वीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी पुणे ब्राह्मण महासंघाच्या वतीने स्वाक्षरी मोहीम

स्वाक्षरी मोहीम

पुणे – क्रांतिकारकांचे कुलपुरुष स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा २६ फेब्रुवारी या दिवशी दिनांकानुसार स्मृतीदिन झाला. याचे औचित्य साधून ब्राह्मण महासंघ पुणे जिल्ह्याच्या वतीने वीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी ५५ सहस्र स्वाक्षर्‍या घेऊन त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभ २६ फेब्रुवारी या दिवशी रमणबाग चौकातून झाला. या प्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, अ‍ॅडमिरल भूषण गोखले, संजयजी मोरे, संस्थापक आनंद दवे, अधिवक्ता विश्‍वास देशपांडे, मधुरा बर्वे, नीता जोशी आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

शिवजयंती आणि पुण्यतिथी यांप्रमाणेच वीर सावरकर यांचा स्मृतीदिन हा महत्त्वाचा दिवस प्रत्येक चौकात साजरा व्हावा, यासाठी नागरिकांना वीर सावरकरांच्या ५५ प्रतिमा  भेट देण्यात आल्या. स्वाक्षरी केलेला पहिला ‘बॅनर’ देहलीला पाठवण्यात येणार असल्याचे समजते. (तारुण्य, संसार, घरदार, आयुष्य यांची देशासाठी राखरांगोळी करणारे द्रष्टे युगपुरुष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर ! त्यांना खरे तर शासनाने स्वतः हून भारतरत्न देणे अपेक्षित आहे. – संपादक)