सरकारी पक्षाच्या नेत्यांना लैंगिक अत्याचाराची मोकळीक दिली आहे का ?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी फडणवीस यांचा घणाघात

 

डावीकडून देवेंद्र फडणवीस, पूजा चव्हाण, उद्धव ठाकरे

मुंबई, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – पूजा आत्महत्या प्रकरणात १८ दिवसांनंतरही संजय राठोड यांच्यावर गुन्हा नोंदवला जात नाही, याचा अर्थ त्यांना राजकीय पाठिंबा असल्याचे द्योतक आहे. संभाजीनगर येथील युवक काँग्रेसचे नेते शेख, धनंजय मुंडे आणि आता वनमंत्री संजय राठोड यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या विरोधातील ‘शक्ती’ हा कायदा हा केवळ फार्स आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना या कायद्यातील तरतुदी लागू होत नाहीत. सरकारी पक्षाच्या नेत्यांना लैंगिक अत्याचाराची मोकळीक दिली आहे का ? असा प्रश्‍न विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

राजीनामा घेतल्यास शिवसेनेचा आमदारकीचाही राजीनामा द्यायला सांगू ! – महंत जितेंद्र महाराज

पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितले की, संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्यास त्यांना पोहरादेवीवरून शिवसेनेच्या आमदारकीचाही राजीनामा देण्याची विनंती करू. संजय राठोड यांचा तडकाफडकी राजीनामा घेऊ नये, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने पोहरादेवी येथे ३ महंतांची बैठक झाली होती.