गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला जवेली खुर्द येथे ५७ वर्षानंतर प्रथमच निवडणूक पार पडली !

जवेली गावात पोचण्यासाठी मतदान पथकाला करावा लागला १३ कि.मी. पायी प्रवास !

निवडणूक तर झाली; पण उमेदवार निर्भयपणे तिथे कामे करू शकतील, याची निश्‍चिती आहे का ? नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी सरकार कधी पावले उचलणार ?

गडचिरोली – ‘नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला’ अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील एटापल्ली तालुक्यातील जवेली खुर्द ग्रामपंचायतीत ५७ वर्षानंतर प्रथमच निवडणूक पार पडली. या वेळी कुठलाही हिंसाचार न झाल्याने सर्व जण समाधान व्यक्त करत आहेत. नक्षलवाद्यांच्या प्रभावक्षेत्रात निवडणूक यशस्वीरित्या घेतल्याविषयी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस दल आणि जिल्हा प्रशासन यांचे कौतुक केले आहे.

यापूर्वी सर्व ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नक्षलवाद्यांनी उभे केलेले उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशी नक्षलवादी मतदानकेंद्र असलेल्या गावाच्या सभोवताली होते; मात्र सुरक्षादल असल्यामुळे घातपात झाला नाही.

या वेळी पोलीसदल, सीमा सुरक्षादल यांच्या कडक बंदोबस्तात ९ मतदान पथकांचा चमू कन्हाळगाव बेसकॅम्प येथे हेलिकॉॅप्टरने आला. तेथून राज्य सीमेवरील जंगलातून सुमारे १३ कि.मी. पायी प्रवास करीत जवेली गावात पोचला. येथील तहसीलदार अजय नष्टे म्हणाले की, वर्ष १९६४ पासून या गावात निवडणूक झाली नव्हती. गावातील तरुणांनी निवडणुकीसाठी पुढाकार घेतला.