शहरी नक्षलवादी वरवरा राव यांना ६ मासांचा अंतरिम जामीन

वरवरा राव

मुंबई – नक्षलवादी चळवळीला प्रोत्साहन देणे, हिंसक कारवायांनी सध्याचे शासन उलथवून लावण्याचा कट कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करणे आदी गंभीर आरोप असलेले वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने ६ मासांचा सशर्त जामीन संमत केला आहे. त्यांना ५० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. न्यायालयाने वरवरा राव यांचा जामीन संमत केला असला, तरी त्यांच्या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना घरी न जाता विशेष न्यायालयाच्या परिसरात रहाण्याचा आदेश दिला आहे.

‘वैद्यकीय कारणास्तव राव यांची तातडीच्या अंतरिम जामिनावर सुटका करावी’, अशी याचिका त्यांच्या पत्नीने न्यायालयात केली होती. न्यायालयाने याविषयीचा निर्णय राखून ठेवला होता. हा निर्णय होईपर्यंत राव यांना नानावटी रुग्णालयातच ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. ‘राव यांचे वय, आरोग्य आणि बंदीवानांच्या वैद्यकीय सुविधा मिळण्याचा मूलभूत अधिकार लक्षात घेता आम्ही त्यांना वैद्यकीय जामीन संमत करत आहोत’, असे निर्णय देतांना न्यायालयाने नमूद केले. ‘जामिनाचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांनी शरणागती पत्करावी किंवा जामिनाची मुदत वाढवण्यासाठी अर्ज करावा’, असेही न्यायालयाने निर्णय देतांना नमूद केले. ‘नानावटी रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालानुसार राव यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता नाही’, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या न्यायालयात म्हटले होते.