गॅस सिलिंडर घरपोच देणार्‍या कर्मचार्‍याने अतिरिक्त शुल्क मागितल्यास काय करावे ?

अनेकदा गॅस सिलिंडर घरी पोचवणारी व्यक्ती देय रकमेहून अधिक रक्कम मागते. सिलिंडर घरी पोचवण्यासाठीचे अतिरिक्त शुल्क म्हणून अशी मागणी केली जाते. आपणही आपला जाण्या-येण्याचा, रिक्शाचा किंवा वाहनाचा व्यय (खर्च) वाचला, असा भावनिक विचार करून ते अतिरिक्त शुल्क देतो. प्रत्यक्षात एक जागरूक नागरिक म्हणून याविषयी माहिती घेणे स्वतःचे दायित्व आहे. गॅस सिलिंडर घरपोच करणार्‍या व्यक्तीस अतिरिक्त शुल्क देण्याविषयी काही नियम आहेत का ? ग्राहकाने ते शुल्क देणे बंधनकारक आहे का ? याची माहिती येथे पाहूया.

ग्राहकाला गॅस सिलिंडर घरपोच देणे, हे स्थानिक गॅस वितरकाचे दायित्व असणे

भाग्यनगर (हैद्राबाद) येथील एका ग्राहकाने माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत अर्ज करून ‘हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एच्.पी.सी.एल्.) या आस्थापनाकडे गॅस सिलिंडर पोच करणार्‍या व्यक्तीला अतिरिक्त शुल्क देण्याविषयी काही नियम किंवा सूचना असल्यास त्याची माहिती मागवली होती. त्या अर्जाचे उत्तर देतांना या आस्थापनाच्या उप-महाप्रबंधकांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे आहे –

१. गॅस वितरकांना रोख पावतीवर नमूद केलेल्या किरकोळ विक्री मूल्यापेक्षा कोणतीही अतिरिक्त रक्कम आकारण्याविषयी नियम अथवा सूचना दिलेल्या नाहीत.

२. ग्राहक कोणत्याही माळ्यावर (मजल्यावर), कोणत्याही इमारतीत रहात असेल, तरीही त्या ग्राहकाला गॅस सिलिंडर घरपोच देणे, हे त्या स्थानिक गॅस वितरकाचे दायित्व आहे.

३. गॅस सिलिंडर पोच करणार्‍या कोणत्याही कर्मचार्‍याने अतिरिक्त शुल्क मागितल्यास ग्राहक त्यास नकार देऊ शकतात.

याखेरीज गॅस सिलिंडर पोच करणार्‍या कर्मचार्‍याविरुद्ध एच्.पी.सी.एल्. आस्थापनाकडे तक्रारही करता येऊ शकते. ही तक्रार करतांना अतिरिक्त शुल्क मागणार्‍या कर्मचार्‍याचे नाव, गॅस वितरकाचे नाव, शहराचे नाव, जिल्हा आदी नमूद करावे.

– अश्‍विनी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१.२०२१)

आपणांसही गॅस वितरकांच्या संदर्भात काही कटू अनुभव आले असतील अथवा त्याविषयी आपण कोणती तक्रार केली असेल तर कृपया आम्हाला पुढील पत्त्यावर कळवा.

पत्ता : अधिवक्ता नीलेश सांगोलकर, द्वारा सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा.

संपर्क क्रमांक : ९५९५९८४८४४

ई-मेल : [email protected]