काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली पोलिसांना दिसली नाही का ? – रविकिरण इंगवले, शहरप्रमुख, शिवसेना

कोल्हापूर – कोल्हापूर शहरात ५ किलोमीटर लांब भव्य अशी ट्रॅक्टर रॅली निघते. नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीत झालेले मेळावे, तसेच रॅलीमध्ये ट्रॅक्टरवर दिमाखात बसलेली नेतेमंडळी पोलीस प्रशासनाला दिसली नाही. याउलट शिवाजी पेठेत फिरंगाई प्रभागात झालेला मेळावा मात्र पोलिसांना दिसला आणि त्यांनी माझ्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद केला. हा अन्याय असून गुन्हा नोंद करण्यासाठी एका राजकीय नेत्याने पोलिसांवर दबाव टाकला. पोलिसांना काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली आणि त्यात उडालेला सामाजिक अंतराचा फज्जा पोलिसांना दिसला नाही का ? असा प्रश्‍न शिवसेनेचे कोल्हापूर शहरप्रमुख श्री. रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

१. आरक्षण सोडत झाल्यानंतर तात्काळ फिरंगाई प्रभागातून इच्छुक असलेल्या एका उमेदवाराने ५० ते ६० नागरिकांसमवेत फेरी काढली. यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. मी प्रभागात शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यास अनुमती मिळण्यासाठी रितसर पोलीस प्रशासनाकडे अर्ज केला होता; मात्र पोलिसांनी अनुमती नाकारली. शिवसेनेने फेरी काढल्यावर मात्र तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला.

२. काँग्रेस पक्षाने काढलेली भव्य ट्रॅक्टर फेरी, यात सहभागी झालेले वरिष्ठ नेते, पदवीधर निवडणुकीसाठी मेळावे झाले. येथील गर्दी पोलिसांना दिसली नाही, येथे झालेले नियमांचे उल्लंघन पोलिसांना दिसले नाही हे आश्‍चर्यकारक आहे. पोलिसांना केवळ रविकिरण इंगवले आणि त्यांचे कार्यकर्तेचे कसे दिसतात ?

३. माझ्यावर नोंद होत असलेले गुन्हे हे व्यक्तीद्वेषातून होत आहेत. या संदर्भात पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. याची नोंद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.

४. कसबा बावडा येथे पाण्याच्या टाकीचे उद्घाटन आणि विविध विकासकामांचा शुभारंभ सहकार राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. या कार्यक्रमालाही मोठ्या संख्येने नेतेमंडळी आणि नागरिक उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. तेव्हा पोलीस प्रशासनाने या कार्यक्रमाला उपस्थित असणार्‍यांवरही गुन्हे नोंद करण्याची तत्परता दाखवावी.