साईप्रसाद कल्याणकर यांची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला चेतावणी !
देवस्थानांचे सरकारीकरण झाले की, असले प्रकार घडतात. हिंदु जनजागृती समितीने कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवस्थान आणि तुळजापूर येथील श्री भवानीमातेचे देवस्थान यांच्या भूमीविक्रीच्या, दागिन्यांच्या आदी काही प्रकरणांवर आवाज उठवल्यावर त्यांची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी चालू झाली आहे.
सावंतवाडी – तालुक्यातील बांदा येथील देवस्थानांना देण्यात आलेल्या भूमीचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात आहे, असा आरोप करत याची नोंद पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घ्यावी, तसेच त्या भूमी कह्यात घ्याव्यात, अन्यथा २६ जानेवारी २०२१ या दिवशी उपोषण करू, अशी चेतावणी बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला दिला आहे.
याविषयी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिल्याचे कल्याणकर यांनी सांगितले. कल्याणकर यांच्या म्हणण्यानुसार बांदा येथे असलेल्या श्री देव बांदेश्वर आणि श्री भूमिकादेवी यांच्या भूमींचा वापर काही लोक चुकीच्या पद्धतीने करत आहेत. अनेक अवैध बांधकामे केली जात आहेत. देवस्थानच्या भूमी भाड्याने दिल्या जात आहेत. काही भूमींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे याची गंभीर नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.