पुणे – पुणे महापालिकेने अधिकाधिक लाभार्थी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण चालू केले असले, तरी सध्या केवळ २ दिवस पुरेल इतकीच लस महापालिकेकडे आहे. २६ मार्चपर्यंत पुणे महापालिकेकडून ३ लाख नागरिकांचे लसीकरण केले गेले, त्यात ३३ सहस्र नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १९ आणि २० मार्च या दिवशी १८ सहस्रांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले; म्हणून तातडीने लस उपलब्ध न झाल्यास त्याचा थेट फटका पुण्यातील लसीकरणास बसण्याची शक्यता आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, पुणे शहरासाठी अधिकाधिक लस उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार दोघांकडेही पाठपुरावा करणार आहे. शहरातील संसर्ग पहाता लसीकरण अधिक वेगाने होण्याची आवश्यकता आहे.