या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचे असेल, तर शिवसेनाच हवी ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

श्रीफळ वाढवून स्टेशन चौक येथील सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ करतांना पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि अन्य

सांगली, २३ जानेवारी – या देशाला भारत म्हणून नाही, तर ‘हिंदुस्थान’ म्हणून जगायचे असेल, तर शिवसेनाच आवश्यक आहे. स्टेशन चौक येथे होत असलेले हे नामकरण २५ वर्षांपूर्वीच होणे आवश्यक होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आशा आकांक्षा होती की, शिवसेना संपूर्ण देशात गेली पाहिजे. ही आकांक्षा पूर्ण करण्याची धडपड आपण हयात असलेल्या लोकांनी करायला हवी, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.

माजी आमदार नितीन शिंदे आणि भाजपच्या नगरसेविका (सौ.) स्वाती शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे महानगरपालिकेने सांगली येथील स्टेशन चौकाचे ‘बाळासाहेब ठाकरे चौक’ असे नामकरण केले आहे. या चौकाच्या सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ २३ जानेवारी या दिवशी पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि भाजपचे नेते श्री. शेखर इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी स्व. बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून, तसेच पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

स्व. बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करतांना पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि अन्य

पू. भिडेगुरुजी पुढे म्हणाले की,

१. गल्लोगल्ली शिवसेनेच्या शाखा असणे, हे खरे नामकरण आहे. लोकसेवक तत्पर असला पाहिजे. हा प्रवाह पुढे अखंड चालू राहील, यासाठी खटपट केली पाहिजे. पद, पैसा, स्थान आणि मोठेपणा हे क्षुल्लक आहे. आपल्याला संपूर्ण देश हिंदुत्वाच्या धारेखाली आणून या देशाच्या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा छापण्याची ताकद असलेला देश घडवायचा आहे. हे काम शिवसेनेच्या कार्यातूनच होऊ शकते.

२. ‘या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचे असेल, तर शिवसेना आवश्यक आहे’, हे माझे राजकीय नव्हे, तर राष्ट्रीय मत आहे. एका चौकाचेच नाव काय; पण संपूर्ण देशाचे नाव या नावाने ओळखले गेले पाहिजे.

या वेळी भाजपच्या नगरसेविका सौ. स्वाती शिंदे, माजी आमदार श्री. नितीन शिंदे, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. नारायणराव कदम, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह श्री. नितीन चौगुले, सर्वश्री जितेंद्र शहा, अनिल शेटे, विजय कडणे, दत्ता चव्हाण, तानाजी शिंदे, जितेंद्र शहा, गजानन मोरे, प्रियानंद कांबळे, प्रथमेश वैद्य, रामभाऊ सूर्यवंशी, निखिल सावंत यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसचा विरोध मोडून काढत चौकाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले ! – नितीन शिंदे

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत काँग्रेसचा या नामकरणास विरोध असतांना सौ. स्वाती शिंदे आणि मी पुढाकार घेऊन हा विरोध मोडून काढला आणि या चौकाचे ‘बाळासाहेब ठाकरे चौक’, असे नामकरण करण्यास भाग पाडले. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला आणि विचारांना शोभेल, असे या चौकाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे, असे श्री. नितीन शिंदे यांनी सांगितले.