तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग चालू करावेत ! – पू. भिडेगुरुजी

सांगली, ३१ जानेवारी – जत तालुक्यातील कुंभारी येथील युवकाने सांगलीत येऊन पंचशीलनगर येथे श्री गणेश सुपर बझार नावाने मॉल चालू केला आहे. ही कौतुकास्पद गोष्ट आहे. मराठी तरुणांनी हा आदर्श जोपासत नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग चालू करावा, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते पंचशील नगर येथील मॉलच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

या वेळी भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ, सांगली-मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौर सौ. गीता सुतार, माजी आमदार श्री. नितीन शिंदे, श्री. प्रसाद रिसवडे यांसह अन्य उपस्थित होते. श्री. नितीन शिंदे म्हणाले, ‘‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की, मराठी तरुणांनी उद्योग-व्यवसायात धाडस दाखवायला पाहिजे. मराठी मुलांनी अभ्यास करून व्यवसायात उतरावे. त्यांना निश्‍चितपणे यश येईल.’’