औषधी उपयोगासाठी गांजाची झाडे गोव्यात लावण्यासंबंधीच्या विधेयकावर गोवा शासन विचार करणार

पणजी, २९ डिसेंबर (वार्ता.) – गोवा राज्यात औषधी उपयोगासाठी गांजाची झाडे लावण्यासंबंधी विधेयकाला अनुमती देण्यासंबंधी गोवा शासन विचार करत आहे. येथील आरोग्य खात्याकडून आलेल्या या प्रस्तावाचा कायदा खाते अभ्यास करत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘गोव्यात व्यापारी तत्त्वावर हे करण्याचा विचार आहे; परंतु आरोग्य खात्याने दिलेल्या या प्रस्तावावर अजून काहीही निर्णय घेतलेला नाही. भारतातील २-३ राज्यांनी गांजाची झाडे लावण्यास अनुमती दिलेली आहे; परंतु आम्ही अजून काही निर्णय घेतलेला नाही. राज्यात गांजाची झाडे लावण्यास आम्ही अनुमती देऊ, असे मला वाटत नाही.’’

कायदा मंत्री नीलेश काब्राल म्हणाले, ‘‘आम्ही या प्रस्तावावर अभ्यास करून त्याविषयीची धारिका परत पाठवली आहे. या प्रस्तावानुसार राज्यात गांजाच्या झाडांची लागवड करण्यासंबंधी आरोग्य खाते ही मुख्य एजन्सी असेल. ही झाडे औषध आस्थापने थेट खरेदी करू शकतील. विश्‍वजित राणे यांच्या अधिकाराखाली असलेले आरोग्य खाते हा प्रस्ताव मंत्रीमंडळाकडे मांडेल आणि त्यानंतर हा प्रस्ताव विधानसभेत मांडला जाईल.’’

अलीकडेच अमली पदार्थांच्या सूचीतून गांजाची झाडे वगळण्यासंबंधीच्या संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाच्या बाजूने भारताने मतदान केले होते.