स्वयंपूर्ण आणि भांगराळे (सोनेरी) गोवा यांसाठी सरकार कटीबद्ध ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मानवंदना स्वीकारतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी – स्वयंपूर्ण गोवा योेजनेच्या अंतर्गत प्रत्येक गोमंतकियाला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. भांगराळे (सोनेरी – कोकणी भाषेत भांगर म्हणजे सोने) गोव्याच्या निर्मितीचा उद्देश समोर ठेवून नागरिकांना उत्तम सुविधा पुरवल्या जाणार आहेत. विकास आणि जागतिकीकरण यांच्या दृष्टीने गोवा संपूर्ण देशासमवेत हातात हात घालून पुढे जात आहे आणि तो आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे काढले.

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने कांपाल परेड मैदानात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते. काही विघातक संस्था देशातील युवक आणि शेतकरी यांची दिशाभूल करून त्यांना चुकीच्या दिशेने नेत आहेत. युवाशक्तीवर विश्‍वास ठेवणार्‍या स्वामी विवेकानंद आणि सुभाषचंद्र बोस यांसारख्या थोर विभूतींची शिकवण आपण विसरता कामा नये. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण मार्गक्रमण केले पाहिजे. त्यांचे राष्ट्रप्रेम आणि जनकल्याणाची भावना भारताला एक प्रगतीशील राष्ट्र बनवण्यासाठी आपल्याला साहाय्यभूत ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक भारत, श्रेष्ठ भारत हे ध्येय (मिशन) पूर्ण करण्यासाठी आपण संघटितपणे कार्यरत झाले पाहिजे, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर त्यांनी नौदल, पायदळ, अग्निशमन दल आदी प्लॅटूनकडून मानवंदना स्वीकारली. या कार्यक्रमाला गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री श्रीमती जेनिफर मोन्सेरात, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मडकईचे मगोचे आमदार श्री. सुदिन ढवळीकर, पणजीचे महापौर श्री. उदय मडकईकर, सरकारच्या विविध खात्यांचे प्रमुख, संरक्षण खात्याचे अधिकारी आदी उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या काळात योगदान दिलेले वैद्यकीय आणि इतर कर्मचारी यांच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी गौरवोद्गार काढले. या वेळी उपविभागीय वन अधिकारी श्री. नीलेश नाईक आणि राज्य पुरस्कार विजेते शिक्षक यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अन्नप्रक्रिया उद्योगासाठी शासनाकडून ५ कोटी रुपये संमत ! – उपमुख्यमंत्री कवळेकर

गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर

मडगाव  अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी शासनाने ५ कोटी रुपये संमत केले आहेत, असे वक्तव्य गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी मडगाव येथे प्रजासत्ताकदिनानिमित्त झालेल्या सोहळ्याच्या वेळी केले. या कार्यक्रमाला राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर आणि बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, गोव्यात अन्नप्रक्रिया उद्योग चालू करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री शासन थेट खरेदी करणार असल्याने शेतकर्‍यांनी अनुदानासाठी वाट पहाण्याची आवश्यकता नाही. शासनाने लागू केलेल्या  योजनांमुळे पडिक भूमी लागवडीखाली आणली गेली आहे. लोकांनी सेंद्रिय शेती उत्पादनावर भर द्यावा.