पुणे – अभय योजनेद्वारे महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला आहे. ही योजना इतर महापालिकांनी राबवावी. तसेच पुण्यात डिसेंबरपर्यंत आणखी ५०० बसगाड्या धावतील, अशी माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शहराच्या विकासासाठीच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मला महापौर मोहोळ यांनी आमंत्रित केले होते, असे सांगून विकासकामांना गती देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले. गेल्या ४ वर्षांत शहराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्तांसमवेत नुकतीच बैठक घेतली त्या वेळी ते बोलत होते.
फडणवीस यांनी सांगितले की, नदीपात्रातील सुशोभीकरणाचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. मुळा-मुठाच्या जायका प्रकल्पाचे काम जूनमध्ये चालू होईल. मेट्रोचा २१ कि.मी. टप्पा यावर्षी पूर्ण केला जाईल आणि दुसर्या टप्प्याला पुढील वर्षी निधी मिळेल.