मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर देहली येथे अभिनंदनाचा वर्षाव
पणजी, १९ मार्च (वार्ता.) – गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते ठरले आहेत. मुख्यमंत्रीपदाची सलग ६ वर्षे पूर्ण करणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर देहली येथे अभिनंदनाचा वर्षाव झाला. अनेक मंत्री आणि नेते यांनी त्यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी १९ मार्च या दिवशी देहली येथे सागरमाला योजनेचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या किनारी राज्यांच्या मंत्र्यांच्या परिषदेसाठी आणि केंद्रीयमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मुलाच्या विवाहाच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. सावंत १८ मार्चला देहली दौर्यावर गेले आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी देहलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांच्या भेटी घेतल्या.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मुख्यमंत्रीपदावर डॉ. सावंत यांची १९ मार्च २०१९ या दिवशी नियुक्ती झाली होती. मागील विधानसभेतील उर्वरित ३ वर्षे पूर्ण केल्यानंतर डॉ. सावंत यांची फेब्रुवारी २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. सलग मुख्यमंत्रीपदी रहात डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यासारख्या लहान; पण प्रगत राज्याला विकासाची योग्य दिशा दिली, यासाठी त्यांचे देहली येथे अनेकांनी कौतुक केले.
भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक हेही सध्या देहली येथे आहेत. दामोदर नाईक यांनी १९ मार्च या दिवशी देहली येथे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. केंद्र सरकारच्या योजनांची सर्वाधिक कार्यवाही केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची उघडपणे स्तुती करतात. भाजपमधील राष्ट्रीय पातळीवर स्व. मनोहर पर्रीकर यांच्यानंतर गोव्याचे नेते या नात्याने डॉ. प्रमोद सावंत यांची ओळख निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कारकिर्दीत गोव्याच्या विकासदरात वृद्धी
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत राज्याच्या हितासाठी अनेक ठोस निर्णय घेतले आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे गोवा हे अधिक सक्षम, स्वच्छ आणि प्रगत राज्य बनत आहे. पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि कृषी क्षेत्र यांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे गोव्याचा विकासदर वाढला आहे.
सर्वांच्या पाठबळामुळेच सत्तेची ६ वर्षे पूर्ण ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
गोव्यातील पर्यटनाला अजून मोठी संधी प्राप्त करून देणे आणि गोव्यात अधिकाधिक युवा वर्गाला मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, ही आता माझी २ मुख्य उद्दिष्टे आहेत. आतापर्यंत अनेक मोठे प्रकल्प हाती घेऊन विकासाची गंगा गोव्यात आणणे शक्य झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा आशीर्वाद आणि गोमंतकीय जनतेचे पाठबळ यांमुळेच मी सत्तेची ६ वर्षे पूर्ण करू शकलो, असे प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे.