मुंबई – उद्योजक अदानी यांच्या ‘अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड’ या आस्थापनाने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचा २३.५ टक्के भाग खरेदी केला आहे. परदेशातील आस्थापन ‘एसीएस्ए ग्लोबल लिमिटेड’ आणि ‘बिड सर्व्हिसेस डिव्हिजन (मॉरिशस) लिमिटेड’ यांच्याकडून हे भाग १ सहस्र ६८५ कोटी २५ लाख रुपये इतके मूल्य देऊन खरेदी केले आहेत.
अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडने ‘एम.आय्.ए.एल्’चे १० रुपयांप्रमाणे २८ कोटी २० लाख रुपयांचे भाग खरेदी केले आहेत. अदानी यांनी यापूर्वी मंगळुरू, लखनौ आणि कर्णावती येथील विमानांचे अधिग्रहण केले आहे, तसेच येत्या जुलै मासापर्यंत जयपूर, गौहत्ती आणि थिरूवनंतरपूरम् येथील विमानतळांचे अधिग्रहणही अदानी करणार आहेत. या ६ विमानतळांचा विकास, व्यवस्थापन आणि परिचलन यांचे पुढील ५० वर्षांसाठीचे दायित्व अदानी यांच्याकडे असणार आहे.