नीचे निधन झाल्यावरही स्थिर राहून सर्व उपाय पूर्ण करून गुरुसेवा परिपूर्ण करणारे पू. साठेकाका संतपदी विराजमान झाले आहेत’, असे जाणवणे : पू. साठेकाकांना कृत्रिम प्राणवायू देण्यात येत होता. अशा स्थितीत सामान्य व्यक्ती केवळ देहाला होणार्‍या त्रासाचाच विचार करू शकते; मात्र पू. साठेकाकांनी तो त्रास स्वीकारून त्या त्रासाशी लढत त्यांना सांगितलेला उपायांचा नामजप स्वतःच पूर्ण केला. त्यांना यातून बरे होऊन त्यांचे गुरुपौर्णिमेचे ध्येय पूर्ण करायचे होते. त्यासाठी ते शुद्धीत असेपर्यंत तळमळीने त्यांचे सगळे उपाय पूर्ण करून समष्टी सेवाही करत होते. हे सर्व अनुभवतांना ‘पू. साठेकाका संतपदी विराजमान झाले आहेत’, असे मला जाणवले.

१ ऊ ५. पुढील परिस्थितीची कल्पना येऊन सेवेच्या सर्व नोंदी संबंधित साधकांकडे देण्याचे नियोजन करणे : आरंभी पू. साठेकाका आणि काकू कल्याणमध्ये एका साधकाच्या घरात रहात होते; मात्र दळणवळण बंदीच्या कालावधीत त्यांच्या मुलींनी त्यांना स्वतःकडे घेऊन जायचे ठरवले. तेव्हा पू. साठेकाकांनी त्यांच्या सेवांच्या नोंदीची एक पिशवी भरून ठेवली आणि मुलीला सांगितले, ‘‘दळणवळण बंदी संपल्यावर कल्याण येथील सर्व साधकांची तुझ्या घरी बैठक घेऊन संबंधित साधकांना मी हे सर्व साहित्य देणार आहे.’’ यावरून त्यांना पुढील स्थितीची कल्पना आली होती. त्याप्रमाणे त्यांनी त्याची पूर्वसिद्धताही केली होती’, हे लक्षात आले.

१ ए. अन्य वैशिष्ट्ये

१ ए १. समाजातील जिज्ञासूंना आधार वाटणे : पू. साठेकाका सर्व जिज्ञासूंना नियमित वैयक्तिक संपर्क करायचे. त्यामुळे जिज्ञासूंना त्यांचा मोठा आधार वाटायला लागला होता. त्यांच्या निधनाची वार्ता त्यांच्या संपर्कातील वाचक श्री. आणि सौ. भारंबे यांना दिली. तेव्हा भ्रमणभाषवर सौ. भारंबे कृतज्ञतापूर्वक म्हणाल्या, ‘‘पू. साठेकाकांमुळे आम्हाला सेवा आणि साधना समजली. त्यांनीच आमच्याकडून सेवा करवून घेतली. माझ्या यजमानांना कोरोना होऊन गेल्यावर पू. साठेकाका आवर्जून त्यांना भेटायला आले आणि त्यांनी आम्हाला सेवेसाठी पुन्हा उद्युक्त केले.’’

१ ऐ. कृतज्ञता : पू. साठेकाकांना समष्टी सेवेची प्रचंड तळमळ होती. जणूकाही त्यांच्या माध्यमातून ‘समष्टी सेवा कशी करायची ?’, हेच गुरुमाऊली आम्हाला शिकवून गेली; मात्र आम्हाला याची जाणीव पू. काकांचे निधन झाल्यानंतर झाली. तेव्हा त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.’

(क्रमशः)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक