हिंदुत्वाचा आधारवड हरपला !

ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांनी देहत्याग केल्यामुळे केवळ वारकरी संप्रदायाचा नव्हे, तर समस्त हिंदुत्वनिष्ठांचा आधारवड हरपला. वारकरी संप्रदायाने गेली अनेक शतके हिंदु समाजात भक्तीचे बीज पेरले. ह.भ.प. (पू.) वक्ते महाराज हे याच थोर परंपरेतले. संतसाहित्याचा प्रसार आणि पाखंड्यांचे खंडण हे त्यांच्या कार्याचे प्रमुख अंग. हिंदु समाजाला केवळ भक्तीरसात डुंबवणे एवढ्यापुरता त्यांची कीर्तने किंवा भाषणे मर्यादित नव्हती. त्याही पुढे जाऊन ते हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांविषयी हिंदु समाजाला अवगत करत. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अपूर्व संगम म्हणजे ह.भ.प. (पू.) वक्ते महाराज. त्यांचे हेच वैशिष्ट्य त्यांना इतरांपासून वेगळे करते.

ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते

हिंदु धर्माची महानता सांगणारे  समाजात बरेच आहेत; मात्र धर्मावर आघात करणार्‍यांवर वैचारिक प्रहार करणारे, विचारांचा प्रतिवाद विचारांनी करून हिंदुद्वेष्ट्यांचे पितळ उघडे पाडणारे विरळच. ह.भ.प. (पू.) वक्ते महाराज त्यांपैकी एक. प्रस्थानत्रयी धर्मशास्त्र, पुराण, स्मृति यांचा अभ्यास असल्यामुळे ते संदर्भासहित हिंदु धर्म किंवा परंपरा यांवरील टीकांचे तात्काळ खंडण करत. त्यामुळे हिंदुद्वेष्ट्यांची डाळ त्यांच्यासमोर कधीच शिजली नाही. त्यांच्या या परखड विचारांमुळेच ‘वारकरी संप्रदायामध्ये हिंदुत्वनिष्ठ, सनातनी, मनुवादी शिरले आहेत’, अशी टीका करून त्यांना वेगळे पाडण्याचा हिंदुद्वेष्ट्यांकडून प्रयत्न केला गेला; मात्र अशा टीकांना त्यांनी कधी भीक घातली नाही; कारण ते एकप्रकारे तुकाराम महाराजांचीच परंपरा पुढे चालवत होते आणि समस्त वारकर्‍यांनाही ते ठाऊक होते. तुकाराम महाराजांनी अभंगात म्हटले आहे, ‘मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥ भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥२॥’ ‘वारकरी म्हणजे केवळ मऊ आणि मृदू नाही, तर धर्मासाठी वेळप्रसंगी तो काठी हातात घेऊन नाठाळांना ‘सरळ’ करू शकतो’, हे ह.भ.प. (पू.) वक्ते महाराज यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगानुसार प्रत्यक्ष कृती करून दाखवले. भारतात हिंदुद्वेष्टे, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी यांची टोळी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतांना शाब्दिक प्रहाराने हिंदुद्वेष्ट्यांना नामोहरम करणारे ह.भ.प. (पू.) वक्ते महाराज आपल्यात नसणे, हे समस्त धर्मप्रेमींना चटका लावणारे आहे.

लढाऊ धर्मयोद्धा !

महाराजांच्या धर्मकार्याची व्याप्ती शब्दांत मांडणे कठीण; मात्र हिंदूंच्या कायम स्मरणात राहील, तो अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या नावाखाली श्रद्धेचे निर्मूलन करायला निघालेल्या अंनिसवाल्यांच्या विरोधात त्यांनी दिलेला लढा ! अंनिसच्या या धोकादायक कायदा अस्तित्वात आल्यास हिंदूंना त्यांच्या प्रथा, परंपरा यांचे पालन करण्यास आडकाठी येईल, हे लक्षात येताच त्यांनी याविषयी वारकर्‍यांचे प्रबोधन केले. उतारवयातही प्रकृती साथ देत नसतांनाही त्यांनी मिळेल त्या व्यासपिठावरून या कायद्याचा विरोध केला, तसेच सरकारलाही चांगलेच फैलावर घेतले. ‘धर्मावर आघात होत असल्यास तन, मन आणि धन यांची पर्वा न करता झोकून देऊन कशा प्रकारे कृती करायला हवी’, हे महाराजांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले. त्यातून अनेक धर्मप्रेमींना प्रेरणा मिळाली.  ह.भ.प. (पू.) वक्ते महाराज यांच्यासारख्या द्रष्ट्या संतांनी याविषयी वेळोेवेळी केलेले प्रबोधन आणि जागृती यांमुळे अंनिसच्या कायद्यातील अनेक धर्मविरोधी कलमे रहित झाली. धर्मविरोधी कृतींच्या विरोधात जेव्हा संत नेतृत्व करतात, त्या वेळी काय होते, हे या उदाहरणातून दिसून आले.

प्रवाहाच्या विरोधात जाऊन धर्मकार्य !

‘पुरोगामी महाराष्ट्रा’त पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, बुद्धीवादी यांचा सुळसुळाट असल्यामुळे हिंदुत्व, हिंदु धर्म हे शब्द उच्चारणेही हा मोठा ‘गुन्हा’ समजला जात असतांना ह.भ.प. (पू.) वक्ते महाराज यांनी हिंदुत्वावर परखड विचार मांडून हिंदु समाजामध्ये जागृती केली. त्यांचे मनुस्मृतीवरील वक्तव्ये गाजली. ‘मनुस्मृति हा वारकरी संप्रदायासाठी महत्त्वाचा ग्रंथ आहे. मनुस्मृतीत जे लिहिले गेले, तेच तुकाराम महाराजांच्या गाथेत मांडलेले आहे’, असे त्यांनी वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुरोगाम्यांना पोटशूळ उठला. तुकाराम महाराज यांच्यासहित अनेक वारकरी संतांना ‘हायजॅक’ करून ‘त्यांचे साहित्य हे कसे ‘पुरोगामी’ आहे, हिंदु-प्रथा परंपरांना छेद देणारे आहे’, असे सांगण्याचा खटाटोप महाराष्ट्रात ‘पुरोगामी’ म्हणवून घेणार्‍या महाभागांकडून होत आहे. अशा परिस्थितीत या वक्तव्यामुळे  ह.भ.प. (पू.) वक्ते महाराज यांच्यावर टीका होणे साहजिक होते; मात्र अशा टीकांना ते बधले नाहीत. ज्या महाराष्ट्रात ‘मनुस्मृति’ जाळली जाते आणि त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी घातली जाते, त्या भूमीत असे वक्तव्य करण्यास धारिष्ट्य लागते. त्यांच्या बोलण्यात, विचारांत एकप्रकारे सुस्पष्टता होती. ही सुस्पष्टता ही धर्माच्या अभ्यासामुळे आली. मनुस्मृतीचा सखोल अभ्यास केल्यामुळे त्यांनी त्याचे महत्त्व जाणले होते. त्यामुळे याविषयी कुठल्याही टीकेला प्रत्युत्तर देण्यास ते समर्थ होते.

राजकारण्यांशीही दोन हात !

‘आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीने राजकारणावर बोलू नये’, असा एक (चुकीचा) दंडक पुरोगाम्यांकडून घातला गेला होता. याला ह.भ.प. (पू.) वक्ते महाराज यांनी छेद दिला. राजकारणात शिरलेला भ्रष्टाचार, गुन्हेगारी यांविषयी ते बोलत. त्याही पुढे जाऊन ‘समर्थ रामदासस्वामी यांचा एकेरी उल्लेख करणारे आणि धर्म न मानणारे शरद पवार यांना धार्मिक कार्यक्रमांना बोलावू नये’, अशी परखड भूमिका त्यांनी घेतली होती. राजकीय वर्तुळातही शरद पवारांवर टीका करतांना त्यांचे विरोधक विचार करतात; मात्र ह.भ.प. (पू.) वक्ते महाराज यांनी त्याविषयी परखड मत मांडले. राजकारण हे धर्माधिष्ठित असावे, राजदंडावर धर्माचा अंकुश असावा, यांविषयी ते आग्रही होते. त्यामुळेच राजकारण्यांच्या चुकांवर हे बोट ठेवीत. याही पुढे जाऊन त्यांनी राजघटनेवरही भाष्य केले आणि त्यातील त्रुटी दाखवून दिल्या.

धर्मप्रेम, धर्मभक्ती आणि साधना यांमुळे आध्यात्मिक बळ प्राप्त होते. या बळाच्या तेजामुळे समाजाला दिशादर्शन करण्याची क्षमता प्राप्त होतेच, त्यासह धर्मावरील आघात परतवण्याची क्षमताही निर्माण होते. ह.भ.प. (पू.) वक्ते महाराज हे त्याचे चालते बोलते उदाहरण. कुणाचीही भीडभाड न ठेवता तत्त्वनिष्ठ आणि धर्मनिष्ठ राहून त्यांनी धर्मविरोधकांचा समाचार घेतला. धर्मतेजाने हिंदु समाजाला असलेले धर्माविषयीचे अज्ञान दूर करणार्‍या या महान संत विभूतीच्या जाण्याने हिंदु समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे; मात्र संत हे देहाने जरी अस्तित्वात नसले, तरी निर्गुणातून त्यांचे कार्य चालूच रहाणार, याविषयी धर्मप्रेमींच्या मनात तीळमात्र शंका नाही. धर्मरक्षणार्थ प्राणपणाने झटण्यासाठी ह.भ.प. (पू.) वक्ते महाराज यांनी समस्त धर्मप्रेमींना बळ आणि आशीर्वाद द्यावेत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !