चुलीमधील राखेची ऑनलाईन बाजारामध्ये चढ्या दराने विक्री !

खतांसाठी आणि भांडी घासण्यासाठी होत आहे वापर !

पूर्वीच्या काळात, तसेच अनेक गावात आजही खतांसाठी आणि भांडी घासण्यासाठी याचा वापर केला जात आहे. आता भांड्यांसाठी शहरामध्येही याचा होऊ लागलेला वापर पहाता, लोकांना भारतीय संस्कृतीचे महत्त्व लक्षात येत आहे, असे म्हणावे लागेल ! असे असले, तरी ती चढ्या भावाने विकून लोकांना विकणे चुकीचे असून यात प्रशासनाने लक्ष घालणे अपेक्षित आहे !

कपूरथला (पंजाब) – भारतातील अनेक गावांमध्ये अजूनही चुलीवर जेवण बनवले जाते. यासाठी लाकडे आणि शेणाच्या गोवर्‍या यांचा वापर केला जातो. हे चुलीमध्ये जाळल्यावर जी राख निर्माण होते, ती ऑनलाईन बाजारामध्ये सध्या चढ्या दराने विकली जात आहे. मोठ मोठी आस्थापने ही राख खतांसाठी आणि भांडी घासण्यासाठी विकत घेत आहेत. या राखेमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फोरस, अ‍ॅल्युमीनियम, मॅग्नेशियम, सोडियम, मायक्रो न्यूट्रेंट, कॉपर, सल्फर आणि झिंक मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले जात आहे.

१. तमिळनाडूतील ‘केआरवी नेचुलर अँड ऑर्गेनिक’, कर्णावती येथील ‘ओसकास ग्रुप’ आणि जोधपूर येथील ‘ग्रीनफील्ड ईको सॉल्युशन प्रायव्हेट लिमिटेड’ यांसारखी आस्थापने २५० ग्रॅम ते ९ किलो अशा पाकिटांमध्ये ही राख विकत आहेत. तसेच यावर सूटही देत आहेत.

२. २५० ग्रॅमसाठी १६० रुपयांना ही राख एका आस्थापनाकडून विकली जात आहे, तर अन्य एक आस्थापन ३९९ रुपयांना ती विकत आहे. अन्य एक आस्थापन ९ किलो राख ८५० रुपयांना विकत आहे.