उन्नाव (उत्तरप्रदेश) – शेतकर्यांचा विरोध कृषी कायद्यांना केला जात नसून निशाणा एकीकडे असला, तरी हेतू काही वेगळाच आहे. खरे दु:ख नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एन्.आर्.सी.) यांचे आहे. कलम ३७० हटवल्यामुळे जो त्रास झाला आणि अयोध्येमध्ये प्रभु श्रीरामांचे जे मंदिर बांधले जात आहे, त्याचा खरा त्रास आहे. उगाच आपला राग शांत करण्यासाठी कृषी कायद्यावरून आरडाओरड केला जाते, अशी टीका भाजपचे येथील खासदार साक्षी महाराज यांनी शेतकर्यांच्या आंदोलनावर केली. ‘आंदोलक शेतकर्यांपैकी अनेकजण हे मोठे व्यापारी आहेत’, असा दावाही त्यांनी केला.
काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांतील शेतकर्यांचा विरोध !
साक्षी महाराज पुढे म्हणाले की, खरे सांगायचे, तर खरा शेतकरी हा शेतात राबत आहे. तुम्हाला खरे शेतकरी पहायचे असतील, तर मुराबादमधील शेतकरी संमेलनात चला. मी तुम्हाला खरे शेतकरी दाखवतो. आंदोलनकर्त्यांपैकी काही ५०० बिघा (४ बिघा म्हणजे १ हेक्टर) भूमीचे मालक आहेत, तर काही सहस्र बिघा भूमीचे मालक आहे. अशाच लोकांच्या पोटात नवीन कृषी कायद्यांमुळे पोटशूळ उठला आहे. सर्व देशामध्ये केवळ २ – ३ तीन ठिकाणी आंदोलन चालू आहे. पंजाबमधून लोक सिंघू सीमेवर येत आहेत. हरियाणा आणि राजस्थान येथूनही देहलीच्या सीमेवर शेतकरी येत आहेत; कारण दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे.