कठीण प्रसंगातही कृतज्ञताभावात रहाणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे कल्याण (ठाणे) येथील कै. माधव साठे (वय ७५ वर्षे) यांनी गाठले संतपद !

साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था

पू. (कै.) माधव साठे यांचा निधनानंतरचा आज १२ वा (४ मे २०२१) दिवस आहे. त्यानिमित्ताने…

पू. (कै.) माधव साठे
सौ. मानसी जोशी

कल्याण (जि. ठाणे) येथील सनातनचे साधक कै. माधव साठे (वय ७५ वर्षे) यांचे २३.४.२०२१ या दिवशी हृदयक्रिया बंद पडून निधन झाले. त्यांना उपचारांसाठी अतीदक्षता विभागात ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. या कठीण परिस्थितीतही ते सतत सेवारत आणि शेवटच्या क्षणापर्यंत भगवंताच्या अनुसंधानात होते. त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव होता. यामुळेच त्यांनी संतपद गाठले. ‘पुढील आपत्काळात कुणाला अशा प्रसंगांना सामोरे जावे लागेल ?’, हे सांगता येत नाही. पू. (कै.) माधव साठे यांचा निधनानंतरचा आज १२ वा (४ मे २०२१) दिवस आहे. त्यानिमित्ताने ‘आजारपणातही पू. (कै.) माधव साठे कसे अनुसंधानात राहिले ?’, हे त्यांची मुलगी सौ. मानसी जोशी यांनी केलेले लिखाण निश्‍चित मार्गदर्शक ठरेल.

(भाग १)

परात्पर गुरु डॉक्टरांवर अपार श्रद्धा असलेले आणि ‘समाजातील जिज्ञासू साधनेकडे वळावेत’, यासाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत प्रयत्न करणारे सनातनचे १०६ वे समष्टी संत कल्याण, जिल्हा ठाणे येथील पूज्य माधव साठे (वय ७५ वर्षे) !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

कल्याण, जिल्हा ठाणे येथील माधव साठे वर्ष १९९८ पासून सनातनच्या माध्यमातून साधना करत होते. परात्पर गुरु डॉक्टरांवर त्यांची अपार श्रद्धा होती. साधनेची तीव्र तळमळ असल्याने त्यांनी मनापासून व्यष्टी अन् समष्टी साधना केली. वर्ष २०१२ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ६० टक्के घोषित करण्यात आली.

साठेकाकांचे संपूर्ण जीवन आदर्श होते. त्यांनी समाजातील जिज्ञासू, वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी अशा अनेकांना साधनेकडे वळवले. त्यामुळे या सर्वांसाठी ते मोठा आधारस्तंभ बनले होते. भारतात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आणि साठेकाकांनाही कोरोनाची लागण झाली; पण त्यांना गुरुसेवेची एवढी तळमळ होती की, रुग्णाईत स्थितीतही ते भ्रमणभाषवरून सेवा करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्या स्थितीतही त्यांच्या मनात केवळ गुरुसेवेचा ध्यास होता. ‘समाजातील जिज्ञासूंनी साधना करावी’, या तळमळीपोटी ते पत्नीच्या मृत्यूनंतरही सेवारत होते. २३.४.२०२१ या दिवशी हृदयक्रिया बंद पडून साठेकाकांचे निधन झाले.

शांत आणि स्थिर स्वभाव अन् गुरुदेवांवरील अपार श्रद्धा यांमुळे अत्यवस्थ स्थितीतही ते सतत देवाच्या अनुसंधानात होते. ‘आपले संपूर्ण आयुष्य गुरुचरणी समर्पित व्हावे’, ही त्यांची तळमळ अगदी शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहिली. त्यांच्या याच गुणामुळे साठेकाका यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातनचे १०६ वे समष्टी संतपद प्राप्त केले आहे. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सर्वांच्याच डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार असतांना ‘साधनेमुळे मृत्यू आणि प्रतिकूल परिस्थिती यांना गुरुनिष्ठेच्या बळावर कसे तोंड द्यायला हवे ?’, हे पू. साठेकाकांच्या उदाहरणातून सर्वांना शिकण्यासारखे आहे.

‘पू. माधव साठे यांची मृत्यूनंतरही आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत राहो’, अशी परात्पर गुरु डॉक्टर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी विनम्र प्रार्थना !

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (३.५.२०२१)

१. कोरोनाच्या कठीण प्रसंगातही सतत कृतज्ञताभावात रहाणे

१ अ. ‘गुरुदेवांच्या कृपेने रुग्णालयातील सुविधाही मिळाल्या’, असा भाव ठेवून सतत कृतज्ञ रहाणे : ‘कोणतीही गोष्ट मिळाली की, बाबा गुरुदेवांविषयी कृतज्ञता व्यक्त करायचे. त्यांचा भाव दाटून यायचा. ‘गुरुदेवांच्या कृपेने मला हे चांगले रुग्णालय मिळाले. इथे सर्व कर्मचारीवर्ग प्रेमाने उपचार करतो. इथे काळजीवाहू (केअर टेकर) म्हणून रहाण्याचीही अनुमती आहे, घरून अन्न आणण्याचीही अनुमती आहे’, आदी गोष्टींविषयी ते त्वरित कृतज्ञता व्यक्त करायचे.

१ आ. गुरुदेवांप्रती कृतज्ञ राहून उपायांचा नामजप नियमित आणि चिकाटीने पूर्ण करणे : उपायांचा नामजप बाबा नेहमी नियोजन करून पूर्ण करायचे. त्यांना नियमित ७ ते ८ घंटे नामजप करायचा होता. काही वेळा २ ते ३ घंटे नामजप केल्यानंतर त्यांच्या शारीरिक स्थितीनुसार जप पालटायचा. हा पालट त्वरित स्वीकारून ते त्या दिवशी सांगितलेला नामजप पूर्ण करायचे. त्या वेळी त्यांचा १० घंटे नामजप होत होता. ‘‘मला केवळ गुरुदेवांच्या कृपेने ही नामजपरूपी संजीवनी मिळाली. जपच मला तारून नेणार आहे. नामजप मला बळ देत आहे. जप नसता, तर माझे काय झाले असते ? अन्य रुग्णांप्रमाणे मी काळजी, भीती आणि अनावश्यक विचार यांत अडकलो असतो. केवढी ही गुरुकृपा ?’’, असे सांगून त्यांचा भाव दाटून यायचा. ‘माझ्या शेवटच्या श्‍वासापर्यंत नामजप होऊ दे आणि सतत गुरुदेवांशी अनुसंधान राहू दे’, अशी ते तळमळीने प्रार्थना करायचे.

१ इ. ‘जे मिळाले त्या सर्व सुविधा गुरुदेवांनी दिल्या’, असा भाव ठेवून कृतज्ञ रहाणे आणि मुलीला धीर देणे : कोविड सेंटरमध्ये १ सहस्र २०० कोरोनाबाधित रुग्ण होते. बाबा उपचार घेत असलेल्या कक्षात २०० रुग्ण होते. रुग्णालय आणि एकंदर स्थिती पाहून माझ्या बहिणीला अतिशय भीती वाटली. तिचा पुष्कळ संघर्ष होत होता. ‘या रुग्णालयात येऊन आपण चूक केली’, असे तिला वाटत होते. त्या वेळी जे मिळाले आहे, त्याकडे बाबांनी तिचे लक्ष वेधले. ‘आईची स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे आम्हा दोघांना वेगवेगळे ठेवले असते, तर किती अवघड गेले असते. आमच्या समवेत तुला काळजी घेण्यासाठी रहाता येत आहे. इकडे २४ घंटे प्राणवायूची सुविधा आहे. आपली कोणतीही पात्रता नसतांना गुरुदेवांनी किती दिले’, असे सांगून त्यांनी बहिणीला धीर देऊन तिची सिद्धता करून घेतली.

२. ‘गुरुसेवा’ हेच प्राधान्य असलेले कै. माधव साठे !

२ अ. पत्नीचे निधन होऊनही केवळ सेवेचाच विचार करणे

२ अ १. पत्नीचे निधन झाले असतांना स्थिर राहून परिसंवादाच्या संपर्काची सेवा पूर्ण करणे : आई अतिदक्षता विभागात असतांना सकाळी तिचे निधन झाले. निधन झाले, तेव्हा तिला काहीच शुद्ध नव्हती. काही त्रास न होता ती गेली, याविषयी त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. बाबा पुष्कळ स्थिर होते. मोठी बहीण आणि बाबा आईला भेटायला जाऊ शकत नव्हते. ते स्वतः आजारी असल्यामुळे ‘तिच्या कार्यालाही ते जाऊ शकणार नाहीत’, हे त्यांनी स्वीकारले होते. त्या दिवशी त्यांनी त्यांच्या संपर्कातील सर्वांना नियोजित ‘उद्योजक परिसंवादा’ला संपर्क करण्याची सेवा पूर्ण केली. ‘त्या सर्वांनी परिसंवादाला जोडले जाणे, हे माझे दायित्व आहे. त्यामुळे मी ते करायलाच पाहिजे’, असा त्यांचा दृष्टीकोन होता.

२ अ २. ‘सेवा केल्याने पत्नीला आध्यात्मिक लाभ होईल’, असा भाव ठेवून पत्नीच्या निधनाच्या वेळी सेवेला प्राधान्य देणे : संपर्क करतांना ते पुष्कळ स्थिर राहून बोलत होते. दूरभाषवरील व्यक्तीची ते आस्थेने चौकशीही करत होते. त्यांचे बोलणे ऐकून ‘ते रुग्णालयात आहेत आणि आताच त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे’, असे वाटत नव्हते. हे बघून बहीण त्यांना म्हणाली, ‘‘तुम्ही हे कसे करू शकता ?’’ त्यावर बाबा म्हणाले, ‘‘मी आईच्या कोणत्याच विधीला जाऊ शकत नाही. आपण वर्तमानात राहून जे क्रियमाण वापरू शकतो, ते करूया. आई अजून १० दिवस आपल्या समवेत आहे. मी जेवढी सेवा करीन, तेवढाच तिलाही लाभ होणार आहे.’’

२ आ. संपर्कात येणार्‍या व्यक्तींना साधना सांगून आध्यात्मिक साहाय्य करणे : स्वतः रुग्णाईत असूनही बाबांनी दूरभाषवरून संपर्काची सेवा केली. देवाला विचारून कुणाला संपर्क करायचा, हे ते काढून ठेवायचे. कुणी चांगली व्यक्ती भेटली की, ‘तिला गुरुकार्याशी कसे जोडू शकतो ?’, असा त्यांचा ध्यास असायचा. मी गोवा येथे घर घेतले आहे. ते बघायला ते माझ्या समवेत येणार होते. त्या वेळी घरमालक, घराचे नूतनीकरण करणारे ठेकेदार, घराची नोंदणी करणारे अधिवक्ता यांना साधना सांगणे, कुंभमेळ्याच्या विशेषांकासाठी ते संपर्क करणार होते; पण त्यांना तिकडे जाता आले नाही. ऑक्सिजनचा मास्क लावलेला असूनही आणि बोलायला त्रास होत असतांनाही घरमालकांशी बोलले. अधिवक्त्यांशी बोलून त्यांनी मला वेळ घ्यायला सांगितली. त्या वेळी मी अधिवक्त्यांविषयी थोडे नकारात्मक बोलल्यावर त्यांनी मला ‘तुझा अपेक्षांचा भाग पुष्कळ आहे. असे नाही करायचे. आपण निरपेक्षपणे संपर्क सेवा करायची. गुरुदेवांना अपेक्षित आहे, ते होईल’, असा दृष्टीकोन ठेवायला सांगितला.

३. परात्पर गुरुदेवांनी सांगितलेली साधना नियमितपणे करणे

३ अ. ऑक्सिजनवर असूनही चिकाटीने साधना करणे : बाबांना खाण्यासाठी उठून बसायला लागत होते. त्या वेळी त्यांना दमही लागत असे. खाणे झाल्यावर ‘कधी एकदा विश्रांती घेऊ’, अशी त्यांची स्थिती असायची. त्या स्थितीतही ते सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करत होते. ‘अन्नातून शक्ती आणि चैतन्य मिळू दे’, अशी भावपूर्ण प्रार्थना करत होते. त्यांची ती तगमग बघून मी त्यांना म्हणाले, ‘‘झोपूनच प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करा. खाऊन लगेच झोपा.’’ त्यावर त्यांनी सांगितले, ‘‘मला माझ्या पद्धतीने सर्व करू दे.’’

३ आ. अतिदक्षता विभागातूनही पहाटेच्या सामूहिक नामजपासाठी उठणे : केवळ गुरुदेवांच्या कृपेने एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून अतिदक्षता विभागात खाट मिळाली, याविषयी त्यांच्या मनात कृतज्ञता भाव होता. अतिदक्षता विभागातही ते सतत भगवंताच्या अनुसंधान होते. पहाटेचा सामूहिक नामजप त्यांनी कधीच चुकवला नाही. त्यांना रात्री उशिरा अतिदक्षता विभागात हालवण्यात आले होते, तरीही पहाटे ते सामूहिक नामजपाला जोडलेले होते.

४. कुटुंबियांना आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणे

माझी मोठी बहीण बाबांना तिच्या अडचणींविषयी प्रश्‍न विचारायची. मला काही विकल्प आले किंवा साधक चुकीचे वागले, असे वाटले की, मीही त्याविषयी बाबांना बोलायचे. त्यांच्यावर सर्वांचा राग काढायचे; पण बाबा अतिशय शांत असायचे. त्यांनी कधीच आम्हाला भावनेच्या स्तरावर हाताळले नाही. आमच्यावर नेहमी निरपेक्षपणे प्रेम केले. बाबा सर्व सेवा परिपूर्ण आणि कार्यपद्धतीनुसार करायचे. त्यांनी स्वतःकडील पंचांगांचे आणि अन्य संपर्क यांच्या नोंदी पुष्कळ योग्य पद्धतीने करून ठेवल्या होत्या. त्यांचे वागणे नेहमी आदर्श असायचे.

५. रुग्णालयातही परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवणे आणि स्थिर रहाणे

५ अ. सतत परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवणे : बाबांना परात्पर गुरुदेव डॉ. आठवले दिसत होते. ‘गुरुदेवांच्या सभोवताली सर्व रुग्णाईत साधक होते. गुरुदेवांनी शेला अंथरला आहे आणि सर्व रुग्णाईत साधकांना त्यावर बसवले आहे. त्या सर्वांना गुरुदेव काहीतरी सांगत आहेत’, अशी अनुभूती बाबांना आली. सामान्य कक्षातही बाबांना २४ घंटे १५ लिटर इतका ऑक्सिजन लावावा लागत होता. त्यांची ऑक्सिजनची पातळी ८८ ते ९२ यांमध्ये येत होती. त्या स्थितीतही बाबा स्थिर आणि सकारात्मक होते.

५ आ. आजूबाजूच्या रुग्णांचे नियमित निधन होत असूनही स्थिर रहाणे : अतिदक्षता विभागामध्ये नियमित त्यांच्या आजूबाजूच्या ३ – ४ रुग्णांचे निधन होत होते. त्याचा बाबांच्या मनावर काहीच परिणाम होत नव्हता. त्यांना कोणतीही भीती, चिंता किंवा काळजी राहिलेली नव्हती.

५ इ. रुग्णालयातही गुरुदेवांच्या अस्तित्वाची अनुभूती घेणे : बाबांची प्रकृती अस्वस्थ असूनही अन्य गंभीर रुग्णांना अतिदक्षता विभागात घेण्यासाठी आधुनिक वैद्यांनी ३ वेळा प्रयत्न करूनही त्यांना अतिदक्षता विभागातून बाबांना सर्वसाधारण कक्षात आणता आले नाही. चौथ्या वेळी अतिदक्षता विभागातून बाबांना सर्वसाधारण कक्षात आणले. तेव्हा ‘गुरुदेव येथे प्रत्यक्ष आले आहेत. त्यांनी बाबांना दोन्ही हातात उचलून बाहेर आणले आणि ते गुरुदेवांच्या हातात सुखरूप आहेत’, असे त्यांना दिसत होते. हे सांगत असतांना त्यांचा भाव दाटून येत होता. त्याविषयी त्यांचा कृतज्ञता भाव दाटून आला. त्याही स्थितीत ते गुरुदेवांना अनुभवत होते.

५ ई. प्रत्येक क्षण गुरुदेव घडवत असल्याची दृढ श्रद्धा असणे : बाबांना जवळजवळ १० दिवस झोप नव्हती. त्यांना थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे, असे आम्हाला वाटायचे; परंतु त्यांचा ‘मी सतर्क रहावे, असे गुरुदेवांना अपेक्षित आहे. तेच योग्य वेळी झोप देतील’, असा दृष्टीकोन होता. बाबांनी त्यांच्या जीवनात गुरुदेवांना नेहमीच प्रथमस्थानी ठेवले. कधीही भावनेत अडकून, कितीही कठीण परिस्थिती आली, विरोध झाला, तरी साधनेत खंड पडू दिला नाही. त्यांच्या मनाला कधी कोणताही विकल्प शिवला नाही. ‘माझी कोणतीही पात्रता नसतांना गुरुदेवांनी मला भरभरून दिले आहे’, अशी त्यांची नेहमी भावस्थिती असायची.

६. ‘सेवेसाठी जिवंत रहावे’, या एकाच आशेने शेवटच्या श्‍वासापर्यंत स्वतःचे पूर्ण  क्रियमाण वापरून मृत्यूशी झुंज देणारे योद्धे !

६ अ. कठीण प्रसंगातही सेवेच्या तळमळीने क्रियमाण वापरणे : बाबांचे निधन होण्याच्या आदल्या दिवशी त्यांना पुष्कळ दम लागला. ‘काहीतरी वेगळे आहे’, असे ते सतत सांगत होते. त्यांना स्थिरपणे झोपता येत नव्हते. ‘गुरुदेव, मला तुम्हीच उचलून घ्या. मला खाली ठेवू नका. मला शेवटच्या श्‍वासापर्यंत तुमची चरणसेवा करायची आहे. गुरुपौर्णिमेचे घेतलेले ध्येय पूर्ण करायचे आहे’, अशी तळमळीने आणि आर्ततेने त्यांची प्रार्थना होत होती. दुसरीकडे ते मला सतत कुणाला तरी संपर्क करून साहाय्य घेण्यास आणि उपाय मिळण्याविषयी सांगत होते. बरे होण्यासाठी ते स्वतःचे पूर्ण क्रियमाण वापरत होते. ते न खचता शेवटच्या श्‍वासापर्यंत लढले. सतत गुरुदेव आणि भगवंत यांच्या अनुसंधानात राहून कठीण प्रसंगाला सामोरे गेले.

६ आ. शेवटच्या श्‍वासापर्यंत गुरुदेवांची सेवा करण्याची मनीषा बाळगणे : स्वतःला बरे वाटावे, यासाठी बाबांनी सर्व क्रियमाण वापरले. आधुनिक वैद्य सांगतील, त्याप्रमाणे सर्व केले. यामध्ये कुठे मरणाची भीती किंवा ‘मी जगलो पाहिजे’, अशी तगमग नव्हती. ‘मला शेवटच्या श्‍वासापर्यंत गुरुदेवांची सेवा करायची आहे. त्यासाठी जिवंत रहायचे आहे’, असा त्यांचा भाव होता.

६ इ. उर्वरित आयुष्य गुरुकार्यासाठी समर्पित करण्याचा निश्‍चय करणे : त्यांच्या मनात कुणाविषयीही राग नव्हता. केवळ अंतरी गुरुदेवांप्रती अपार कृतज्ञता होती. आपत्काळाच्या दृष्टीने गुरुदेवांनी जे सांगितले, त्याप्रमाणे करण्याची त्यांची इच्छा होती. आपत्काळाच्या दृष्टीने एका मुलीचे तरी घराच्या स्थलांतराचे काम पूर्ण झाले, याविषयी त्यांना पुष्कळ समाधान वाटत होते. तिकडे औषधी वनस्पती लावू शकतो, चुलीची सोय करू शकतो, यांविषयी ते समाधानी होते. बरे झाल्यावर त्वरित तिकडे जायचे. ‘आईचे निधन झाले असल्यामुळे आता पुढील सर्व आयुष्य गुरुदेवांचे !’, असे त्यांचे नियोजन होते.

७. शेवटच्या क्षणापर्यंत ‘गुरुदेव मला खाली ठेवू नका’, असे सांगणे

बाबांचे निधन होण्यापूर्वी शेवटचे काही घंटे ते पुष्कळ तळमळत होते. त्या वेळी ते हात उंचावून सतत ‘गुरुदेव, मला उचलून धरा. मला खाली ठेवू नका’, असे सांगत होते. गुरुदेव मला दिसत आहेत. ते मला घेऊन जाणार आहेत. ‘गुरुदेवच या सर्व परिस्थितीतून बाहेर काढणार आहेत’, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती.

बाबांनी प्रत्येक सेवा अगदी मनापासून, देवाला विचारून, बुद्धीचा अधिकाधिक योग्य वापर करून आणि निरपेक्ष भावाने केली. बाबा रुग्णाईत असतांना त्यांच्याविषयी जे अनुभवले आणि देवाने सुचवले, ते लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जशी साधना केली, तसे आम्हा सर्वांकडूनही प्रयत्न व्हावेत, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना !’

(क्रमशः)

– सौ. मानसी जोशी, मुलुंड, मुंबई (कै. साठेकाका यांची मधली मुलगी) (१.५.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक