बाह्यशक्तींच्या साहाय्याने गोव्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्यात ३ विकास प्रकल्पांना विरोध केला जात असल्याचे प्रकरण

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पणजी, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – बाह्यशक्तींच्या साहाय्याने गोव्यात अस्थिरता निर्माण करण्याचा विरोधक प्रयत्न करत आहेत. गोवा राज्य गेली अनेक मास हे भोगत आहे, असा आरोप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.

मोले ते वास्को राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, कुळे ते वास्को रेल्वेच्या लोहमार्गाचे दुपदरीकरण आणि तम्नार ते गोवा उच्चदाबाची वीजवाहिनी या तिन्ही प्रकल्पांना गोव्यातील काही अशासकीय संस्था अन् विरोधी पक्ष गेल्या अनेक मासांपासून तीव्र विरोध करत आहेत. या प्रकल्पांमुळे भगवान महावीर अभयारण्य आणि मोले राष्ट्रीय उद्यान यांमधील वन्यजिवांच्या जाती अन् प्रजाती नष्ट होणार असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. कृषी कायद्यावरून आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पॉप गायिकेने केलेल्या विधानावरून ‘इंडिया अगेन्स्ट प्रोपागंडा’ ही ‘हॅशटॅग’ मोहीम राबवली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘इंडिया अगेन्स्ट प्रोपागंडा’ या ‘हॅशटॅग’वर ट्वीट करून हा आरोप केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ट्वीटमध्ये पुढे म्हणतात, ‘‘प्रगतशील राज्य बनवण्यापासून कोणतीही मोहीम (प्रोपागंडा) आम्हाला अडवू शकत नाही.’’

विकास प्रकल्पांना विरोध करणार्‍यांना लवकरच प्रकल्पांचे महत्त्व लक्षात येईल ! – नीलेश काब्राल, वीजमंत्री

मडगाव – गोवा राज्य वीजनिर्मिती करत नाही. यासाठी गोव्यात वीजपुरवठ्यासंबंधी विकास प्रकल्प उभारणे काळाची आवश्यकता ठरत आहे. गोव्यातील भावी पिढीसाठी हे प्रकल्प महत्त्वाचे आहेत. विकास प्रकल्पांना विरोध करणार्‍यांना लवकरच प्रकल्पांचे महत्त्व लक्षात येईल, असे मत वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी व्यक्त केले. मोले येथील तम्नार ते गोवा उच्चदाबाच्या वीजवाहिनी प्रकल्पाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी हे मत व्यक्त केले. केळशी येथे भूमीगत वीजवाहिनी कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

वीजमंत्री नीलेश काब्राल पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात येणार्‍या ११० के.व्ही. क्षमतेच्या वीजवाहिनीचे रूपांतर ४४० के.व्ही. क्षमतेमध्ये करता येईल का ? याविषयी मी केंद्रीय वीज महामंडळाकडे बोललो आहे. यामुळे गोव्याला अखंडित वीजपुरवठा होण्यास साहाय्य होईल.’’

‘१९१२’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांनी ‘१९१२’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यास साहाय्य होईल, असे आवाहन वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी या वेळी केले.